संसदेत गदारोळामुळे चौथ्या दिवशीही कामकाज ठप्प
राहुल गांधी यांच्या निवासस्थानी आगामी रणनीतीबाबत बैठक
जंतर-मंतरवर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात
नवी दिल्ली – नीट पेपरफुटी आणि देशातील शिक्षणाचा दर्जा सुधारला जावा, यासाठी कॉकरोच जनता पार्टीकडून (सीजेपी) राजधानी नवी दिल्लीत जंतर मंतरवर आंदोलन करण्यात येत आहे.
कॉकरोच जनता पार्टी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर ठाम आहे. सीजेपीच्या 20 जुलैच्या मोर्चावर पोलिसांकडून लाठीमार करण्यात आला होता. या सर्वांच्या पार्श्वभूमीवर जंतर-मंतरवरील आंदोलनाचा आता देशभरात वणवा पसरत आहे. कॉकरोच जनता पार्टीने आज, 24 जुलै रोजी देशव्यापी आंदोलनाची घोषणा केली आहे. हे आंदोलन शांततापूर्ण मार्गानं करण्यात यावं, असं आवाहन करण्यात आलं आहे.
‘कॉकरोच जनता पार्टी’ने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर एक पत्र जारी केले आहे. देशभरात पोलिसांच्या दडपशाही आणि कारवाईला बळी पडलेल्या विद्यार्थ्यांना या आंदोलनातून पाठिंबा द्यावा. तसेच सर्व विद्यार्थी संघटना आणि सामाजिक संस्थांनी आपापल्या जिल्ह्यांत स्थानिक प्रशासनाकडून कायदेशीर परवानगी घेऊन हे आंदोलन शांततापूर्ण मार्गाने पार पाडावे आणि आंदोलनाच्या ठिकाणी एकत्र आलेल्या नागरिकांसमोर विद्यार्थ्यांच्या मागण्यांचे जाहीर वाचन करावे, असे यात म्हटले आहे. तसेच आंदोलनस्थळी इन्कलाब जिंदाबाद आणि भारत माता की जय अशा घोषणा द्याव्यात, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. सीजेपीनं चार प्रमुख मागण्या केल्या होत्या, त्यामध्ये धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला जावा, आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना सरकारकडून एक कोटी रुपयांची नुकसान भरपाई दिली जावी. विद्यार्थी आंदोलकांवर गुन्हे दाखल करु नये. दिल्लीत विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करणाऱ्या पोलिसांवर कारवाई व्हावी, या मागण्यांचा समावेश आहे.
दरम्यान लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या सर्व खासदारांची त्यांच्या निवासस्थानी बैठक बोलावली आहे. काँग्रेसनं देखील विद्यार्थ्यांच्या प्रश्नी मोठ्या प्रमाणावर आंदोलन केले आहे. छात्रों की गुंज या कार्यक्रमाद्वारे विद्यार्थ्यांचे प्रश्न काँग्रेसकडून मांडण्यात आला. काँग्रेसकडून छात्रों की गुंज याचा पुढील कार्यक्रम मुंबईत आयोजित केला जाणार आहे. दुसरीकडे विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्याकडून 26 जुलैला संयुक्त मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. याशिवाय ठाकरेसेना आणि मनसेकडून संयुक्तपणे उद्या सायंकाळी 5 वाजता राष्ट्रगीत गायन केलं जाणार आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून पेपरफुटीच्या प्रकरणांची सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टांमध्ये केली जाईल, असं म्हटलं. मात्र, पंतप्रधानांच्या या घोषणेत जबाबदारीचा कोणताही उल्लेख नसल्याचे सांगत सीजेपीने ती फेटाळून लावली. दरम्यान यावर राहुल गांधी, सीजेपीचे अभिजीत दिपके यांनी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
दुसरीकडे संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी घडलेल्या घटनांमुळे सलग चौथ्या दिवशी संसदेत लोकसभा आणि राज्यसभेत कामकाज होऊ शकलं नाही. २० जुलैपासून अधिवेशनाला सुरूवात झाली. मात्र, गुरूवारीही कोणतेही कामकाज होऊ शकले नाही. सलग चौथ्या दिवशी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मुद्द्यावर विरोधक आक्रमक दिसले. सरकारने आधी प्रधान यांचा राजीनामा घ्यावा, त्यानंतरच चर्चा करून अशी भूमिका विरोधकांनी घेतली आहे. तर विरोधक अटींसह चर्चा करण्याची भूमिका घेत असल्याचा आरोप भाजपाने केला आहे. राजीनाम्याच्या मागणीवर कोणताही तोडगा न निघाल्याने कोंडी कायम आहे.
दरम्यान जंतर-मंतरवर रात्री उशिरा पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झालं आहे. अनुचित प्रकार टाळण्यासाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. परिसरात तणावपूर्ण शांतता असून, पोलिसांची मोठी कुमक तैनात असल्यानं तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे.
पोलिसांच्या कथित अमानुष वागणुकीविरोधात सीजेपीकडून आज देशव्यापी आंदोलनाची हाक, विद्यार्थ्यांना सहभागी होण्याचे आवाहन
Leave a Comment





