सावर्डे विद्यालयात बॅडमिंटन कार्यशाळेचे उत्साहात आयोजन; १५० खेळाडूंचा उत्स्फूर्त सहभाग

Gramin Varta
134 Views

सावर्डे : सह्याद्री शिक्षण संस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सावर्डे येथे नुकतीच बॅडमिंटन कार्यशाळा उत्साहात पार पडली. संस्थेचे कार्याध्यक्ष अनिरुद्ध निकम यांच्या मार्गदर्शनाखाली सह्याद्री बॅडमिंटन क्लबच्या वतीने आयोजित या उपक्रमात सुमारे १५० खेळाडू आणि पालकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांमध्ये क्रीडाप्रेम, शिस्त आणि स्पर्धात्मक वृत्ती विकसित करण्याच्या उद्देशाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

विद्यालयाच्या भाऊसाहेब महाडिक सभागृहात पार पडलेल्या या कार्यशाळेचे उद्घाटन सई निकम यांच्या हस्ते झाले. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र कुमार वारे, मिरा जोशी, शकील मोडक यांच्यासह शिक्षक आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यशाळेचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून सुप्रसिद्ध बॅडमिंटनपटू व एन.आय.एस. प्रशिक्षक मयूर कांबळे यांनी विद्यार्थ्यांना बॅडमिंटन खेळाचे शास्त्रशुद्ध धडे दिले.

यावेळी मयूर कांबळे यांनी विद्यार्थ्यांना खेळातील मूलभूत तंत्र, योग्य ग्रिप, फुटवर्क, सर्व्हिस, स्मॅश आणि कोर्टवरील हालचालींचे प्रात्यक्षिकांसह सविस्तर मार्गदर्शन केले. केवळ शारीरिक तंदुरुस्तीच नव्हे, तर मानसिक तयारी कशी असावी, याबाबतही त्यांनी खेळाडूंना टिप्स दिल्या. नियमित सराव आणि चिकाटीच्या बळावर विद्यार्थी भविष्यात राज्य व राष्ट्रीय स्तरावर यश संपादन करू शकतात, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच, पालकांनी मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या क्रीडा कौशल्यालाही प्रोत्साहन देणे गरजेचे असल्याचे आवाहन त्यांनी केले.

कार्यशाळेला लाभलेला पालकांचा प्रतिसाद आणि मुलांचा उत्साह पाहून उपस्थितांनी या उपक्रमाचे कौतुक केले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी असे उपक्रम महत्त्वपूर्ण असल्याचे मत पालकांनी व्यक्त केले. या कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी क्रीडा शिक्षक दादासाहेब पांढरे, अमृत कडगावे, रोहित गमरे आणि प्रशांत सकपाळ यांनी विशेष परिश्रम घेतले.

- Advertisement -
Total Visitors :
4827201
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *