संगमेश्वरच्या सायले माईन वाडीत विहिरीत पडलेल्या बिबट्याची वनविभागाकडून यशस्वी सुटका

Gramin Varta
140 Views

संगमेश्वर : तालुक्यातील सायले माईन वाडी परिसरात विहिरीत पडलेल्या बिबट्याला वनविभागाच्या पथकाने अत्यंत शिताफीने आणि सुरक्षितपणे बाहेर काढत जीवदान दिले आहे. या थरारक घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती. सुदैवाने, या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये बिबट्याला कोणतीही इजा न होता त्याला पुन्हा नैसर्गिक अधिवासात सुखरूप मुक्त करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, १६ जुलै रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास सायले माईन वाडी येथील सार्वजनिक विहिरीत बिबट्या पडल्याचे स्थानिक पोलीस पाटलांच्या निदर्शनास आले. त्यांनी तातडीने याची माहिती वनविभागाला दिली. माहिती मिळताच संगमेश्वर-देवरुखच्या परिमंडळ वन अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या पथकाने रेस्क्यू साहित्यासह तातडीने घटनास्थळी धाव घेतली. सुमारे २० फूट खोलीच्या सिमेंट काँक्रिटच्या विहिरीत बिबट्या पाण्यातील एका कठड्याचा आधार घेऊन बसला होता.

परिस्थितीचे गांभीर्य ओळखून वनविभागाच्या पथकाने तातडीने रेस्क्यूचे नियोजन केले. विहिरीत लोखंडी पिंजरा दोरीच्या साहाय्याने सावधगिरीने खाली सोडण्यात आला. पिंजरा पाहताच बिबट्याने त्यात प्रवेश केला आणि तो सुरक्षितपणे जेरबंद झाला. वनविभागाच्या या जलद व अचूक नियोजनामुळे बिबट्याला कोणतीही दुखापत झाली नाही. रेस्क्यू केल्यानंतर देवरुख येथील तालुका लघु चिकित्सालयाच्या सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन यांच्याकडून बिबट्याची सखोल वैद्यकीय तपासणी करण्यात आली. बिबट्याची प्रकृती उत्तम असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर, त्याला वनविभागाच्या वतीने नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले.

Total Visitors :
4576147
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *