रत्नागिरीत किरकोळ कारणावरून रिक्षाचालकास मारहाण; तरुणावर गुन्हा दाखल

Gramin Varta
540 Views

रत्नागिरी  : शहरातील पटवर्धन हायस्कूलकडे जाणाऱ्या रस्त्यावर किरकोळ कारणावरून एका रिक्षाचालकास मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी मनिष बळीराम कवळेकर (रा. चवंडेवठार, रत्नागिरी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, ही घटना १५ जुलै २०२६ रोजी सकाळी ११.३० च्या सुमारास घडली. या मारहाणीत फिर्यादी रिक्षाचालक मिलिंद मुरलीधर भाटकर (वय ५१) हे जबर जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी मिलिंद भाटकर हे आपल्या ८ वर्षीय नातवाला शाळेत सोडण्यासाठी रिक्षाने जात होते. पटवर्धन हायस्कूल परिसरातून समोरून चारचाकी गाडी येत असल्याने त्यांनी आपली रिक्षा मागे घेतली. दरम्यान, रिक्षाच्या मागे आरोपी मनिष कवळेकर हा स्कुटरवर होता. रिक्षा मागे घेतल्याच्या कारणावरून आरोपीला राग अनावर झाला आणि त्याने फिर्यादीला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यानंतर आरोपीने फिर्यादीच्या तोंडावर आणि डोळ्यावर हाताच्या ठोशाने मारहाण करून त्यांना गंभीर दुखापत केली. या मारहाणीत फिर्यादीच्या ओठाला आतील व बाहेरील बाजूस टाके पडले असून, त्यांच्या डोळ्यालाही इजा झाल्याने त्यांना कमी दिसू लागले आहे.

या प्रकरणी १८ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ४.२८ वाजता शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ च्या कलम ११७(२), ११५(२), ३५२ आणि आयपीसी ३२५, ३२३, ५०४ नुसार गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

Total Visitors :
4576497
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *