रत्नागिरी : विल्येमधून परदेशात बॉक्साइट निर्यात झाले? महसूल, पोलीस, कस्टम विभाग अजूनही झोपेत?

Gramin Varta
460 Views

जयगड बंदरामार्गे ‘डोळा चुकवून वाहतूक झाली की डोळा मारून?’ ; मिस्टर राजूचे आणखी कारनामे येताहेत पुढे?

रत्नागिरी : तालुक्यातील विल्ये गाव येथे शासनाच्या परवानगीशिवाय मोठ्या प्रमाणावर बॉक्साइटचा उपसा सुरू आहे. शेकडो ट्रकची वाहतूक आणि जेएसडबल्यू जयगड बंदरातून परदेशात बॉक्साईटची निर्यात झाली. ही निर्यात झालीच कशी? महसूल, पोलीस व कस्टम विभागाचा डोळा चुकवून ही निर्यात झाली की डोळा मारून वाहतूक झाली असा प्रश्न पडला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात जर बंदरा मार्गे वाहतूक झाली असेल तर महसूल, पोलीस व कस्टम विभाग झोपले होते का? की यांच्या संगनमताने ही तस्करी झाली? असा संतप्त सवाल नागरिकांमधून विचारला जात आहे.

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये खनिजांच्या कायदेशीर उत्खननाबाबत शासनाचे कडक नियम असताना, प्रत्यक्षात मात्र अनेक ठिकाणी बेकायदेशीर प्रकार सुरू असल्याचे उघडकीस येत आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अवघ्या तीनच कंपन्यांना कायदेशीररीत्या बॉक्साइट काढण्याची अधिकृत परवानगी मिळालेली आहे. यामध्ये मे. आशापुरा मायनकेम लिमिटेड या कंपनीला मंडणगड तालुक्यात एक आणि दापोलीमध्ये दोन ठिकाणी परवानगी आहे. त्याचबरोबर, अन्य दोन कंपन्यांना राजापूर तालुक्यातील दोन वेगवेगळ्या ठिकाणी बॉक्साइट काढण्याची कायदेशीर परवानगी आहे.

असे असतानाही, रत्नागिरी शहरापासून अवघ्या २५ ते २६ किलोमीटर अंतरावर असलेल्या  विल्ये गावी विनापरवाना व राजरोजपणे बॉक्साइट काढले जात असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.

विल्ये गावी एवढ्या मोठ्या प्रमाणावर बॉक्साइटचे उत्खनन सुरू असताना आणि त्याचे शेकडो ट्रक भरून रात्री-अपरात्री मुख्य रस्त्यावरून धावत असतानाही स्थानिक महसूल यंत्रणा, पोलीस यंत्रणा तसेच कस्टम विभागाला याची साधी कुणकुणही लागली नाही, याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. एरव्ही छोट्या छोट्या मटका, जुगार, दारू अड्ड्यावर धाड मारणारी पोलिस यंत्रणा यांना याची कल्पना नव्हती का? डोळा चुकवून वाहतूक झालीच कशी ? कस्टम विभाग काय झोपा काढत होते का? अशी वाहतूक परदेशात होत असेल तर मोठ्या हस्तींचा हात असण्याची शकता आहे. कस्टम विभाग एरवी समुद्रातील बोटींवर कारवाई करत बातम्या छापून आणतात मात्र ही एवढी मोठी घटना घडूनही त्यांना याची कुणकुण नाही का? अशाच प्रकारे बंदरामार्गे घुसखोरी झाली तर याला जबाबदार कोण? असा सवाल उपस्थित होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मागील काही महिन्यांत जयगड बंदरातून मोठ्या प्रमाणावर खनिजाची परदेशात निर्यात झाली आहे. गेल्या तीन महिन्यांमध्ये जयगड येथून सुमारे २० हजार ब्रास बॉक्साइट परदेशात गेल्याची चर्चा आहे. दहा-दहा हजार ब्रासची दोन जहाजे परदेशात रवाना झाल्याचे बोलले जात आहे. जेएसडब्ल्यूच्या जयगड बंदरासारख्या महत्त्वाच्या आणि सुरक्षा व्यवस्था असलेल्या ठिकाणावरून एवढ्या मोठ्या प्रमाणात बॉक्साइटची निर्यात होत असताना ना महसूल प्रशासनाला कळले, ना पोलीस यंत्रणेला आणि ना कस्टम विभागाला, हे अत्यंत संशयास्पद आहे.

या संपूर्ण प्रकरणामागे स्थानिक पातळीवरील हलगर्जीपणा किंवा ‘अर्थपूर्ण तडजोड’ असल्याचा संशय जनतेतून व्यक्त केला जात आहे. विल्ये गावातील या बेकायदेशीर प्रकारात ‘मास्टर राजू’ याच्या करामती असल्याची चर्चा जोरात आहे. एका जागा मालकाने राजूला जागा झाडझुड करण्यासाठी सांगितले होते, ज्यामध्ये केवळ ५०० ब्रासची रॉयल्टी भरण्यात आली; मात्र प्रत्यक्षात साडेपाच हजार ब्रास बॉक्साइटचा उपसा करण्यात आला आणि शासकीय यंत्रणेला याची खबरही लागली नाही.

रत्नागिरी तालुक्यातून इतक्या मोठ्या प्रमाणावर खनिजाची परदेशात तस्करी होत असताना महसुली यंत्रणा एवढी सुस्त का आहे? पोलिसांच्या गुप्तचर विभागाला याबद्दल कोणती माहिती मिळाली नाही? यावरून रत्नागिरी जिल्ह्यामधील सुरक्षा यंत्रणा किती गाफील किंवा सुस्त आहे, हे सहज लक्षात येते. समुद्रमार्गे एखादी देशविरोधी कारवाई किंवा घातपात घडल्यास गुप्तचर विभागाला वेळीच कसे समजणार, असा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिकांमधून विचारला जात आहे.

एवढे शेकडो ट्रक डोळ्यांसमोरून जात असतानाही कोणतीही कायदेशीर कारवाई न होणे म्हणजे हे सारे व्यवहार संगनमताने चालले आहेत का, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे. या सगळ्या घडामोडींमुळे कोकणची किनारपट्टी खरोखरच सुरक्षित आहे का, असा धोकादायक प्रश्न निर्माण झाला असून, असुरक्षित किनार्‍यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शासकीय यंत्रणांचे या प्रकरणातील मौन आणि डोळेझाक धोरण पाहता, या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.


रत्नागिरी जिल्ह्यातील 3 च कंपन्यांना बॉक्साइट उत्खननास परवानगी

◼️मे. आशापुरा मायनकेम लिमिटेड: साखरे (मंडणगड), उंबरशेत (दापोली), रोवले (दापोली)

◼️मे. सोसायडे डे फोमेंटो इंडस्ट्रियल प्रायव्हेट लिमिटेड: नाणार (राजापूर)

◼️मे. वीट राग होम्स प्रायव्हेट लिमिटेड: कुंभेवणे (राजापूर)

Total Visitors :
4575720
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *