२५ लाख रुपयांसाठी तरुणाला मारहाण; नाचणे येथील प्रकार, एकाविरोधात गुन्हा दाखल

Gramin Varta
571 Views

रत्नागिरी : पैशांच्या वादातून एका तरुणाला बेदम मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना रत्नागिरी शहरातील नाचणे परिसरात समोर आली आहे. या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात एकासह अन्य एका अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना २० जुलै २०२६ रोजी सकाळी ११.१५ वाजल्यापासून २१ जुलै २०२६ रोजी पहाटे २ वाजेपर्यंत नाचणे परिसर तसेच सिव्हिल हॉस्पिटल रत्नागिरी येथे घडली. याप्रकरणी सुरज मदन पाटील (वय ३६, सध्या रा. नाचणे, रत्नागिरी, मूळ रा. काटी, ता. इंदापूर, जि. पुणे) यांनी पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे.

फिर्यादी सुरज पाटील यांनी चैताली जगदीश पाटील हिच्या वडिलांकडून चार लाख रुपये घेतले होते. ही रक्कम त्यांनी मार्च महिन्यात परत केली होती. मात्र, या रकमेवरील व्याजापोटी दोन लाख ४० हजार रुपये देण्याचे मान्य केले होते. याच आर्थिक व्यवहारातून वाद निर्माण झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

फिर्यादी हे एक्साईज परीक्षेसाठी नवी मुंबई येथे गेले असताना ठाणे रेल्वे स्थानकावर चैताली पाटील, तिची आई आणि एका अनोळखी व्यक्तीने त्यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्या अनोळखी व्यक्तीने फिर्यादीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

त्यानंतर रत्नागिरीतील नाचणे येथील राहत्या ठिकाणी आरोपी संदेश संतोष कोरडे (वय अंदाजे २४, सध्या रा. पनवेल, मूळ रा. बीड) हा एका अनोळखी व्यक्तीसह आला. त्याने फिर्यादीकडे २५ लाख रुपयांची मागणी केली. पैसे देण्यास नकार दिल्यानंतर आरोपीने फिर्यादीच्या पोटात लाथ मारून, पोटावर बसून छातीवर ठोसे मारले तसेच त्यांना भिंतीवर आपटले. यावेळी पाच किलो वजनाच्या सिलेंडरने पाठीत व कमरेवर मारहाण केल्याचा आरोप आहे.

मारहाणीचा प्रकार एका अनोळखी व्यक्तीने मोबाईलमध्ये चित्रित केल्याचेही फिर्यादीत नमूद आहे. त्यानंतर फिर्यादी कपडे घालण्यासाठी बेडरूममध्ये गेले असता आरोपीने पुन्हा कमरेत लाथ मारून शिवीगाळ केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच रुग्णवाहिकेतून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेत असतानाही आरोपीने गळा दाबून व पोटात बुक्क्या मारल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २४२/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३३३, ११७(२), ११५(२), ३५२, ३५१(३) अंतर्गत आरोपी संदेश कोरडे व अन्य एका अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास रत्नागिरी शहर पोलिस करत आहेत.

Total Visitors :
4575724
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *