रत्नागिरी: महामार्गावर मोकाट गुरांचा वावर वाढल्याने रात्रीच्या वेळी अपघातांचा मोठा धोका निर्माण झाला असून, या गंभीर समस्येकडे प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे, अशी आक्रमक मागणी युवासेनेच्या वतीने करण्यात आली आहे. या संदर्भात युवासेना रत्नागिरी जिल्हा युवाधिकारी प्रसाद सावंत यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना अधिकृत निवेदन सादर केले आहे.
सध्या महामार्गावर मोकाट जनावरांचा सुळसुळाट पाहायला मिळत असून यामुळे वाहनचालकांचे जीव धोक्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर युवासेनेने प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींना लेखी सूचना देण्यात यावी, जेणेकरून नागरिकांनी आपली गुरे महामार्गावर मोकाट सोडू नयेत याबाबत गावात जनजागृती मोहीम राबवली जावी. तसेच, पशुधनासाठी सुरक्षित गोठ्यांची व्यवस्था उपलब्ध करून द्यावी आणि यानंतरही रस्त्यावर मोकाट गुरे आढळल्यास संबंधित ग्रामपंचायत स्तरावर त्यांच्यावर कठोर दंडात्मक कारवाई करावी, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे.
या निवेदनावेळी तालुकाप्रमुख मयूरेश्वर पाटील, शहरप्रमुख प्रशांत साळुंखे, उपतालुका प्रमुख विजय देसाई, संदेश नारगुडे, किरण तोडणकर, सचिन सावंतदेसाई, प्रशांत रायंगणकर, सुफियान जयगडकर, नंदकुमार कदम, सायली पवार, मिताली पवार, गंधाली मयेकर आणि सेजल बोराटे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.




