आंबा घाट दरोडा प्रकरणात तिघांना जामीन; रत्नागिरी सत्र न्यायालयाचा आदेश

Gramin Varta
433 Views

रत्नागिरी : आंबा घाटात जनावरांची वाहतूक करणाऱ्या वाहनचालकाला अडवून मारहाण करत चाकूचा धाक दाखवून ५० हजार रुपयांची मागणी केल्याच्या प्रकरणात अटकेत असलेल्या तिघांना रत्नागिरी अतिरिक्त सत्र न्यायालयाने नियमित जामीन मंजूर केला आहे. सरवेश सुभाष कीर (वय २२), शार्दुल सुनील कीर (वय २४) आणि संतोष बाळू गोसावी (वय ३८) अशी जामीन मिळालेल्या आरोपींची नावे आहेत. अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. एम. अंबळकर यांनी २८ जुलै २०२६ रोजी हा आदेश दिला.

या प्रकरणी संगमेश्वर तालुक्यातील देवरुख पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४७/२०२६ दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांसह भारतीय शस्त्रास्त्र कायद्यानुसार आरोपींवर गुन्हा दाखल आहे. फिर्यादी हा महिंद्रा बोलेरो पिकअप वाहनाचा चालक असून तो जनावरांची वाहतूक करीत होता. ८ एप्रिल २०२६ रोजी तो सांगली जिल्ह्यातील कांदे येथून जनावरे घेऊन वेतोशी येथे आला होता. त्यानंतर परतीच्या प्रवासात आंबाघाट परिसरातील डक्कन स्पॉटजवळ काळ्या रंगाच्या थार वाहनाने त्याचे वाहन अडवण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

फिर्यादीनुसार, थारमधून चार आणि त्यानंतर इनोव्हा वाहनातून चार जण खाली उतरले. त्यांनी चालकाला वाहनाबाहेर काढून जनावरांची कत्तलीसाठी वाहतूक करीत असल्याचा आरोप करत मारहाण केली. त्यानंतर त्याला इनोव्हा वाहनात बसवून त्याचे बोलेरो पिकअप वाहनही सोबत घेण्यात आले. साखरपा येथील गाड्रे पेट्रोल पंपाजवळ संबंधित व्यक्तींनी प्रकरण मिटवायचे की पोलिसांकडे जायचे, अशी विचारणा केली. त्यावेळी चालकाने पोलिसांकडे जाण्याची तयारी दर्शविल्यानंतर त्याच्यावर चाकू रोखून ५० हजार रुपयांची मागणी करण्यात आली. वाहनात सापडलेले २५ हजार रुपये घेतल्यानंतर उर्वरित २५ हजार रुपये न दिल्यास आंबाघाटात ठार मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

या घटनेनंतर पोलिसांनी तपास सुरू करून आठही आरोपींना अटक केली. संबंधित तिघांनी न्यायालयात जामिनासाठी अर्ज करताना आपण निर्दोष असल्याचे सांगितले. तसेच आपल्याविरुद्ध यापूर्वी कोणताही गुन्हेगारी इतिहास नसून तपास पूर्ण झाला आहे आणि आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे, त्यामुळे तीन महिन्यांहून अधिक काळ कोठडीत असलेल्या आरोपींना जामीन द्यावा, अशी मागणी करण्यात आली.

दरम्यान, तपासी अधिकाऱ्यांनी जामीन अर्जाला तीव्र विरोध केला. तपासादरम्यान जमा झालेल्या पुराव्यांमध्ये आरोपींचा सहभाग दिसून येत असून, आरोपींकडून जप्त करण्यात आलेल्या व्हिडिओमध्येही त्यांचा सहभाग स्पष्ट होत असल्याचा दावा पोलिसांनी केला. तसेच फिर्यादी व साक्षीदार हे कोल्हापूर जिल्ह्यातील असून आरोपी त्यांच्यावर दबाव आणू शकतात किंवा त्यांना इजा पोहोचवू शकतात, अशी भीती पोलिसांनी न्यायालयासमोर व्यक्त केली.

मात्र न्यायालयाने प्रकरणातील कागदपत्रे, आरोपींचे वय, त्यांच्याविरुद्ध पूर्वी कोणताही गुन्हेगारी इतिहास नसणे, सुमारे तीन महिन्यांची कोठडी, तपास पूर्ण होऊन आरोपपत्र दाखल होणे आणि खटला लवकर पूर्ण होण्याची शक्यता नसणे या बाबींचा विचार केला. तिघेही त्यांच्या कुटुंबातील कमावते सदस्य असल्याचेही न्यायालयाच्या निदर्शनास आले. या सर्व बाबींचा विचार करून अतिरिक्त सत्र न्यायालयाने तिघांना नियमित जामीन मंजूर केला.

न्यायालयाच्या आदेशानुसार तिघांची प्रत्येकी ५० हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर आणि त्याच रकमेच्या जामीनदारावर सुटका करण्यात येणार आहे. तसेच खटल्याचा निर्णय होईपर्यंत त्यांनी फिर्यादी किंवा साक्षीदारांना भेटू नये, त्यांच्याशी कोणत्याही माध्यमातून संपर्क साधू नये किंवा त्यांच्यावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करू नये, अशी अट न्यायालयाने घातली आहे. या अटींचा भंग झाल्यास जामीन रद्द करण्यासाठी अर्ज करण्याचे स्वातंत्र्य तपासी अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.

या संपूर्ण प्रकरणात आरोपीतर्फे ॲड.आदेश चवंडे, ॲड. विवेक दुबे, ॲड.प्राजक्ता दुबे, ॲड.यशराज सावंत, साक्षी जैन यांनी कामकाज पाहिले.

Total Visitors :
4595341
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *