चिपळूणातील अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करा!

Gramin Varta
115 Views

भीमसैनिक युवा प्रतिष्ठानचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

चिपळूण : तालुक्यात सुरू असलेल्या अवैध गांजा विक्री, गावठी दारूच्या भट्ट्या तसेच गोवा बनावटीच्या दारूच्या विक्रीवर तातडीने कठोर कारवाई करावी, अशी मागणी भीमसैनिक युवा प्रतिष्ठान, चिपळूण यांच्या वतीने जिल्हाधिकारी रत्नागिरी यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. तसेच या अवैध धंद्यांना सहकार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, चिपळूण तालुक्यात काही ठिकाणी गांजा, गावठी दारू तसेच महाराष्ट्रात विक्रीस मान्यता नसलेल्या गोवा बनावटीच्या दारूची विक्री राजरोसपणे सुरू असून, काही अधिकारी व पोलिसांचे बीट अंमलदार अशा अवैध धंद्यांना पाठबळ देत असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे युवकांमध्ये व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढत असून अल्पवयीन मुलांनाही या व्यसनांची लागण होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

व्यसनांमुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होत असून महिलांवर घरगुती अत्याचार वाढत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. काही विवाहित युवक दारूच्या आहारी जाऊन पत्नींकडे पैशांची मागणी करतात, मारहाण करतात आणि त्यामुळे अनेक महिलांना माहेरी आश्रय घ्यावा लागत असल्याचा दावा करण्यात आला आहे.

याप्रकरणी प्रशासनाने तातडीने कठोर कारवाई करून अवैध धंदे कायमस्वरूपी बंद करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा येत्या 15 ऑगस्ट 2026 (स्वातंत्र्य दिन) रोजी प्रांताधिकारी कार्यालयासमोर चिपळूण तालुक्यातील महिलांसह बेमुदत उपोषण करण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. उपोषणादरम्यान कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाल्यास त्यास प्रशासन जबाबदार राहील, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

हे निवेदन प्रविण राजाराम जाधव (सामाजिक कार्यकर्ते) यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले असून, शुभम कदम, प्रफुल्ल मोहिते, आकाश कांबळे, आणि ललेश कदम यांच्यासह भीमसैनिक युवा प्रतिष्ठानच्या सदस्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. निवेदनाच्या प्रती पोलीस अधीक्षक रत्नागिरी तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक यांनाही देण्यात आल्या आहेत.

Total Visitors :
4602486
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *