परशुराम भूमीत आरोग्यसह शांततेसाठी धावणार 500  विद्यार्थी!

Gramin Varta
72 Views

बी. आर. जोशी क्रॉस-कंट्री स्पर्धा,छोट्या धावपटूंना अनोखी संधी

चिपळूण : शालेय विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक तंदुरुस्ती, सहनशक्ती, दृढ निश्चय, स्वयंशिस्त आणि निरोगी जीवनशैलीची जाणीव लहान वयापासूनच निर्माण व्हावी, या उद्देशाने शिक्षण प्रसारक मंडळी, पुणे यांच्या वतीने ‘बी. आर. जोशी क्रॉस-कंट्री स्पर्धा ‘ आयोजित करण्यात आली आहे. ‘धावूया आरोग्यासाठी, शांततेसाठी…’ या संकल्पनेवर आधारित ही स्पर्धा शनिवार, दि. १ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ७.३० वाजता परशुराम येथील एसपीएम इंग्लिश मीडियम स्कूलच्या आवारातून सुरू होणार असून, सुमारे ५०० विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी होणार आहेत.

चिपळूण परिसरात प्रथमच शालेय विद्यार्थ्यांसाठी अशा स्वरूपाची क्रॉस-कंट्री स्पर्धा आयोजित करण्यात येत असून, यामध्ये इयत्ता तिसरी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांमध्ये खेळाविषयी आवड निर्माण करणे, नियमित व्यायामाची सवय लावणे आणि निरोगी जीवनशैलीचा संदेश देणे, हा या स्पर्धेमागील प्रमुख उद्देश आहे.

स्पर्धेच्या नियमानुसार इयत्ता तिसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना एक किलोमीटर, तर इयत्ता सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना दोन किलोमीटर अंतर धावायचे आहे. विद्यार्थ्यांच्या वयोगटानुसार अंतर निश्चित करण्यात आले असून, स्पर्धा सुरक्षित व शिस्तबद्ध वातावरणात पार पाडण्यासाठी आवश्यक नियोजन करण्यात आले आहे.

खेळ आणि स्पर्धांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा शारीरिक तसेच मानसिक विकास घडवून आणणे, त्यांच्यात आत्मविश्वास, चिकाटी, स्पर्धात्मक वृत्ती आणि संघभावना विकसित करणे हे आजच्या काळात अत्यंत आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेली बी. आर. जोशी क्रॉस-कंट्री शर्यत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी निश्चितच उपयुक्त ठरणार असल्याचा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.

या स्पर्धेत मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन ‘धावूया आरोग्यासाठी, शांततेसाठी…’ हा संदेश समाजापर्यंत पोहोचवावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Total Visitors :
4602486
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *