मुंढे ते कुंभार्ली घाटमाथा मार्गावरील खड्डे तातडीने बुजवा!

Gramin Varta
47 Views

निकृष्ट कामाची चौकशी करा : भरत लब्ध्ये यांची राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे मागणी

चिपळूण : गुहागर- विजापूर राष्ट्रीय मार्गावरील मुंढे ते कुंभार्ली घाटमाथा दरम्यान मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने वाहनचालक आणि प्रवाशांचे हाल होत असून, याप्रकरणी तातडीने कारवाई करण्याची आक्रमक मागणी भरत लब्ध्ये यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे डेप्युटी इंजिनियर मुल्ला यांच्याकडे केली आहे.

यासंदर्भात त्यांनी पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मुंढे ते कुंभार्ली घाटमाथ्यापर्यंतच्या रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाली असून, विशेषतः पोफळी परिसरात यापूर्वी एका ठेकेदार कंपनीने केलेले रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्यामुळे अल्पावधीतच मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असून, अपघाताचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे.

या संदर्भातील व्हिडिओदेखील राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे पाठविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. रस्त्याच्या दुरवस्थेबाबत नागरिक आणि वाहनचालकांकडून सातत्याने तक्रारी येत असून, संबंधित विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

“चार ते पाच दिवसांत काम सुरू करा”

राष्ट्रीय महामार्ग विभागाने कोणत्याही परिस्थितीत येत्या चार ते पाच दिवसांत खड्डे बुजविण्याचे काम सुरू करावे, अशी ठाम मागणी भरत लब्ध्ये यांनी केली आहे. तसेच खड्डे बुजविताना जांभ्या दगडाचा अथवा निकृष्ट दर्जाच्या साहित्याचा वापर अजिबात करू नये. दर्जेदार साहित्य वापरून कायमस्वरूपी आणि टिकाऊ दुरुस्ती करण्यात यावी, अन्यथा नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

दरम्यान, पावसाळ्यात या मार्गावरून दररोज हजारो लहान-मोठी वाहने प्रवास करत असल्याने रस्त्याची तातडीने दुरुस्ती करणे आवश्यक असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे. आता राष्ट्रीय महामार्ग विभाग या मागणीवर किती वेगाने आणि प्रभावीपणे कार्यवाही करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Total Visitors :
4602486
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *