रत्नागिरी पोलीस दलातर्फे ‘मिशन रायझिंग फ्लॉवर्स’ अंतर्गत विद्यार्थ्यांना शालेय दप्तर व छत्र्यांचे वाटप

Gramin Varta
234 Views

रत्नागिरी : विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीस प्रोत्साहन देण्याबरोबरच त्यांच्यामध्ये सामाजिक बांधिलकी, सुरक्षिततेची जाणीव व पोलीस दलाबद्दल विश्वास निर्माण करण्याच्या उद्देशाने रत्नागिरी पोलीस दलामार्फत ‘मिशन रायझिंग फ्लॉवर्स’ हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत नुकतेच पोलीस अधीक्षक कार्यालय, रत्नागिरी येथे शालेय विद्यार्थ्यांना दप्तर व छत्र्यांचे वाटप करण्यात आले.

हा कार्यक्रम महाराष्ट्र शासनाच्या विशेष पोलीस महानिरीक्षक, कोंकण परिक्षेत्र श्री. चंद्र किशोर मीना यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.
या महत्त्वपूर्ण कार्यक्रमास पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे, अपर पोलीस अधीक्षक श्री. बी. बी. महामुनी यांच्यासह रत्नागिरी पोलीस दलातील विविध पोलीस अधिकारी व अंमलदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान विशेष पोलीस महानिरीक्षक श्री. चंद्र किशोर मीना यांनी ‘मिशन रायझिंग फ्लॉवर्स’ या उपक्रमाचे मनःपूर्वक कौतुक केले. हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच पोलीस व समाज यांच्यातील विश्वासाचे नाते अधिक दृढ करण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरेल, असा दृढ विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आणि विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

रत्नागिरी पोलीस दलामार्फत राबविण्यात येणारे ‘मिशन रायझिंग फ्लॉवर्स’ हे अभियान केवळ शैक्षणिक साहित्याचे वितरण पुरते मर्यादित नसून, याद्वारे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबरोबरच सुरक्षा, शिस्त, सामाजिक मूल्ये आणि जबाबदार नागरिकत्वाची भावना रुजविण्याचे मोठे काम सातत्याने केले जात आहे. भविष्यातही अशा विविध समाजाभिमुख उपक्रमांच्या माध्यमातून  कोणाचेही खच्चीकरण होऊ न देता त्यांना योग्य प्रोत्साहन व मार्गदर्शन करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

Total Visitors :
4602486
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *