जागतिक स्तरावर रत्नागिरीला उज्ज्वल करण्यासाठी प्रशासन कार्यरत :
८० व्या स्वातंत्र्यदिनी पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी मांडला जिल्ह्याच्या विकासाचा आलेख

Gramin Varta
4 Views

५२ हजार ६२८ शेतकऱ्यांना ९८ कोटी ४४ लाखांची थेट मदत ; ३० कोटींचे क्रीडा संकुल

रत्नागिरी : भारताच्या ८०व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त रत्नागिरीच्या पोलीस परेड मैदानावर आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळ्यात पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी जिल्ह्याच्या विकासाचा वेगवान आलेख जनतेसमोर मांडला. विमानसेवा, पर्यटन, उद्योग, रोजगार, आरोग्य, शिक्षण, क्रीडा आणि शेतकरी हिताच्या विविध योजनांची माहिती देताना रत्नागिरीला जागतिक स्तरावर उज्ज्वल करण्यासाठी प्रशासन नागरिकांच्या सहकार्याने कार्यरत असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

पालकमंत्री डॉ. सामंत यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा पार पडला. यावेळी जिल्हाधिकारी मनुज जिंदल, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक बाबुराव महामुनी, जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता केंद्रे, नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे, अपर जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांच्यासह विविध अधिकारी, पदाधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

‘प्रशासन आपल्या दारी’ हा मंत्र घेऊन जिल्हा प्रशासनाने लोकाभिमुख कारभाराचा नवा आदर्श निर्माण केल्याचे पालकमंत्री डॉ. सामंत यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराच्या माध्यमातून यावर्षी १ लाख १७ हजार ९०७ लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ देण्यात आला असून, त्यामध्ये १ हजार ३२३ महिलांना ‘शेतकरी महिला’ म्हणून प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

जिल्हा नियोजन समितीचा गतवर्षीचा ४०६ कोटी रुपयांचा निधी शंभर टक्के खर्च झाला असून, यंदा शासनाने जिल्ह्यासाठी ४३९ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. ग्रामपंचायतींच्या विकासासाठी १०० कोटी रुपयांचा निधी वितरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ग्रामीण भागातील गुणवंत विद्यार्थ्यांमधील टॅलेंट शोधून त्यांना थेट इस्रो आणि नासा येथे पाठविण्याचा देशातील पहिला यशस्वी उपक्रम रत्नागिरी जिल्ह्यात राबविण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले.

रत्नागिरी विमानतळाच्या सर्व परवानग्या पूर्ण झाल्या असून, येत्या दोन ते तीन महिन्यांत रत्नागिरीहून मुंबई आणि पुण्यासाठी विमानसेवा सुरू होण्याची शक्यता असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. भाट्यामध्ये सी-प्लेन सेवा, हाऊसबोट टर्मिनल आणि पंचतारांकित हॉटेल उभारण्याचे नियोजन आहे. तरुणांसाठी ग्रीन स्टील प्रकल्प, शिप बिल्डिंग, सीएनजी गॅस आणि डिफेन्स क्लस्टर यांसारखे प्रकल्प उभारण्याच्या दिशेने प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी काजू बोंडापासून ज्यूस निर्मितीचा उद्योग सुरू करण्यात येणार असून, सुमारे २५ कोटी रुपये खर्चाचे अद्ययावत मत्स्यालय आणि देशातील मातृभाषेवरील पहिले संग्रहालय रत्नागिरीत साकारण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

आरोग्य क्षेत्रातील कामांवरही पालकमंत्र्यांनी प्रकाश टाकला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील बाह्यरुग्ण विभागातील रुग्णसंख्या ४०० वरून ९०० पर्यंत वाढली असून, उद्यमनगर येथे ३० खाटांचे अत्याधुनिक आयुष रुग्णालय उभारण्यात येत आहे. रत्नागिरीत बीएस्सी नर्सिंग अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच सुमारे १५० कोटी रुपये खर्चातून पोलीस अधीक्षकांचे अद्ययावत कार्यालय आणि पोलिसांच्या निवासस्थानांची उभारणी करण्यात येत असून, सहा महिन्यांत त्याचे उद्घाटन होईल, असे त्यांनी सांगितले.

जिल्ह्यातील तरुणांना व्यसन आणि अंमली पदार्थांपासून दूर ठेवण्यासाठी पोलीस दलाकडून कठोर कारवाई सुरू आहे. अंमली पदार्थांच्या कारवाईत आतापर्यंत ५० आरोपींना अटक करण्यात आली असून १२ जणांना हद्दपार करण्यात आले आहे. आणखी १२ जण हद्दपारीच्या प्रक्रियेत असल्याची माहिती पालकमंत्र्यांनी दिली. रत्नागिरी जिल्हा अंमली पदार्थमुक्त करण्यासाठी सुरू असलेल्या मोहिमेत नागरिकांनीही सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

शेतकऱ्यांसाठीही विविध उपाययोजना करण्यात येत असल्याचे डॉ. सामंत यांनी सांगितले. पावसाची अचूक नोंद मिळण्यासाठी आता प्रत्येक गावात पर्जन्यमापक यंत्र बसविण्यात येणार आहे. अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या आंबा आणि काजू बागायतदारांना मोठा दिलासा देत ५२ हजार ६२८ शेतकऱ्यांच्या खात्यात तब्बल ९८ कोटी ४४ लाख रुपयांची नुकसानभरपाई थेट जमा करण्यात आली आहे. एमआयडीसीमध्ये ३० कोटी रुपये खर्चून उभारण्यात येत असलेले क्रीडा संकुल येत्या तीन महिन्यांत सुरू होईल, अशी माहितीही त्यांनी दिली. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ६ हजार १३६, तर मोदी आवास योजनेअंतर्गत ५ हजार ४१८ घरकुले पूर्ण झाल्याचे त्यांनी सांगितले.

ध्वजारोहणानंतर पालकमंत्री डॉ. सामंत यांनी परेडचे निरीक्षण केले. परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक अभिजित थोरात यांच्या नेतृत्वाखाली संचलन झाले. यामध्ये पोलीस मुख्यालयाची तीन पथके, महिला पोलीस पथक, पोलीस बँड पथक, जिल्हा गृह रक्षक दल, महिला गृह रक्षक दल, ॲलेक्स श्वान पथक, जवाहर नवोदय विद्यालयातील स्टुडंट पोलीस कॅडेट, अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका पथक सहभागी झाले.

स्वातंत्र्य दिनाच्या मुख्य सोहळ्यात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. पोलीस अतिउत्कृष्ट सेवा पदक तसेच उत्कृष्ट सेवा पदक प्राप्त अधिकारी आणि अंमलदारांचा सन्मान करण्यात आला. तसेच पूर्व उच्च प्राथमिक, प्राथमिक आणि माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचाही पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

“रत्नागिरीचे नाव जागतिक स्तरावर उज्ज्वल करण्यासाठी प्रशासन जीव ओतून काम करत आहे. या विकास प्रक्रियेत नागरिकांचा सहभाग आणि सहकार्य अत्यंत महत्त्वाचे आहे,” असे सांगत पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी जिल्ह्यातील नागरिकांना ८०व्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

Total Visitors :
4702699
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *