मनसेचे रुपेश जाधव यांचा आरोप, रस्त्यावर उतरून जाब विचारण्याचा इशारा
रत्नागिरी : शहरातील माळनाका येथील स्कायवॉकच्या ठिकाणी आर्ट गॅलरी उभारण्याचे काम सध्या सुरू असून, या कामावरून विरोधकांनी आक्षेप घेतला आहे. माळनाका येथे उभारण्यात आलेल्या स्कायवॉकसाठी तब्बल २ कोटी रुपये खर्च करण्यात आले. त्यानंतर आता त्याच ठिकाणी आर्ट गॅलरी उभारण्यासाठी पुन्हा मोठा खर्च केला जात असल्याने हा जनतेच्या पैशांचा अपव्यय असल्याचा आरोप मनसेचे तालुकाध्यक्ष रुपेश जाधव यांनी केला आहे.
माळनाका येथील स्कायवॉकच्या ठिकाणी आर्ट गॅलरी उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामाबाबत मनसेचे तालुकाध्यक्ष रुपेश जाधव यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. माळनाका येथे उभारण्यात आलेल्या स्कायवॉकसाठी सुमारे २ कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. हा स्कायवॉक परिसरातील नागरिक आणि विद्यार्थ्यांसाठी उभारण्यात आला होता. मात्र, त्यानंतर आजतागायत या स्कायवॉकचा अपेक्षित वापर होत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
स्कायवॉकवरून नागरिक आणि विद्यार्थी मोठ्या प्रमाणात ये-जा करतील, अशी अपेक्षा होती. मात्र, आता श्वानही जात नसल्याचा उपरोधिक टोला रुपेश जाधव यांनी लगावला. अशा परिस्थितीत पुन्हा त्याच ठिकाणी लाखो रुपये खर्च करून आर्ट गॅलरी उभारण्याचे काम सुरू असल्याने या खर्चाचे औचित्य काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
रत्नागिरी नगरपरिषद आधीच कर्जबाजारी असताना शहराच्या सुशोभीकरणाच्या नावाखाली जनतेच्या पैशांची उधळपट्टी सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला. नागरिकांच्या पैशांचा अशा प्रकारे वापर होत असेल आणि प्रस्तावित आर्ट गॅलरीचा प्रकल्प अपेक्षेप्रमाणे यशस्वी झाला नाही, तर त्याचा जाब विचारण्यासाठी रस्त्यावर उतरू, असा इशाराही रुपेश जाधव यांनी दिला आहे.
शहराच्या विकासासाठी निधी खर्च करताना त्याचा उपयोग नागरिकांना प्रत्यक्षात किती होणार आहे, याचा विचार करणे गरजेचे आहे. आधीच मोठा खर्च करून उभारलेल्या स्कायवॉकचा पुरेसा वापर होत नसताना त्याच परिसरात आणखी एका प्रकल्पासाठी निधी खर्च करण्याची गरज काय, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे.
आधीच रत्नागिरी नगर परिषद कर्जबाजारी असताना आर्ट गॅलरी कशाला? जनतेच्या पैशांची चाललेय लूट?
Leave a Comment





