१२ लाख रुपये, ११ तोळे सोने दिले; तरीही ५ लाखांसाठी छळ… अखेर विवाहितेने घेतले टोकाचे पाऊल

Gramin Varta
525 Views

बीड : लग्नात १२ लाख रुपये आणि ११ तोळे सोने देऊनही सासरच्या मंडळींची पैशाची हाव संपली नाही. पतीला नोकरी लावण्यासाठी माहेरहून आणखी पाच लाख रुपये आणावेत, यासाठी विवाहितेचा शारीरिक आणि मानसिक छळ करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार बीड जिल्ह्यातील घाटनांदूर येथे समोर आला आहे. या सततच्या जाचाला कंटाळून विवाहितेने घरात ओढणीने गळफास घेत जीवन संपविल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

दीक्षा फुलारी असे मृत विवाहितेचे नाव आहे. या प्रकरणी दीक्षाचा भाऊ अशोक फुलारी यांच्या तक्रारीवरून तिचा पती अजित फुलारी, सासू चंचला फुलारी, सासरे बापूराव फुलारी आणि नणंद शुभांगी फुलारी यांच्याविरोधात अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दीक्षा हिचे २०२० मध्ये अजित फुलारी याच्याशी लग्न झाले होते. लग्नावेळी १२ लाख रुपये आणि ११ तोळे सोने देण्यात आले होते. अजितला स्टेनोची नोकरी लागणार असल्याचे त्यावेळी सांगण्यात आले होते. मात्र, त्याला नोकरी मिळाली नाही. लग्नाला एक वर्ष झाल्यानंतर पतीला नोकरी लावण्यासाठी माहेरहून पाच लाख रुपये आणावेत, यासाठी दीक्षेकडे सासरच्या मंडळींकडून तगादा सुरू झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

पाच लाख रुपयांची मागणी पूर्ण होत नसल्याने दीक्षेला शिवीगाळ करणे, उपाशी ठेवणे, बेदम मारहाण करणे तसेच तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन मानसिक त्रास देण्यात आल्याचा आरोप आहे. पैशांसाठी सुरू असलेल्या या सततच्या छळामुळे दीक्षा मानसिकदृष्ट्या त्रस्त झाली होती. अखेर या जाचाला कंटाळून तिने घरात ओढणीचा गळफास घेत टोकाचे पाऊल उचलले.

या घटनेनंतर दीक्षाच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, हुंड्यासाठी विवाहितेचा छळ करून तिला जीवन संपविण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. या प्रकरणी अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

हुंड्यासाठी विवाहित महिलांचा छळ आणि त्यातून टोकाचे पाऊल उचलण्याच्या घटना सातत्याने समोर येत असल्याने समाजात चिंता व्यक्त होत आहे. विवाहानंतरही पैशांसाठी महिलांचा छळ करण्याची मानसिकता संपविण्याची गरज असून, अशा प्रकरणांमध्ये दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी होत आहे.

Total Visitors :
4723685
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *