गुहागर तालुक्यात रामरक्षा महाआरतीचा जागर; भास्कर जाधवांचा हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून घणाघात
गुहागर : प्रभू श्रीराम यांच्या नावाचा वापर करून भाजपने सत्ता मिळवली; मात्र त्यांची श्रद्धा प्रभू रामचंद्रांवर किंवा हिंदुत्वावर नसून केवळ मतांवर असल्याचा आरोप शिवसेना नेते तथा आमदार श्री. भास्करराव जाधव यांनी केला. रामरक्षा महाआरती कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख श्री. विक्रांत जाधव यांच्या पुढाकाराने गुहागर मतदारसंघात विविध गावांत रामरक्षा व महाआरती कार्यक्रम भाविकांच्या मोठ्या उपस्थितीत सुरू आहेत. चिपळूण तालुक्यातील रामपूर, खरवते, गांग्रई, खेड तालुक्यातील चोरवणे, धामणंद, गुहागर तालुक्यातील असगोली, नवानगर, पालपेणे, मुसलोंडी, पिंपर आदी ठिकाणी झालेल्या कार्यक्रमांना राम भक्तांची मोठी गर्दी उसळली होती.
यावेळी जाधव म्हणाले की, पूर्वी भाजपचा कोणी ‘जय श्रीराम’ म्हटल्यावर लोक ‘पहिले लेगा दाम, बाद में करेगा काम’ असे म्हणत होते. आता मात्र ‘घे दान आणि दे मतदान’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. भाजपकडे एवढा प्रचंड पैसा आला कुठून, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. देवाच्या दरबारातील दान चोरून तेच पैसे लोकांना वाटण्याचा प्रकार सुरू असून हा प्रकार लोकशाहीसाठी घातक असल्याचे त्यांनी म्हटले.
राम मंदिराच्या उभारणीसाठी हिंदूंसह मुस्लिम आणि विविध जाती-धर्माच्या नागरिकांनी योगदान दिले. मात्र मंदिराच्या उभारणीचे संपूर्ण श्रेय भाजपने घेतल्याचा आरोप जाधव यांनी केला. मंदिराचे उद्घाटन, कलशारोहण आणि ध्वजारोहणाच्या कार्यक्रमांना सिने कलाकारांना आमंत्रित करण्यात आले; मात्र चारही धर्मपीठांपैकी एकाही शंकराचार्यांना आमंत्रित करण्यात आले नाही, असेही त्यांनी सांगितले.
“राम मंदिराचे सगळे श्रेय तुम्ही घेतले असेल, तर मंदिरात झालेल्या कथित हजारो कोटींच्या चोरीची जबाबदारीही तुम्हीच घ्यायला हवी,” असे जाधव म्हणाले. भाजपकडून वारंवार हिंदू-मुस्लिम मुद्दा उपस्थित केला जातो; मात्र मंदिरातील कथित गैरव्यवहार मुस्लिमांनी केला नसून संबंधित व्यवस्थेने नेमलेल्या व्यक्तींवरच प्रश्न उपस्थित होत असल्याचे त्यांनी नमूद केले. मंदिर उभारणीसाठी सर्वसामान्यांचा हातभार लागला असल्याने या प्रकरणाचा जाब विचारण्याचा अधिकार जनतेला असल्याचे त्यांनी सांगितले.
बाबरी मशिदीच्या जागी राम मंदिर उभारण्यासाठी काँग्रेसच्या काळात वटहुकूम काढला गेला नाही, अशी टीका भाजपकडून केली जाते. मात्र १९९६ ते २००४ या कालावधीत भाजप सत्तेत असतानाही वटहुकूम काढण्यात आला नाही. अखेरीस न्यायालयाच्या निर्णयानंतर मंदिराचा मार्ग मोकळा झाला. तसेच तत्कालीन पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांनी श्रीरामांची पूजा करण्यास परवानगी दिली होती, ही बाब भाजपकडून सांगितली जात नसल्याचेही जाधव यांनी म्हटले.
“भाजपच्या पापाचा घडा आता भरला आहे. ज्या प्रभू रामांचे नाव घेऊन ते सत्तेवर आले, त्या प्रभू रामचंद्रांच्या नावावरूनच त्यांना आता सत्तेवरून पायउतार केल्याशिवाय जनता राहणार नाही,” असा दावा आमदार भास्करराव जाधव यांनी केला.
या कार्यक्रमांमध्ये जिल्हाप्रमुख श्री. विक्रांत जाधव यांच्या प्रभावी भाषणांची सर्वत्र चर्चा होत आहे.
रामाच्या नावावर सत्ता, मंदिरातील गैरव्यवहाराची जबाबदारीही भाजपने घ्यावी : भास्करराव जाधव
Leave a Comment




