दापोली (प्रतिनिधी): आधुनिक संगीताच्या वाढत्या प्रभावात पारंपरिक वाद्यकला लोप पावत असतानाच, कोकणच्या लोकसंस्कृतीची खरी ओळख असलेल्या सनई वादनाला आता जागतिक स्तरावर सर्वोच्च मानाचे स्थान लाभले आहे. दापोली तालुक्यातील इळणे गावचे सुपुत्र आणि नामवंत सनई वादक श्री. संदेश मुरुडकर यांनी सलग (नॉन-स्टॉप) सनई वादन सादर करत थेट जागतिक क्रमवारीत प्रथम क्रमांक पटकावून एक नवा इतिहास रचला आहे. इळणे गावच्या मातीतून सुरू झालेला हा सांगीतिक प्रवास आज सातासमुद्रापार पोहोचल्याने संपूर्ण महाराष्ट्रासह रत्नागिरी जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला असून, कोकणातील पारंपरिक लोकजीवनाचा गौरव जागतिक पटलावर अधोरेखित झाला आहे.
कोकणातील प्रत्येक सण-समारंभ, लग्नसोहळा आणि धार्मिक उत्सवाचा प्राण मानला जाणारा ‘खालू बाजा’ आणि पारंपरिक वाद्ये ही केवळ मनोरंजनाची साधने नसून ती या मातीची सांस्कृतिक ओळख आहेत. मात्र, बदलत्या जीवनशैलीत युवा पिढी अशा पारंपरिक वाद्यकलांपासून काहीशी दुरावत असताना, संदेश मुरुडकर यांनी प्रस्थापित केलेला हा जागतिक विक्रम नव्या पिढीसाठी अत्यंत दिशादर्शक आणि प्रेरणादायी ठरला आहे. परंपरा केवळ जुनी आठवण म्हणून न ठेवता तिला व्यावसायिक दर्जा, डिजिटल प्लॅटफॉर्म, आंतरराष्ट्रीय महोत्सव आणि आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन जागतिक स्तरावर उभे करता येते, हे मुरुडकर यांच्या या दैदीप्यमान यशाने सिद्ध केले आहे.
गावाच्या मातीत रुजलेल्या वाद्यकलेला आंतरराष्ट्रीय स्तरावर सन्मान मिळवून देणाऱ्या या अद्वितीय कामगिरीबद्दल श्री. संदेश मुरुडकर यांच्यावर दापोलीसह संपूर्ण कोकणातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या ऐतिहासिक यशाने केवळ एका कलाकाराचा वैयक्तिक सन्मान केलेला नसून, भारतीय पारंपरिक वाद्यकलेला नवी झळाळी देत भविष्यात युवा कलाकारांसाठी जागतिक संधींची नवी दालने खुली केली आहेत.






