गणपतीपुळे / वैभव पवार :जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गणपतीपुळे येथील समुद्रकिनारा गुरुवार, ३ सप्टेंबरपासून पुन्हा बंद करण्यात आला आहे. समुद्राची धोकादायक स्थिती अद्याप कायम असल्याने रत्नागिरीचे जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्या सूचनेनुसार हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती गणपतीपुळे ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी प्रवीण चौधरी यांनी दिली.
गणपतीपुळे समुद्रकिनारा मागील दोन महिन्यांपासून समुद्राच्या धोकादायक स्थितीमुळे पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आला होता. तब्बल ६० दिवसांच्या प्रतीक्षेनंतर सुमारे आठवडाभरापूर्वी समुद्रकिनारा पर्यटकांसाठी खुला करण्यात आला होता. त्यामुळे स्थानिक ग्रामस्थांसह पर्यटकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, समुद्रातील धोकादायक परिस्थिती अद्याप कायम असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी पुन्हा समुद्रकिनारा बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या.
समुद्रकिनारा दीर्घकाळ बंद असल्याने स्थानिक व्यावसायिक आणि ग्रामस्थांमध्ये नाराजी होती. याच पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी झालेल्या गणपतीपुळे ग्रामपंचायतीच्या विशेष ग्रामसभेत बीच पुन्हा सुरू करण्याची आग्रही मागणी करण्यात आली होती. ग्रामस्थांच्या मागणीची दखल घेत समुद्रकिनारा सुरू करण्यात आला होता. मात्र, अवघ्या दहा दिवसांतच पुन्हा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने ग्रामस्थ आणि पर्यटकांमध्ये नाराजीचे सूर उमटू लागले आहेत.
समुद्राची परिस्थिती सुरक्षित होईपर्यंत पर्यटकांनी समुद्रात उतरणे टाळावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
ब्रेकिंग : गणपतीपुळे बीच पुन्हा बंद; जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनंतर ग्रामपंचायतीचा निर्णय
Leave a Comment





