रत्नागिरीत पाच वर्षांच्या चिमुकल्यावर तीन मोकाट कुत्र्यांचा हल्ला; शरीरावर गंभीर जखमा

Gramin Varta
210 Views

रत्नागिरी : शहरातील डीएसपी बंगल्यालगतच्या पोलीस लाईन परिसरात शुक्रवारी सायंकाळी मोकाट कुत्र्यांनी पाच वर्षांच्या चिमुकल्यावर केलेल्या हल्ल्याने खळबळ उडाली. घराबाहेर खेळत असलेल्या प्रणव राम खेंडेकर याच्यावर अचानक तीन भटक्या कुत्र्यांनी झडप घातली. कुत्र्यांनी त्याला खाली पाडून चावा घेतल्याने त्याच्या शरीरासह हात व पायाला गंभीर दुखापत झाली आहे. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

प्रणव खेंडेकर याचे वडील राम खेंडेकर हे पोलीस दलात कार्यरत असून, त्यांचे कुटुंब पोलीस लाईन परिसरात वास्तव्यास आहे. शुक्रवारी सायंकाळी सुमारे चार वाजण्याच्या सुमारास प्रणव घराबाहेर खेळत असताना परिसरात फिरणाऱ्या तीन मोकाट कुत्र्यांनी त्याच्यावर हल्ला केला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे चिमुकला जमिनीवर कोसळला आणि कुत्र्यांनी त्याला लक्ष्य केले.

हल्ल्यात सापडलेल्या प्रणवने आरडाओरड सुरू केल्यानंतर त्याचा आवाज ऐकून कुटुंबीय तसेच परिसरातील नागरिक घटनास्थळी धावून आले. नागरिकांनी प्रसंगावधान राखत कुत्र्यांना दूर हाकलून लावत चिमुकल्याची सुटका केली. वेळीच मदत मिळाल्याने मोठी दुर्घटना टळली. हल्ल्यात जखमी झालेल्या प्रणवला तत्काळ रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, त्याच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत.

दरम्यान, या घटनेमुळे पोलीस लाईन परिसरातील पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रत्नागिरी शहरात मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढत असून, लहान मुले तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मोकाट कुत्र्यांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण मिळविण्यासाठी नगरपालिकेकडून ठोस उपाययोजना होत नसल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.

चिमुकल्यावर झालेल्या या हल्ल्यानंतर नागरिकांनी नगरपालिका प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली आहे. मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी आणखी किती गंभीर घटना घडण्याची प्रतीक्षा प्रशासन करणार, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. बैठका आणि आश्वासनांपुरती कारवाई मर्यादित न ठेवता मोकाट कुत्र्यांच्या समस्येवर तातडीने प्रत्यक्ष उपाययोजना करावी, अशी मागणी रत्नागिरीकरांतून जोर धरू लागली आहे.

Total Visitors :
4805291
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *