मुंबई-गोवा महामार्गाच्या सर्व्हिस रोडवर जीवघेणा खड्डा; लांजा कुंभारवाडीत अपघाताचे सावट, प्रशासनाचे दुर्लक्ष

Gramin Varta
132 Views

लांजा (अरबाज नेवरेकर): मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील लांजा-कुक्कुटपालन-कुंभारवाडी परिसरातील सर्व्हिस रोडवर पडलेला भलामोठा खड्डा सध्या वाहनचालकांसाठी कर्दनकाळ ठरत असून, हा मार्ग अपघातांना थेट निमंत्रण देत आहे. पावसाच्या पाण्याने हा खड्डा तुडुंब भरत असल्याने रस्त्यावरील खड्ड्याचा अंदाज येत नसून, नेमका किती खोल खड्डा आहे हे समजेनासे झाल्याने विशेषतः दुचाकीस्वारांचा जीव टांगणीला लागला आहे. वेगाने येणाऱ्या दुचाकींचे चाक अचानक खड्ड्यात आदळून वाहनावरील नियंत्रण सुटण्याचे आणि दुचाकीस्वार रस्त्यावर आदळून गंभीर जखमी होण्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत.

दिवसाप्रमाणेच रात्रीच्या वेळी या मार्गावरील प्रवास अधिकच जीवघेणा ठरत आहे. काळोखाचे साम्राज्य, सतत कोसळणाऱ्या पावसाचे पाणी आणि त्यात रस्ता गिळंकृत करणारा हा खड्डा यामुळे वाहनचालकांना रस्त्याची अचूक दिशा समजणे कठीण होत आहे. दररोज शेकडो वाहनांची सतत वर्दळ असणाऱ्या या मोक्याच्या सर्व्हिस रोडची अशी दुरवस्था झालेली असतानाही, संबंधित प्रशासकीय यंत्रणा मात्र अजूनही सुस्त बसल्याचे चित्र आहे. त्यामुळे स्थानिक नागरिक व प्रवाशांमधून तीव्र संताप व्यक्त होत असून, येथे एखादा मोठा प्राणघातक अपघात घडण्याची वाट प्रशासन पाहत आहे का, असा संतप्त सवाल विचारला जात आहे. एखादी गंभीर दुर्घटना घडण्यापूर्वीच संबंधित विभागाने तत्काळ जागे होऊन या खड्ड्याची कायमस्वरूपी दुरुस्ती करावी आणि सर्व्हिस रोड सुरळीत करावा, अशी एकमुखी मागणी आता जोर धरू लागली आहे.

Total Visitors :
4819981
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *