कोकणातील संस्कृती जपण्यासाठी शासन कटिबद्ध : आशिष शेलार

Gramin Varta
86 Views

चिपळूण: राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशीष शेलार यांनी कोकणातील दुर्लक्षित लोककलांच्या संवर्धनासाठी शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली. लोककलांच्या अनुदानात दुप्पट वाढ करण्यात आल्याची घोषणा त्यांनी चिपळूण येथील पत्रकार परिषदेत केली.

नमन आणि जाकडी या पारंपरिक लोककलांचा नव्याने अनुदान योजनेत समावेश करण्यात आला असून प्रत्येक प्रयोगासाठी ५० हजार रुपयांचे अनुदान दिले जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात सांस्कृतिक केंद्रे व नाट्यगृहांची आवश्यकता लक्षात घेऊन लवकरच मुंबईत बैठक घेण्यात येणार असून, त्यानंतर आवश्यक त्या ठिकाणी नवीन नाट्यगृहे उभारण्याचा निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी त्यांनी वाशिष्ठी डेअरीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रकल्प उभारणारे प्रशांत यादव यांचे अभिनंदन केले. नागपूर येथे सुरू असलेल्या उद्धव ठाकरे यांच्या रामरक्षा आंदोलनाबाबत विचारले असता, जो कोणी रामरक्षा म्हणेल त्याला सुबुद्धी मिळेल. आतापर्यंत घेतलेले आणि यापुढे घेण्यात येणारे निर्णय चांगले होवोत, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

राजकीय घडामोडींवर बोलताना जयंत पाटील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीचे स्वागत करत, दूध आणि दही एकत्र आले, ही चांगली बाब, अशी मिश्कील टिप्पणी त्यांनी केली. शरद पवार यांच्या खासदारांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेबाबत बोलताना, चर्चेत असलेल्या विषयांवर सध्या भाष्य करणे योग्य ठरणार नाही. योग्य वेळी भूमिका स्पष्ट होईल, असे ते म्हणाले. शरद पवार एनडीएमध्ये सहभागी होणार की राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण होणार, याबाबत आपल्याला कोणतीही माहिती नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कोकणातील भाजपची ताकद जनसंघाच्या काळापासून असल्याचे सांगत सेवा हेच पक्षाचे प्रमुख ध्येय असल्याचे त्यांनी नमूद केले. कोकणात सातत्याने घडणाऱ्या दरडी कोसळण्याच्या घटनांबाबत पालकमंत्री उदय सामंत यांच्याशी चर्चा झाल्याची माहिती देत प्रशासनाकडून परिस्थितीचा सातत्याने आढावा घेतला जात असून आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले.मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे कामही लवकरच पूर्ण होईल, असा विश्वास शेलार यांनी यावेळी व्यक्त केला.

यावेळी जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव, दीपक पटवर्धन, चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी स्वप्ना यादव, सीमा यादव, प्रमोद जठार, सतीश मोरे आदी उपस्थित होते.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *