जयगड येथे किरकोळ कारणावरून तरुणाला बेदम मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

Gramin Varta
352 Views

रत्नागिरी: मस्करी करत असताना हाताला धक्का लागल्याच्या किरकोळ कारणावरून दोन तरुणांनी एकाला लाकडी बांबू व दगडाने मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी जयगड पोलीस स्थानकात दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना २१ जून रोजी रात्री १०.०० वाजण्याच्या सुमारास महिंद्रा लेबर कॉलनी (ता. जि. रत्नागिरी) येथे घडली. फिर्यादी चंद्रप्रकाश ओमप्रकाश चौधरी (वय २४) आणि साक्षीदार विकास विश्वकर्मा हे आपल्या खोलीसमोर जेवण बनवत असताना आपापसात मस्करी करत होते. यावेळी जवळच खाटेवर झोपलेला आरोपी रामलखन निसाद याच्या अंगाला फिर्यादीचा हात चुकून लागला.

याचा राग आल्याने रामलखन निसाद याने फिर्यादीला शिवीगाळ करत, “तुमच्याकडेच माणसे आहेत का? माझ्याकडे ४० माणसे आहेत, दाखवू का?” अशी धमकी दिली. त्यानंतर त्याने राजकुमार निसाद याला बोलावून फिर्यादीला दगडाने मारून दुखापत केली, तर राजकुमार निसाद याने लाकडी बांबूने मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता या दोघांनी तिथे उपस्थित असलेल्या साक्षीदारांनाही लाकडी दांड्याने मारहाण केली आणि फिर्यादीच्या खोलीचा दरवाजा तोडून नुकसान केले. या प्रकरणी २२ जून रोजी सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास जयगड पोलीस करत आहेत.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *