दापोलीत अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटनांनी संताप; सर्वपक्षीय नेत्यांसह नागरिकांचे पोलिसांना निवेदन, कठोर कारवाईची मागणी

Gramin Varta
226 Views

दापोली : तालुक्यात गेल्या काही दिवसांत अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या वाढत्या घटनांमुळे परिसरात भीतीचे आणि असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले असून, या प्रकरणांच्या निषेधार्थ तालुक्यातील विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि संतप्त नागरिकांनी एकत्र येत दापोली पोलीस निरीक्षकांना सर्वपक्षीय निवेदन सादर केले आहे. या गंभीर घटनांची दखल घेऊन दोषींवर तत्काळ कठोर कारवाई करावी आणि भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी प्रभावी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली. विद्यार्थिनी, पालक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, पोलीस प्रशासनाने अधिक प्रभावी गस्त आणि देखरेख वाढवून सुरक्षिततेची भावना निर्माण करावी, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

दापोली तालुक्यात एसटी प्रवासादरम्यान घडलेल्या अत्याचाराच्या घटनांचा आणि एमआयडीसी परिसरातील एका हॉटेलमध्ये अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराचा संदर्भ देऊन, संबंधितांवर आणि बेकायदेशीर कृत्यांना थारा देणाऱ्या ठिकाणांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनात शाळकरी मुलींच्या सुरक्षेसाठी व्यापक जनजागृती मोहीम राबविणे, सर्वपक्षीय बैठक आयोजित करणे आणि दोषींना कायद्याच्या चौकटीत राहून फाशीपर्यंतची शिक्षा मिळावी, यासाठी पाठपुरावा करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. दापोलीतील या गंभीर परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्वपक्षीय प्रतिनिधींनी प्रशासनाकडे तातडीने पावले उचलण्याची अपेक्षा व्यक्त केली असून, १२ जुलै २०२६ रोजी हे अधिकृत निवेदन पोलिसांकडे सादर करण्यात आले आहे. या आंदोलनामुळे दापोलीत महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा केंद्रस्थानी आला असून, आता पोलीस प्रशासन यावर काय कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *