देवरुख–पुणे एसटीची दुरवस्था; छत गळणाऱ्या बसमधूनच प्रवास, प्रवाशांच्या जीवाशी खेळ कधी थांबणार?

Gramin Varta
181 Views

देवरुख, प्रतिनिधी : देवरुख–पुणे (वल्लभनगर) या लांब पल्ल्याच्या मार्गावर धावणाऱ्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसची अत्यंत दयनीय अवस्था पुन्हा एकदा समोर आली आहे. दररोज रात्री ७:४५ वाजता देवरुख आगारातून सुटणाऱ्या बसच्या छतामधून प्रवासादरम्यान पावसाचे पाणी गळत असल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. सकाळी ७:४५ वाजता सुटणाऱ्या बसचीही स्थिती याचप्रमाणे जीर्ण असल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे.

लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी अशा मोडकळीस आलेल्या बस पाठवून प्रवाशांच्या सुरक्षिततेशी खेळ सुरू असल्याची तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या बसमधून दररोज ज्येष्ठ नागरिक, महिला, लहान मुले आणि नोकरी-व्यवसायानिमित्त प्रवास करणारे अनेक प्रवासी प्रवास करतात. मात्र पूर्ण तिकीट भाडे आकारूनही सुरक्षित व दर्जेदार सेवा देण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्याचा सवाल प्रवाशांनी उपस्थित केला आहे.

पावसाळ्यात बसच्या छतामधून गळणारे पाणी, जीर्ण झालेली बस आणि गैरसोयीच्या प्रवासामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. विशेषतः अनेक तासांच्या प्रवासात ही परिस्थिती अधिकच गंभीर बनत असून, एखादी दुर्घटना घडण्यापूर्वीच परिवहन महामंडळाने जागे होण्याची गरज असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

देवरुख आगाराने सकाळी ७:४५ आणि रात्री ७:४५ या दोन्ही देवरुख–पुणे (वल्लभनगर) फेऱ्यांसाठी तातडीने चांगल्या, सुरक्षित आणि सुस्थितीतील बस उपलब्ध करून द्याव्यात, अशी जोरदार मागणी प्रवाशांकडून करण्यात आली आहे. अन्यथा या प्रकरणाचे व्हिडिओ पुराव्यासह परिवहन मंत्री, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी आणि संबंधित प्रशासनाकडे अधिकृत तक्रार दाखल करण्यात येणार असल्याचा इशाराही प्रवाशांनी दिला आहे.

प्रवाशांकडून पूर्ण भाडे आकारले जात असताना सुरक्षित आणि दर्जेदार सेवा मिळणे हा त्यांचा मूलभूत हक्क आहे. त्यामुळे प्रवाशांच्या जीवाशी खेळ करणारी ही परिस्थिती तातडीने बदलून देवरुख–पुणे मार्गावर सक्षम आणि सुरक्षित बसची व्यवस्था करण्याची मागणी आता अधिक तीव्र झाली आहे.

Total Visitors :
4566150
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *