रत्नागिरीत कोकण विकास परिषद सभा संपन्न

Gramin Varta
30 Views

रत्नागिरी :- कोकणातील उपलब्ध संसाधने, पर्यावरण आणि येथील मनुष्यबळ कौशल्य यांचा विचार करुन भविष्यातील अपेक्षित कोकण विकास अपेक्षा विषयांवर एस.एम. जोशी सोशलिस्ट फाऊंडेशन पुणे यांच्या पुढाकाराने रत्नागिरी येथे एक व्यापक बैठक झाली.

  या सभेला पर्यावरण, जंगल संवर्धन, कृषी, मत्स्य, नारळ, काजू, बांबू, टुरिझम , बोटबांधणी, मेडिकल, शिक्षण , उद्योग, सामाजिक संस्था आदी विविध क्षेत्रातील तज्ञ आणि प्रत्यक्ष काम करणार्या जेष्ट आणि तरुणांचा मोठा सहभाग लाभला.

कोकणातीलरोजगाराच्या विविध संधी यांचा विचार करतांना या पश्चिम घाटाचा जागतिक वारसा असणारा नैसर्गिक अनमोल ठेवा जपणे यावर सर्वाधिक भर होता .
कोकणातील तरुणाईचे मायग्रेशन हा कळीचा मुद्दा गंभीर रुप धारण करत असतांना येथील उत्पादित क्षमतांना संशोधनात्मक शासकीय मदतीची मागणी अधिक प्रकर्षाने मांडली गेली.

कोकणातून बाहेर जाणारा पैसा रोखणारी वस्तू व सेवा निर्मिती वाढवणे आणि कोकणातून बाहेर जाणाऱ्या प्राथमिक उत्पादनांचे मुल्यवर्धन (Value addition) अशा दोन अंगानी बैठकीत चर्चा झाली.

फाऊंडेशन चे अध्यक्ष संविधान अभ्यासक मा. सुभाष वारे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यवाह उपेंद्र टण्णू यांच्या उपस्थितीत सभेचे आयोजन होते.

  नवनिर्माण शिक्षण संस्थेच्या एस एम जोशी विद्यानिकेतन मध्ये संपन्न झालेल्या कोकणला अपेक्षित कोकण विकास सभेत उपस्थितांचे स्वागत करतांना अभिजित हेगशेट्ये यांनी सांगितले गेल्या २५ वर्षात कोकणात येणारे प्रकल्प हे केमिकल उद्योग आणि उर्जा क्षेत्रातील आहेत. येथील पाणी, हवा, पर्यावरण यांची हानी करणारे. कोकण या प्रकल्पांना विरोध करतो म्हणून कोकणला विकास नको असा सुर लावला जातो . या परिस्थितीत कोकणला येथील पर्यावरण राखत कोणता आणि कसा विकास अपेक्षित आहे याची चर्चा करणारा हा प्लॅटफॉर्म आहे.

    जेष्ठ मार्गदर्शक नवनिर्माणचे उपाध्यक्ष डॅा. अलिमियॅा परकार यांनी या उपक्रमाचे स्वागत करत तरुणांच्या अपेक्षा आणि सहभागाबद्दल अधिक अपेक्षा असल्याचे मनोगत व्यक्त केले.

पर्यावरण जेष्ठ अभ्यासक प्रा. डॅा. बेर्डे यांनी कोकणातील क्लायमेट बदलाचा धोका, शेतीमधील मायक्रो प्लॅस्टिक चे आक्रमण , सीओटी उत्सर्जन आणि सेंद्रिय शेतीची गरज आणि कोकणातील संधी याबाबत शास्त्रीय परिमाणे सांगितली.

नारळ या क्षेत्रात गेली १२ वर्ष कामकरणारे तुषार आगरे यांनी नारळ कल्पवृक्ष आणि कोकण उद्योग फार महत्वपुर्ण माहिती दिली.

इटाली येथील मिटेनी शहरातील प्रदुषणग्रस्त हद्दपार केलेला  पीफा फॅारएव्हर या अत्यंत घातक रसायन उद्योग विरोधात सलग १७८ दिवस लोट्याच्या माळावर आंदोलन करणारे अशोक जाधव यांनी केमिकल पर्यावरण आणि उध्वस्त कोकण याची माहिती दिली.

मुंबईतून कोकणात परतणारे उद्योजक किशोर नारकर यांनी स्मॅाल स्केल इंडस्ट्री हब संकल्पना मांडत कोकण उत्पादक होऊ शकतो आणि येथेच रोजगार कसा देऊ शकतो ही संकल्पना मांडली.

  विनित विचारे या इंजिनिअर तरुणांने मुंबई सोडून कोकणकडे परतत बारसू आंदोलन ते येथील कातळ संशोधन माकडांचा प्रश्न , कोकणातील मुलांना लग्नासाठी मुली मिळणे आदी विविध सामाजिक प्रश्नांना स्पर्श करत येथील मानसिकतेच्या बदलाचा विचार मांडला.

मोहन नारकर यांनी बांबू हा कोकणचा विकासपर्वाचा महत्त्वाचा आधार आणि त्यावर असणारे काम यांची माहिती दिली.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या समुद्री आरमारात युध्दनौका बनविणारे निढळेवाडी येथील वाडकर कुटुंबांचे आजच्या पिढीतील तरुणांची कौशल्य आणि जपलेला इतिहास त्यातील उद्योग आणि टूरिझम याबाबत पृथ्वीराज वाडकर यांनी अनेक नव्या संकल्पना सांगितल्या.

दिर्घकाळ सहकारी काजू उद्योगातील जयवंत  विचारे यांनी या उद्योगात प्रचंड संधी आहे परंतू संशोधन आणि राजकीय इच्छाशक्ती अभाव , लाखो टन बोंडू फुकट जात आहेत.

फिशरीज संशोधक प्रा. डॅा. केतन चौधरी यांनी ३५० किमी समुद्राचा उपयोग अधिक प्रमाणात झाल्यास रोजगाराच्या अगणित संधी आहेत यांची माहिती देतांना  कोकणात पाण्याचे स्वतंत्र ४ स्त्रोत आहेत समुद्र, खाडी , नदी आणि नारळ यांवर आधारित लाखो रोजगार आणि उद्योग संधी आहेत ॲार्नमेंटल फिश, सी विड , ब्लॅकवॅाटर प्रॅाझ फार्मिंग यासारखी क्षेत्र आजही दुर्लक्षित आहेत.

वाया जाणारे गोळा करण्यास शिकु या हा संदेश युयुत्सू आर्ते यांनी दिला.

यावेळी राजन इंदुलकर, रुबीना चव्हाण, सुनिता गांधी, बिर्जे, अंकिता चौगुले, विराज भोसले  आदी अनेकांनी आपली मनोगते व्यक्त केली.

आपल्या अध्यक्षीय भाषणात सुभाष वारे यांनी ही सभा नवी माहिती देणारी आणि तरुणाईच्या विचारांचे प्रतिनिधित्व करणारी असल्याचे संबोधित करतांना पुढील काळात याची उत्तम बांधणी करत कोकण विकास प्रश्नावर व्यापक मांडणी करुन त्याचा पाठपुरावा करणारी सक्षम यंत्रणा उभारण्याचा मनोदय व्यक्त केला.
या छोट्याशा निमंत्रणाला मान देत इतक्या मोठ्या संख्येने सहभागी होत चर्चेत सक्रिय सहभागी झाल्याहद्दल आभार व्यक्त करण्यात आले.

एकमेकांच्या सहभागातून कोकण विकासाचा स्वतंत्र कोकणला अपेक्षित अजेंडा तयार करुन तो शासनाला करण्यास भाग पाडू या यासाठी या प्रवाहात अधिकाधिक सहकार्यांना जोडून घेण्याचे आवाहन यावेळी निमंत्रक अभिजित हेगशेट्ये यांनी केले.

Total Visitors :
4566167
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *