१८ वर्षांच्या रखडलेल्या महामार्गावर ठेकेदाराचा निकृष्ट कारभार उघड, दुर्घटनेची जबाबदारी कोण घेणार?
रत्नागिरी : मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावरील निवळी येथे गटारावरील काँक्रीटचा स्लॅब कोसळल्याने महामार्गाच्या कामातील निकृष्ट दर्जाचा आणखी एक नमुना समोर आला आहे.
तब्बल १८ वर्षांपासून रखडलेल्या या महामार्गावर कोट्यवधी रुपये खर्च होऊनही दर्जेदार काम होत नसल्याचा संताप नागरिकांनी व्यक्त केला आहे. ठेकेदारांच्या हलगर्जीपणाचा आणि निकृष्ट कामाचा फटका आता थेट सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे.
कोसळलेल्या स्लॅबवरून दररोज शेकडो नागरिकांची ये-जा असते. याच मार्गालगत शाळा असल्याने अनेक शाळकरी मुलेही या ठिकाणावरून रोज प्रवास करतात. धावताना एखादे मूल या उघड्या गटारात पडल्यास मोठी दुर्घटना घडू शकते. अशा गंभीर धोक्याकडे संबंधित ठेकेदार आणि यंत्रणांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
मुंबई–गोवा महामार्गाचे काम गेली १८ वर्षे सुरू असूनही अनेक ठिकाणी सेवा रस्ते अपूर्ण, गटारे धोकादायक, पुलांमध्ये त्रुटी आणि निकृष्ट दर्जाची कामे सातत्याने समोर येत आहेत. तरीही संबंधित ठेकेदारांवर कठोर कारवाई होत नसल्याने त्यांच्या निष्काळजीपणाला अभय मिळत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे.
सार्वजनिक पैशातून उभारल्या जाणाऱ्या महामार्गावर दर्जाहीन काम करून नागरिकांच्या जीवाशी खेळ करणाऱ्यांना नेमके कोण पाठीशी घालत आहे, असा संतप्त सवाल आता उपस्थित होत आहे.
अपघात घडल्यानंतर पंचनामे आणि चौकशा करण्यापेक्षा तातडीने कोसळलेला स्लॅब दुरुस्त करून संबंधित ठेकेदाराची जबाबदारी निश्चित करावी, निकृष्ट कामाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे. दुर्घटना घडण्याची वाट न पाहता प्रशासनाने तातडीने जागे होण्याची वेळ आता आली आहे.
निवळीत गटाराचा स्लॅब कोसळला; या ठेकेदाराच करायचं तरी काय?
Leave a Comment





