देवरूख/ नियाज खान: संत सेना नगरमधील श्री संत सेना महाराज समाज मंदिरात संगमेश्वर तालुका नाभिक समाज संघाची मासिक सर्वसाधारण सभा अत्यंत उत्साहात आणि खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. संघाचे अध्यक्ष अभिजित चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत समाजाच्या विविध प्रश्नांवर आणि आगामी उपक्रमांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
सभेची सुरुवात सचिव सिद्धेश मोरे यांनी उपस्थितांच्या स्वागताने केली. त्यानंतर समाजातील दिवंगत व्यक्तींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी स्वराज्यरक्षक नरवीर शिवा काशिद यांच्या शौर्याचे आणि बलिदानाचे स्मरण करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. सल्लागार राजेंद्र कदम यांनी शिवा काशिद यांचे बलिदान समाजबांधवासाठी कसे प्रेरणादायी आहे, यावर आपले विचार मांडले.
सभेत आगामी ८ सप्टेंबर २०२६ रोजी साजरा होणाऱ्या श्री संत सेना महाराज पुण्यतिथी सोहळ्याच्या नियोजनावर सविस्तर चर्चा झाली. हा सोहळा अत्यंत भक्तिभावाने, विविध धार्मिक, सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन करून साजरा करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. यासोबतच तालुक्यातील सलून व्यवसायातील अडीअडचणींवरही चर्चा झाली. वाढती महागाई विचारात घेऊन, आगामी १ सप्टेंबर २०२६ पासून ग्रामीण व शहरी भागातील केसकर्तनाच्या दरात योग्य ती वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण ठराव सभेत मंजूर करण्यात आला. दर वाढवत असतानाच ग्राहकांना उत्तमात उत्तम सेवा देण्याचे आवाहन अध्यक्ष अभिजित चव्हाण आणि उपाध्यक्ष सागर चव्हाण यांनी सर्व बांधवांना केले.
या सभेला तूरळ, आरवली, फुणगुस, निवे, पांगरी, अंत्रवली, मौजे असुर्डे आदी भागांतील पदाधिकारी व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेला उपाध्यक्ष सागर चव्हाण, खजिनदार संदीप अंब्रे, माजी अध्यक्ष परशुराम चव्हाण, सदस्य विनोद पवार, सल्लागार राजेंद्र कदम, प्रकाश पवार व सदानंद चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते. शेवटी दिनेश अंब्रे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
