मुंबई: अन्न व औषध प्रशासनाचे (एफडीए) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशानुसार राज्यभर भेसळखोर आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येत असून, गेल्या चार दिवसांत विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणावर धाडसत्र पार पडले आहे. या कारवाईत पानमसाला व गुटखा विक्री, वितरण आणि वाहतूक करणाऱ्या 49 जणांना अटक करण्यात आली असून, तब्बल 1 कोटी 80 लाख रुपये किमतीचा गुटखा आणि पानमसाल्याचा साठा जप्त करण्यात आला आहे. याशिवाय सुमारे 5 लाख 56 हजार रुपये किमतीचे 2 हजार 798 किलो अन्नपदार्थही जप्त करण्यात आले आहेत. दूध व दुग्धजन्य पदार्थांच्या तपासणीत दीड लाख रुपयांचे पावणे दोन हजार लिटर दूध जप्त करण्यात आल्याची माहिती एफडीएकडून देण्यात आली.
या विशेष मोहिमेदरम्यान राज्यातील 103 हॉटेल, रेस्टॉरंट, धाबे आणि इतर अन्न आस्थापनांची तपासणी करण्यात आली. तपासणीनंतर 34 आस्थापनांना सुधारणा नोटिसा बजावण्यात आल्या, तर अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी 16 आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले. राज्यभरात एकूण 53 धाडी टाकण्यात आल्या असून, या कारवाईत सुमारे 1 कोटी 85 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
कारवाईदरम्यान मुंबईतील गोवंडी येथील सुफी डेअरीमधून 1 हजार 683 लिटर दूध जप्त करण्यात आले. तपासणीत दुधाच्या साठवणुकीसंदर्भातील अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळून आले. लातूर जिल्ह्यातील रेणापूर येथील बेंगलोर अय्यंगार बेकरीमधून मावा जप्त करण्यात आला, तर बीड जिल्ह्यातील मोची पिंपळगाव येथे नोंदणीविना दूध विक्री करणाऱ्या विक्रेत्याकडून 25 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. धाराशिव जिल्ह्यातील पारा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत निकृष्ट दर्जाच्या सोयाबीन वड्या आढळून आल्याने त्या जप्त करून प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आल्या. तसेच सिन्नर येथील लक्ष्मी दूध आणि साईन दूध सेंटरवरही कारवाई करण्यात आली.
पुण्यातील मंगळवार पेठेतील स्टार केटरिंग सर्व्हिसमध्ये अस्वच्छता आढळून आल्याने एफडीएने तेथेही कारवाई केली. याशिवाय गोल्डन मॅजेस्टिक बेकरी, सिद्धार्थ अॅग्रो डेअरी, बिकांगे बिर्याणी एलएलपी, महाबळेश्वरमधील सह्याद्री रेस्टॉरंट अँड धाबा, सिगडी रेस्टॉरंट, सांगलीतील हळद भवन कॅन्टीन तसेच कल्याणीनगरमधील रेड अँड हस आस्थापनांवरही नियमभंगप्रकरणी कारवाई करण्यात आली. राज्यभर सुरू असलेली ही विशेष मोहीम पुढेही सुरू राहणार असून, अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा अन्न व औषध प्रशासनाने दिला आहे.
राज्यभरात एफडीएची धडक मोहीम; गुटखा विक्रीप्रकरणी 49 जण अटकेत, पावणे दोन कोटींचा साठा जप्त
Leave a Comment






