मुंबई: मध्य रेल्वेने प्रवाशांची वाढती मागणी आणि सोय लक्षात घेता तीन महत्त्वाच्या एक्सप्रेस गाड्यांमध्ये कायमस्वरूपी अतिरिक्त डबे जोडण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून त्यांना अधिक जागा उपलब्ध होणार आहेत.
लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगाव जंक्शन या मार्गावर धावणाऱ्या ११०९९/११०० या एक्सप्रेस गाडीला १७ आणि १८ जुलैपासून एक अतिरिक्त थ्री-टियर एसी डबा जोडण्यात येणार आहे. तसेच, लोकमान्य टिळक टर्मिनस ते कारमाळी दरम्यानच्या २२११५/२२११६ या एक्सप्रेस गाडीमध्ये २३ जुलैपासून अतिरिक्त थ्री-टियर एसी डब्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. याशिवाय, लोकमान्य टिळक टर्मिनस ते एर्नाकुलम जंक्शन दरम्यान धावणाऱ्या १२२२३/१२२२४ दुरंतो एक्सप्रेसमध्ये १८ आणि १९ जुलैपासून टू-टियर आणि थ्री-टियर एसी असे दोन अतिरिक्त डबे जोडले जाणार आहेत.
मध्य रेल्वेने यासंदर्भात अधिकृत माहिती देताना प्रवाशांना रेल्वेच्या अधिकृत चौकशी प्रणालीवर गाड्यांच्या वेळ आणि थांब्यांची माहिती घेण्याचे आवाहन केले आहे. तसेच, कोकण रेल्वेच्या ताज्या घडामोडींसाठी केआर मिरर (KR Mirror) ॲप वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे. वाढवलेल्या डब्यांच्या या निर्णयामुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सुकर होण्याची शक्यता आहे.
