रत्नागिरी शासकीय रुग्णालयाची मोठी वैद्यकीय कामगिरी: पाच वर्षीय चिमुकल्यावर दुर्मिळ ‘ब्रँकियल सिस्ट’ची यशस्वी शस्त्रक्रिया

Gramin Varta
271 Views

रत्नागिरी: रत्नागिरी शासकीय रुग्णालयात वैद्यकीय क्षेत्रातील एक दुर्मिळ आणि यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली आहे. येथील कान-नाक-घसा (ईएनटी) विभागाच्या प्रमुख डॉ. सुनिता बागे यांनी अवघ्या पाच वर्षांच्या चिमुकल्यावर ‘ब्रँकियल सिस्ट’ या दुर्मिळ जन्मजात विकाराची यशस्वी शस्त्रक्रिया करून त्याला नवजीवन दिले आहे. रत्नागिरी शासकीय रुग्णालयात अशा प्रकारची गुंतागुंतीची शस्त्रक्रिया प्रथमच झाली असून, ग्रामीण भागातील रुग्णांसाठी ही मोठी दिलासादायक बाब ठरली आहे.

‘ब्रँकियल सिस्ट’ हा एक जन्मजात विकार असून, गर्भावस्थेत मानेच्या भागातील ऊतींची वाढ पूर्ण न झाल्यामुळे तो निर्माण होतो. ही शस्त्रक्रिया अत्यंत आव्हानात्मक मानली जाते, कारण सिस्ट काढताना मानेतील महत्त्वाच्या रक्तवाहिन्या आणि मज्जातंतूना इजा होण्याचा मोठा धोका असतो. शस्त्रक्रियेदरम्यान हायपोग्लोसल, व्हॅगस किंवा फेशिअल मज्जातंतूंना इजा झाल्यास चेहरा किंवा मानेच्या स्नायूंच्या कार्यावर परिणाम होऊ शकतो. मात्र, डॉ. सुनिता बागे यांनी अत्यंत सूक्ष्म नियोजन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून संपूर्ण सिस्ट सुरक्षितपणे काढून टाकली.

या यशस्वी शस्त्रक्रियेमुळे बालकाच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा झाली आहे. विशेष म्हणजे, या संपूर्ण उपचार प्रक्रियेचा कोणताही आर्थिक भार संबंधित गरीब कुटुंबाला सहन करावा लागला नाही. शासकीय योजनांच्या माध्यमातून हे उपचार पूर्णपणे मोफत झाल्याने रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांनी समाधान व्यक्त केले आहे. शस्त्रक्रियेपूर्वी डॉ. बागे यांनी पालकांचे योग्य समुपदेशन केल्याने त्यांचा आत्मविश्वास वाढला होता.

या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेमध्ये भूलतज्ज्ञ डॉ. जमशीर शेख आणि डॉ. प्रियांका साळुंखे यांनी महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडली, तर बालरोग विभागातील परिचारिकांनी रुग्णाची काळजी घेतली. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी डॉ. सुनिता बागे यांचे विशेष अभिनंदन केले आहे. अधिष्ठातांच्या मार्गदर्शनामुळे आणि वैद्यकीय अधिक्षक डॉ. सांगवीकर यांच्या प्रोत्साहनामुळे ही उपचार प्रक्रिया यशस्वी झाल्याचे सांगण्यात येत आहे.

या यशामुळे रत्नागिरी शासकीय रुग्णालयाच्या वैद्यकीय सेवांवर सर्वसामान्यांचा विश्वास अधिक दृढ झाला असून, आता जटिल आजारांवरील उपचारांसाठी ग्रामीण भागातील रुग्णांना मोठ्या शहरांकडे धाव घेण्याची गरज उरलेली नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *