महाड-दापोली मार्गावर एसटी बस व ट्रकची समोरासमोर धडक; पाच जण जखमी

Gramin Varta
231 Views

महाड: महाड-दापोली राज्य मार्गावरील अपघातांची मालिका सुरूच असून, मंगळवारी सकाळी सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास कुर्ला दिवेकरवाडी येथे एसटी बस आणि आयशर ट्रक यांच्यात समोरासमोर धडक होऊन पाच जण जखमी झाले. यामध्ये एसटी बसमधील चार प्रवासी तसेच ट्रक चालकाचा समावेश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महाडकडे येणारी एमएच-२० बीएल-३७९५ क्रमांकाची एसटी बस कुर्ला दिवेकरवाडी येथून प्रवासी घेऊन महाडकडे निघाली होती. त्याचवेळी महाडहून दापोलीकडे जाणारा एमएच-०६ डब्ल्यू-६२१५ क्रमांकाचा आयशर ट्रक अवघड वळणावरील उतारात विरुद्ध दिशेने येत एसटी बसला समोरासमोर धडकला.

या अपघातात एसटीतील चार प्रवासी तसेच चालक व वाहक किरकोळ जखमी झाले. सर्व जखमींना तातडीने महाड ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दरम्यान, ट्रक चालकाच्या दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाल्याने त्याला पुढील उपचारासाठी महाड येथील डॉ. रानडे यांच्या खासगी रुग्णालयात हलविण्यात आले.

जखमी प्रवाशांमध्ये भूमिका बाबुराव कासारे (२१, रा. कुर्ले), काशीराम विठोबा कुळे (७७, रा. करंजाडी), पुष्पा प्रमोद यादव (४०, रा. कुर्ले) आणि प्रगती सुदेश कासारे (३०, रा. कुर्ले) यांचा समावेश आहे.

एसटी महामंडळाकडून जखमी प्रवाशांना प्रत्येकी ५०० रुपयांची तातडीची आर्थिक मदत देण्यात आली. उपचारानंतर सर्व प्रवाशांना घरी सोडण्यात आल्याची माहिती महाड आगार प्रमुख रितेश फुलपगारे आणि ऋतिक चिनके यांनी दिली.

Total Visitors :
4572128
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *