महाड: महाड-दापोली राज्य मार्गावर पावसाळ्याच्या आगमनासोबतच पुन्हा एकदा अपघातांचे सत्र सुरू झाले असून, आज दुपारी मुंबई सेंट्रल आगाराची फौजी अंबवडे-मुंबई एसटी बस रस्त्यावरून घसरून अपघातग्रस्त झाली. मुंबई सेंट्रल आगाराची ही बस आज दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास महाडच्या दिशेने येत असताना कुटले गावाजवळ चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि बस रस्त्यावरील साईडपट्टीवरून घसरून थेट बाजूला गेली.
अपघाताच्या वेळी बसमध्ये चालक-वाहकासह एकूण पाच प्रवासी प्रवास करत होते. सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झाली नाही आणि सर्व प्रवासी सुखरूप बचावले. या घटनेमुळे जीवितहानी टळली असली, तरी या राज्य मार्गाच्या निकृष्ट गुणवत्तेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. गेल्या वर्षीही पावसाळा सुरू होताच शिटगाव ते आंग्रे कोड दरम्यान वाहने घसरून अपघातांची मालिका सुरू झाली होती. यंदा पावसाचे आगमन उशिरा झाले असले, तरी पहिल्याच पावसात रस्ते निसरडे झाल्याने वाहने घसरण्याचे प्रकार पुन्हा सुरू झाले आहेत.
सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या रस्त्याच्या दुरुस्तीचे आणि गुणवत्तेचे दावे केले जात असले, तरी पहिल्याच पावसात रस्त्याची अवस्था उघड झाली आहे. या परिस्थितीमुळे स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांमधून तीव्र संताप व्यक्त होत असून, प्रशासनाने तातडीने योग्य उपाययोजना न केल्यास मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत.
