वारीदरम्यान भीषण दुर्घटना: दिंडीच्याच ट्रकची धडक; ३ महिला वारकऱ्यांचा मृत्यू

Gramin Varta
400 Views

पुणे: सासवड-जेजुरी मार्गावर आषाढी वारीसाठी निघालेल्या वारकऱ्यांच्या दिंडीला भीषण अपघाताचा फटका बसला असून, या दुर्घटनेत तीन महिला वारकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. रविवारी सकाळी बेलसर टोलनाक्यापासून जेजुरीच्या दिशेने सुमारे ५०० मीटर अंतरावर असलेल्या हॉटेल शिपदीप लॉजिंगसमोर ही हृदयद्रावक घटना घडली.

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, नांदेड जिल्ह्यातील लोहा येथील रंगनाथ महाराज पोखरबीसीकर यांच्या दिंडीचा ट्रक आणि सांगली जिल्ह्यातील कसबेडिगराज येथील दिंडीतील महिला वारकरी सासवड-जेजुरी मार्गावरून जात होत्या. याच दरम्यान दिंडीच्याच ट्रकने महिला वारकऱ्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात तीन महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, अन्य चार महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. जखमींना तातडीने जेजुरी येथील आयसीयू रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले असून, तिथे त्यांच्यावर वैद्यकीय पथकाकडून उपचार सुरू आहेत.

घटनेची माहिती मिळताच पुणे ग्रामीण पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी वाहतूक सुरळीत करत पंचनामा व इतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. या दुर्घटनेमुळे वारी मार्गावर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

लाखो वारकरी पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रमण करत असताना या अपघाताने सुरक्षिततेच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. वारी मार्गावर जड वाहनांची वाहतूक, वेग नियंत्रण आणि पोलीस बंदोबस्त याबाबतच्या नियोजनाची कमतरता समोर आली असून, अशा संवेदनशील मार्गावर अधिक सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्याची मागणी वारकरी संघटनांकडून केली जात आहे. आषाढी वारीच्या पवित्र प्रवासात घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे वारकरी संप्रदायात मोठी हळहळ व्यक्त होत आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *