दापोली: नवी मुंबईतील कोपरखैरणे पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या फसवणूक आणि बनावट कागदपत्रांच्या गंभीर गुन्ह्यातील मुख्य आरोपीला तब्बल सात वर्षांनंतर दापोली पोलिसांनी अटक केली आहे. शाम काशीनाथ सपकाळ असे या आरोपीचे नाव असून, तो दीर्घकाळापासून पोलिसांना गुंगारा देत होता. कोपरखैरणे पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३१६/२०१९ नुसार भादंवि कलम ४२०, ४०६, ४६४, ४६७, ४६८ आणि ३४ अंतर्गत हा गुन्हा दाखल होता. आरोपीने न्यायालयीन प्रक्रियेकडे वारंवार पाठ फिरवल्याने बेलापूर येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने त्याला फरार घोषित केले होते. दरम्यान, हा आरोपी दापोली तालुक्यात वास्तव्यास असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली.
या माहितीच्या आधारे दापोली पोलिसांनी स्थानिक पोलीस पाटलांच्या मदतीने सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. कायदेशीर सोपस्कार पूर्ण केल्यानंतर त्याला पुढील तपासासाठी कोपरखैरणे पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे. दीर्घकाळ फरार असलेल्या आरोपीला जेरबंद करण्यात दापोली पोलिसांना मिळालेले हे यश महत्त्वाचे मानले जात असून, या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
