दिल्ली: दिल्लीतील संसदेकडील आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ आणि सीजेपीच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रात्री उशिरा जंतरमंतर येथे हजेरी लावली. यावेळी तरुणांच्या पाठीशी संपूर्ण महाराष्ट्र उभा असल्याचे स्पष्ट करत त्यांनी केवळ मंत्र्यांचा राजीनामा नको, तर संपूर्ण व्यवस्था बदलणे गरजेचे असल्याचा जोरदार हल्लाबोल केंद्र सरकारवर केला.
सोमवारी संसद भवनाकडे निघालेल्या आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर मंगळवारी सर्व विरोधी पक्षांनी या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. विरोधी पक्षांच्या नेत्यांनी जंतरमंतरवर जाऊन आंदोलक विद्यार्थी आणि अभिजीत दिपके यांची भेट घेतली. या पार्श्वभूमीवर रात्री दहाच्या सुमारास उद्धव ठाकरे यांनी खासदार संजय राऊत, अरविंद सावंत आणि अनिल देसाई यांच्यासह जंतरमंतरवर पोहोचून आंदोलकांशी संवाद साधला. युवाशक्तीला नमन करण्यासाठी आपण येथे आल्याचे सांगत त्यांनी, स्वातंत्र्यानंतर आलेल्या या सरकारने देशाच्या भविष्यावरच लाठीचार्ज केल्याचे म्हटले आणि दिल्ली पोलिसांच्या कारवाईचा तीव्र निषेध केला.
अभिजीत दिपकेने पेटवलेली ही चिंगारी आता विझणार नाही, असे नमूद करत उद्धव ठाकरे म्हणाले की, ज्यांनी तुम्हाला हीन लेखले त्यांच्यामुळेच आज हे आंदोलन उभे राहिले आहे. मात्र हा देश तरुणांच्या क्रांतीतून घडला आहे. आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्या गुंडांवर तातडीने कारवाई झाली पाहिजे, असे ते म्हणाले. पुढे बोलताना त्यांनी केवळ एका मंत्र्याचा राजीनामा घेऊन भागणार नाही, तर देशातील संपूर्ण व्यवस्था बदलण्याची गरज असल्याचे सांगितले. देशामध्ये या आंदोलनाचा वणवा पेटला पाहिजे आणि या लढ्यात महाराष्ट्र पूर्ण शक्तीने तुमच्या पाठीशी उभा आहे, असे आश्वासन त्यांनी दिले.






