खेड: वसई तालुक्यावर ४ जुलै ते ८ जुलै २०२६ या कालावधीत ओढवलेल्या भीषण महापुरात खेड तालुक्यातील कुंभाड गावचे सुपुत्र आणि वसई-विरार शहर महानगरपालिका अग्निशमन दलाचे मुख्य अधिकारी रोहन वसंत मोरे यांनी केलेल्या कार्याची सर्वत्र प्रशंसा होत आहे. अवघ्या पाच दिवसांत तालुक्याचा ९५ टक्के भाग पाण्याखाली गेला असताना, रोहन मोरे यांनी आपल्या पदाचा रुबाब बाजूला सारून थेट मैदानात उतरत एका ‘सेवक’ भूमिकेतून जनसेवा केली. नालासोपारा, विरार, वसई आणि अचोळे येथील पूरग्रस्त भागांत पाणी, विजेचा धोका आणि सापांचा वावर अशा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी आपल्या पथकाचे नेतृत्व केले.
या सहा दिवसांच्या काळात रोहन मोरे आणि त्यांच्या अग्निशमन दलाच्या टीमने रात्रंदिवस अथक परिश्रम घेतले. सानसिटी, बोलींज आणि श्रीपस्ता यांसारख्या भागांत साचलेल्या ६ ते ८ फूट पाण्यात अडकलेल्या ५०० पेक्षा जास्त कुटुंबांना त्यांनी बोटी आणि दोरीच्या साहाय्याने सुरक्षित स्थळी हलवले. या बचावकार्यात वृद्ध, लहान मुले, गरोदर महिला आणि रुग्ण यांना प्राधान्य देण्यात आले. रुग्णवाहिका पोहोचू शकत नसलेल्या ठिकाणी फायर ब्रिगेडच्या गाड्यांचा रुग्णवाहिका म्हणून वापर करत त्यांनी डायलिसिस आणि ऑक्सिजनवरील रुग्णांना वेळेत रुग्णालयात पोहोचवले. केवळ जीव वाचवणेच नव्हे, तर पडलेली झाडे हटवणे, वीजेचे खांब बाजूला करणे, गॅस गळती रोखून संभाव्य स्फोट टाळणे आणि पुरानंतर अन्न-औषधांचा पुरवठा करणे अशी सर्व जबाबदारी या पथकाने पेलली.
किशोर पाटील, योगेश म्हात्रे आणि संभाजी भोईटे यांच्यासह सर्व जवानांनी ४८-४८ तास जागून केलेल्या या कार्यामुळे अनेक नागरिकांना नवे आयुष्य मिळाले आहे. “प्रत्येक जीव वाचल्याशिवाय मी माघार घेणार नाही,” हे रोहन मोरे यांचे ब्रीदवाक्य त्यांच्या संपूर्ण टीमसाठी प्रेरणादायी ठरले. निसर्गाच्या या तांडवात खेडचा सुपुत्र रोहन मोरे आणि त्यांच्या अग्निशमन दलाची टीम खऱ्या अर्थाने वसईकरांसाठी ‘देवदूत’ ठरली असून, त्यांच्या या साहसी कामगिरीची दखल संपूर्ण परिसरात घेतली जात आहे.
फोटो साभार : लोकशाही मराठी




