Category: बातम्या

  • हर्णेत दोन तरुणांवर हल्ला: दापोलीत तणावाचे वातावरण; हल्लेखोरांच्या अटकेसाठी नागरिक रस्त्यावर

    हर्णेत दोन तरुणांवर हल्ला: दापोलीत तणावाचे वातावरण; हल्लेखोरांच्या अटकेसाठी नागरिक रस्त्यावर

    दापोली/हर्णे: दापोली तालुक्यातील हर्णे येथील ऐतिहासिक भुईकोट गोवा किल्ला परिसरात मंगळवारी रात्री झालेल्या किरकोळ वादानंतर दोन गटात तुंबळ हाणामारी झाली असून, यामुळे परिसरात तीव्र तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. भुईकोट गोवा किल्ला परिसरात बाजारपेठ मोहल्ल्यातील काही युवक धूम्रपान व मद्यपान करत असल्याच्या संशयावरून दोन गटांमध्ये वाद सुरू झाला होता. हा वाद पुढे दोन समाजांतील युवकांमधील संघर्षात परिवर्तित झाल्याचे सांगण्यात येत असून, याच्या निषेधार्थ संतप्त नागरिकांनी हर्णे परिसरात जोरदार रास्ता रोको आंदोलन केले.

    हा मुख्य वाद मंगळवारी रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास घडला होता. कनकदुर्ग शेजारील भुईकोट गोवा किल्ला परिसरात काही युवक मद्यप्राशन आणि धूम्रपान करत असल्याचे पाहून स्थानिक तरुण चिन्मय गुरव आणि महेंद्र रघुवीर यांनी त्यांना हटकले व तिथे असे कृत्य करण्यास कडक विरोध केला होता. मात्र, याच घटनेचा राग मनात धरून दुसऱ्या दिवशी, बुधवारी संध्याकाळी २५ ते ३० युवकांच्या एका मोठ्या समूहाने चिन्मय आणि महेंद्र यांच्यावर अचानक जीवघेणा हल्ला चढवला. या टोळक्याने केलेल्या बेदम मारहाणीत चिन्मय गुरव यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांना फ्रॅक्चर झाले आहे, तर महेंद्र रघुवीर हे देखील गंभीर जखमी झाले असून दोघांवरही रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

    या प्राणघातक हल्ल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरताच हर्णे आणि दापोली परिसरात हिंदू बांधव आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले. “सर्व हल्लेखोरांना तात्काळ अटक झाल्याशिवाय मागे हटणार नाही,” अशी आक्रमक भूमिका घेत नागरिकांनी रस्ते अडवून धरले. आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या या घटनेमुळे दापोली परिसरात कमालीची संवेदनशीलता निर्माण झाली आहे. घटनेची गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने पावले उचलत मारहाण करणाऱ्या काही संशयित युवकांना ताब्यात घेतले असून, परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी संपूर्ण हर्णे व दापोली परिसरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता संयम व शांतता राखावी, असे आवाहन पोलीस आणि प्रशासनाकडून करण्यात आले असून पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

  • अणुस्कुरा घाटात भीषण दुचाकी अपघात; एकाचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर जखमी

    अणुस्कुरा घाटात भीषण दुचाकी अपघात; एकाचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर जखमी

    पाचल/ अंकुश पोटले: अणुस्कुरा घाटात बुधवारी सायंकाळी 5 ते 5.30 वाजण्याच्या सुमारास अत्यंत भीषण दुचाकी अपघात घडल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असून अन्य दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. निलेश विलास पाटील असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव असून, अपघातग्रस्त तिघेही बांबवडे येथील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे बांबवडे परिसरासह संपूर्ण परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे.

    दरम्यान, या अपघातानंतर प्रशासनाचा अत्यंत ढिसाळ कारभार आणि आपत्कालीन आरोग्य व्यवस्थेचे वाभाडे निघाले आहेत. अपघात होऊन तब्बल एक ते दीड तास उलटून गेले, तरीही घटनास्थळी शासकीय रुग्णवाहिका पोहोचू शकली नाही. स्थानिक नागरिकांनी तत्परता दाखवत तातडीने रुग्णवाहिका सेवेशी संपर्क साधला, मात्र गाडीत डिझेल नाही आणि डॉक्टर उपलब्ध नाहीत अशी धक्कादायक कारणे प्रशासनाकडून देण्यात आल्याचा गंभीर आरोप नागरिकांनी केला आहे. या असंवेदनशील आणि निष्काळजीपणामुळे गंभीर जखमींना वेळेत वैद्यकीय उपचार मिळण्यात मोठे अडथळे निर्माण झाले आणि यंत्रणेच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले.

    प्रशासनाच्या या अजब कारभारामुळे आणि ढिसाळ नियोजनामुळे घटनास्थळावरील स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. अपघात घडल्याचे समजताच परिसरातील नागरिकांनी मदतीसाठी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. रुग्णवाहिका न आल्याने स्थानिकांनी स्वतः पुढाकार घेत जखमींना तातडीने इतर वाहनांद्वारे मदत पोहचवण्यासाठी धावपळ केली. या घटनेमुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी आरोग्य यंत्रणेच्या अशा हलगर्जीपणावर तीव्र नाराजी व्यक्त केली असून, गंभीर जखमींना तात्काळ योग्य ते वैद्यकीय उपचार मिळावेत आणि आपत्कालीन सेवेत कसूर करणाऱ्या जबाबदार प्रशासकीय घटकांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी केली आहे.

  • डेरवण : सर्पदंश झालेल्या सहा महिन्यांच्या बाळाला वाचवण्यात वैद्यकीय पथकाला यश

    डेरवण : सर्पदंश झालेल्या सहा महिन्यांच्या बाळाला वाचवण्यात वैद्यकीय पथकाला यश

    सावर्डे: सर्पदंश झालेल्या सहा महिन्यांच्या बाळाचे प्राण वाचविण्यात डेरवण येथील वालावलकर रुग्णालयातील वैद्यकीय पथकाला यश आले आहे.महाड तालुक्यातील गोटे बुद्रुक येथील अवघ्या ६ महिन्यांच्या बाळाचे सर्पदंशानंतर वालावलकर रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व परिचारिकांच्या तत्पर उपचारांमुळे प्राण वाचले असून बाळाला पूर्णपणे स्थिर अवस्थेत घरी सोडण्यात आले आहे.

    सम्रान सागर गोलांबडे हे सहा महिन्याचे बाळ गेल्या दि. २३ रोजी पहाटे सुमारे ३.३० वाजता घरी झोपलेले असताना अचानक जोरात रडू लागले. बाळाच्या आई-वडिलांनी जागे होऊन पाहिले असता बाळाजवळ फुरसे दिसले. तपासणी केली असता बाळाच्या डाव्या काखेच्या भागात दंशाची खूण, रक्तस्राव व सूज दिसून आली.

    बाळाला तातडीने महाडच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे तपासणीदरम्यान सर्पविषामुळे गंभीर रक्तविषारी परिणाम झाल्याचे निदर्शनास आले. बाळाची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारांसाठी डेरवणच्या वालावलकर रुग्णालयात बाळाला पाठविण्यात आले. रुग्णालयात दाखल होताच बाळाची प्रकृती गंभीर असल्याने त्याला अतिदक्षता विभागात हलविण्यात आले. डेरवण येथील डॉक्टरांनी तत्काळ सर्पविष प्रतिबंधक उपचार सुरू केले. वेळेवर दिलेल्या प्रतिविष उपचारांमुळे विषाचा प्रभाव नियंत्रणात आला. डॉक्टरांच्या कुशल उपचारांमुळे व परिचारिकांच्या सातत्यपूर्ण काळजीमुळे बाळाची प्रकृती हळूहळू सुधारली व अखेर बाळाला पूर्णपणे स्थिर अवस्थेत घरी सोडण्यात आले.

    या यशस्वी उपचारामध्ये डॉ. अनिल कुर्णे, डॉ. अंकिता सुर्वे, डॉ. मोहित कडू, डॉ. विशाखा संकपाळ, डॉ. पंक्ति मेहता, डॉ. स्वप्नील काळे, डॉ. प्रतीक गोडसे, डॉ. विवेक सूर्यवंशी, डॉ. प्रिया वाघमारे, डॉ. विवेक पवार, डॉ. प्रणय गावंडे आणि डॉ. अजय पाटील यांचे विशेष योगदान होते.

  • सह्याद्री व्याघ्र राखीव क्षेत्र वणवा प्रकरण : देवरूख न्यायालयाने १० आरोपींना सुनावली २८ मे पर्यंत वन कोठडी

    सह्याद्री व्याघ्र राखीव क्षेत्र वणवा प्रकरण : देवरूख न्यायालयाने १० आरोपींना सुनावली २८ मे पर्यंत वन कोठडी

    देवरुख: सह्याद्री व्याघ्र राखीव क्षेत्रातील आंबा वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या निवळे आणि गोठणे परिसरात लागलेल्या भीषण वणवा प्रकरणी वन विभागाने धडक कारवाई केली आहे. या मानवनिर्मित वणव्याला कारणीभूत ठरल्याप्रकरणी आतापर्यंत एकूण १० आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या असून, देवरूख न्यायालयाने या सर्व आरोपींना २८ मे २०२६ पर्यंत वन कोठडी सुनावली आहे. यापूर्वी शाहूवाडी न्यायालयातूनही या प्रकरणातील संशयितांना कोठडी मिळाली होती, त्यानंतर आता देवरूख न्यायालयाच्या या निर्णयामुळे वन विभागाला या प्रकरणाच्या सखोल तपासासाठी अधिक वेळ मिळाला आहे.

    निवळे आणि गोठणे येथील वनक्षेत्रात ५ मे २०२६ रोजी काही अज्ञातांनी मानवनिर्मित आग लावली होती. या आगीने रौद्ररूप धारण केल्यामुळे वनसंपदेचे आणि वन्यजीवांचे मोठे नुकसान झाले होते. ही भीषण आग आटोक्यात आणण्यासाठी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या प्राणांची बाजी लावत शर्थीचे प्रयत्न केले होते. आग आटोक्यात आल्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप कोकितकर आणि त्यांच्या पथकाने या गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी तातडीने तपासाची चक्रे फिरवली. गोपनीय माहिती आणि तांत्रिक तपासाचे धागेदोरे जुळवत वन विभागाने कोतोली धनगरवाडा आणि अंबाईवाडा परिसरामध्ये संशयितांचा शोध सुरू केला.

    या तपासाच्या पहिल्या टप्प्यात वन विभागाच्या हाती महत्त्वपूर्ण धागेदोरे लागले आणि त्यांनी बापू बाजू चौगुले याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता या गुन्ह्यात आणखी लोकांचा सहभाग असल्याचे समोर आले. त्यानंतर तातडीने कारवाई करत बाबुराव येडगे, भागोजी कोळेकर आणि नामदेव येडगे या तिघांना अटक करण्यात आली. या चौघांच्या चौकशीतून आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपासाची व्याप्ती अधिकच वाढली. यानंतर अंबाईवाडा येथील सावळा झोरे, नागेश शेळके, विठ्ठल गावडे, बबन गावडे, धोंडीबा गावडे आणि जनू गावडे या आणखी सहा जणांची नावे निष्पन्न झाली आणि वन विभागाने त्यांनाही अटक केली. या सर्व १० आरोपींना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांची रवानगी वन कोठडीत केली आहे.

    सह्याद्री व्याघ्र प्रकल्पासारख्या संवेदनशील आणि सुरक्षित क्षेत्रात वणवा लावणाऱ्या या टोळीचा पर्दाफाश करण्यासाठी वन विभागाच्या पथकाने अत्यंत चोख कामगिरी बजावली आहे. आंबा वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप कोकितकर यांच्या नेतृत्वाखाली वनपाल सुरेश चरापले, मनिषा देसाई आणि वनरक्षक विशाल पाटील यांच्यासह पथकातील इतर कर्मचाऱ्यांनी या संपूर्ण कारवाईत अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली असून या प्रकरणाचा पुढील तपास वन विभाग करत आहे.

  • मुंबई-गोवा महामार्गाव तुरळ येथे साईटपट्टीची दुरवस्था, ठेकेदाराच्या निष्काळजीपणाविरोधात ग्रामस्थांचा संताप

    मुंबई-गोवा महामार्गाव तुरळ येथे साईटपट्टीची दुरवस्था, ठेकेदाराच्या निष्काळजीपणाविरोधात ग्रामस्थांचा संताप

    धामणी : मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावरील तुरळ परिसरात सध्या जीवघेणी परिस्थिती निर्माण झाली असून प्रशासन आणि संबंधित ठेकेदाराच्या निष्काळजीपणाविरोधात ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. महामार्गाच्या साइडपट्ट्यांची अक्षरशः दुरवस्था झाली असून अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे, चिखल आणि साचलेले पावसाचे पाणी यामुळे वाहनचालकांसाठी हा मार्ग धोकादायक बनला आहे. दिवसेंदिवस अपघातांची शक्यता वाढत असतानाही कोणतीही ठोस उपाययोजना केली जात नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

    तुरळ परिसरातून कडवईसह इतर गावांकडे जाणाऱ्या नागरिकांना सुरक्षित उड्डाणपूल नसल्याने जीव धोक्यात घालून महामार्ग ओलांडावा लागत आहे. भरधाव वाहनांमुळे येथे वारंवार अपघात घडत असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. काहींना आपला जीव गमवावा लागल्याचीही खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली. “चौपदरीकरणाच्या नावाखाली नागरिकांच्या सुरक्षेशी खेळ सुरू आहे का?” असा संतप्त सवालही ग्रामस्थांकडून उपस्थित करण्यात आला.

    महामार्गाचे काम सुरू असताना मूलभूत सुविधा आणि सुरक्षेकडे पूर्ण दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी आमदार शेखर निकम यांच्याकडे निवेदन सादर केले आहे. साइडपट्ट्यांची तातडीने दुरुस्ती, पावसाच्या पाण्याचा निचरा, प्रवाशांसाठी निवारा शेड तसेच सुरक्षित उड्डाणपूल उभारण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.

    वेळीच उपाययोजना न झाल्यास भविष्यात मोठी दुर्घटना घडू शकते, असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे. प्रशासनाने आता तरी जागे होऊन नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य द्यावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

  • संगमेश्वर: शिवने येथे पोलीस पाटलानेच फोडले गरिबाच्या घराचे कुलूप; बेकायदेशीर ताबा मिळवून भाडेकरू ठेवल्याचा खळबळजनक आरोप

    संगमेश्वर: शिवने येथे पोलीस पाटलानेच फोडले गरिबाच्या घराचे कुलूप; बेकायदेशीर ताबा मिळवून भाडेकरू ठेवल्याचा खळबळजनक आरोप

    संगमेश्वर : तालुक्यातील मौजे शिवने येथे एका शासकीय पदावरील व्यक्तीनेच सर्वसामान्य नागरिकाचे घर बेकायदेशीरपणे ताब्यात घेण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक तक्रार समोर आली आहे. शिवने गावचे पोलीस पाटील मनोज शिंदे यांनी अतिशय दांडगाई करून एका बंद घराचे कुलूप तोडले आणि त्या घरात थेट भाडेकरू घुसवल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या संपूर्ण मनमानी कारभारामुळे भयभीत झालेल्या सौ. स्मिता श्रीराम जुवेकर यांनी अखेर या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री, रत्नागिरीचे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि संगमेश्वरचे तहसीलदार यांच्याकडे लेखी अर्जाद्वारे कडक कारवाईची मागणी केली आहे. एका जबाबदार पोलीस पाटलावरच अशा स्वरूपाचे गंभीर आरोप झाल्याने संपूर्ण संगमेश्वर परिसरात आणि रत्नागिरी जिल्ह्यात या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे.
    पीडित स्मिता जुवेकर यांनी संगमेश्वर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांना दिलेल्या तक्रार पत्रात नमूद केले आहे की, शिवने ग्रामपंचायत हद्दीत वारसा हक्काने मिळालेले घर क्रमांक ४३६ हे त्यांचे स्वतःच्या हक्काचे घर असून ते ‘इंदिरा आवास घरकुल योजने’ अंतर्गत बांधलेले आहे. या घराची सर्व कागदपत्रे, घरपट्टी आणि वीजबिल स्मिता जुवेकर यांच्याच नावे असून त्या सर्व कर नियमितपणे भरतात. सध्या जुवेकर कुटुंब देवरुख येथे भाड्याच्या घरात राहून मजुरी करून आपला उदरनिर्वाह चालवत असले, तरी सुट्टीच्या दिवशी व सणासुदीला ते आपल्या शिवने येथील घरात नेहमी ये-जा करत असतात. असे असतानाही, मंगळवार दिनांक २६ मे २०२६ रोजी पोलीस पाटील मनोज शिंदे यांनी जुवेकर कुटुंबाची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडले. एवढेच नव्हे तर, या घरात जुवेकर कुटुंबाचे दैनंदिन वापराचे कपडे, महत्त्वाचे दस्तऐवज आणि मौल्यवान वस्तू असतानाही, पोलीस पाटलांनी तुरळ येथील ‘जाधव’ नामक एका दांपत्याला बेकायदेशीरपणे त्या घरात भाडेकरू म्हणून ठेवून दिले आहे.
    या गंभीर प्रकाराबाबत तक्रार करताना पीडित महिलेने पोलीस पाटलांच्या धमक्यांचाही पाढा वाचला आहे. मनोज शिंदे यांनी यापूर्वीही जुवेकर यांच्या पतीला फोन करून बेकायदेशीर पैशांची मागणी केली होती आणि सध्या ते संपूर्ण कुटुंबाला अश्लील शिवीगाळ करत सातत्याने धमकावत आहेत. कायद्याचे रक्षकच जेव्हा अशा प्रकारे गरिबांच्या मालमत्तेवर बेकायदेशीर ताबा मिळवून भक्षक बनतात, तेव्हा सामान्य जनतेने न्यायासाठी कोणाकडे जायचे, असा संतप्त सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे. या सततच्या त्रासामुळे जुवेकर कुटुंब सध्या प्रचंड दहशतीखाली वावरत असून त्यांनी तातडीने न्यायाची गुहार लावली आहे. या प्रकरणाची संगमेश्वर पोलीस ठाण्यात रीतसर नोंद झाली असून, शासकीय पदाचा गैरवापर करणाऱ्या या मुजोर पोलीस पाटलावर पोलीस प्रशासन आता नेमकी काय कारवाई करणार, याकडे तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधले गेले आहे.

  • साखरप्याच्या आकांक्षा कदमचे आणखी एक यश; राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेत १५ वे विजेतेपद

    साखरप्याच्या आकांक्षा कदमचे आणखी एक यश; राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेत १५ वे विजेतेपद

    रमेश शिंदे / भडकंबा :  संगमेश्वर तालुक्यातील देवडे (साखरपा) येथील आंतरराष्ट्रीय कॅरमपटू तथा मा. शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार विजेती आकांक्षा उदय कदम हिने आपल्या कारकिर्दीतील १५ वे राज्यस्तरीय विजेतेपद पटकावले आहे. तिच्या या यशामुळे साखरपा परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

    महाराष्ट्र कॅरम असोसिएशन व सिव्हिल फेडरेशन रोटरी क्लब ऑफ बोरीवली यांच्या संयुक्त विद्यमाने बोरीवली येथील मंडपेश्वर सिव्हिल फेडरेशन येथे २३ ते २५ मे २०२६ दरम्यान राज्य मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत आकांक्षाने उत्कृष्ट आणि दमदार खेळी करत उपांत्य फेरीत मिताली पिंपळे हिचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.

    अंतिम सामन्यात तिने ठाण्याच्या समृद्धी घाडीगांवकर हिच्यावर तीन सेटपर्यंत रंगलेल्या चुरशीच्या लढतीत दिमाखदार विजय मिळवत विजेतेपद पटकावले. हे तिच्या कारकिर्दीतील १५ वे राज्यस्तरीय विजेतेपद ठरले.

    आकांक्षा कदम हिला गतवर्षी महाराष्ट्र शासनाचा प्रतिष्ठेचा मा. शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार मिळाला असून, तिच्या या नव्या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

  • ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज’ स्पर्धेत आंबेड बुद्रुकवर अन्याय;ग्रामस्थांची पुनर्परीक्षण करण्याची मागणी

    ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज’ स्पर्धेत आंबेड बुद्रुकवर अन्याय;ग्रामस्थांची पुनर्परीक्षण करण्याची मागणी

    ८२ गुण मिळूनही अंतिम यादीत स्थान नाही; निवड प्रक्रियेवरच ग्रामस्थांचा सवाल; मा.मुख्य कार्यकारी अधिकारी यांची सकारात्मक भूमिका

    संगमेश्वर: मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान स्पर्धेत तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत आंबेड बुद्रुकवर अन्याय झाल्याची भावना निर्माण झाली आहे. या अन्यायाविरोधात संतप्त ग्रामस्थांनी थेट मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. ग्रामस्थांची व्यथा ऐकून घेतल्यानंतर हे निवेदन तातडीने राज्य शासनाकडे पाठवले जाईल, असे आश्वासन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले आहे. दरम्यान, या प्रकरणात जिल्हा परिषद उपाध्यक्ष विलास चाळके यांनीही महत्त्वाची भूमिका घेतली असून जर संपूर्ण प्रक्रियेत कुठे चूक झाली असेल, तर या प्रकरणाचे पुनर्परीक्षण व्हायलाच हवे, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता या प्रकरणाला वेगळे वळण मिळण्याची शक्यता आहे.

    ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, आंबेड बुद्रुक ग्रामपंचायतीने या स्पर्धेसाठी ऑनलाईन पद्धतीने सर्व आवश्यक माहिती अत्यंत अचूकपणे भरली होती आणि त्या आधारे ग्रामपंचायतीला तब्बल ८२ गुण मिळाले होते. एवढे उच्च गुण मिळूनही अंतिम निवड यादीत ग्रामपंचायतीला स्थान न मिळाल्यामुळे संपूर्ण गावात तीव्र नाराजीचे वातावरण आहे. विशेष म्हणजे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी स्वतः दोन वेळा या ग्रामपंचायतीला भेट देऊन येथील विविध विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी केली होती. त्यामुळे या स्पर्धेत गावाला किमान दुसरा क्रमांक नक्कीच मिळेल, असा ठाम विश्वास ग्रामस्थांना होता. मात्र अंतिम यादी जाहीर झाल्यानंतर ग्रामस्थांच्या विश्वासाला मोठा तडा गेला आहे.

    या स्पर्धेच्या मूल्यमापनासाठी पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील गटविकास अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीने प्रत्यक्ष पाहणी केली होती. मात्र या समितीने नेमक्या कोणत्या निकषांवर गुणांकन केले, इतर ग्रामपंचायतींना किती गुण दिले आणि मुख्य म्हणजे अंतिम अहवालात नेमके काय नमूद केले, याबाबातची कोणतीही अधिकृत माहिती ग्रामपंचायतीला देण्यात आलेली नाही, असा थेट आरोप ग्रामस्थांनी केला आहे. मूल्यांकन समितीचा अधिकृत अहवाल येण्यापूर्वीच, केवळ एका विस्तार अधिकाऱ्याला संपर्क करून जिल्हास्तरीय समितीने पुढील तपासणी उरकून घेतली. या तपासणीबाबत पंचायत समितीला कोणत्याही प्रकारचा लेखी दौरा कळवण्यात आला नव्हता. जिल्हास्तरीय समिती कोणत्या आधारे ही तपासणी करून गेली, याबाबत आता प्रश्न उपस्थित केले जात असून हे सारे गौडबंगाल असल्याचा संशय व्यक्त होत आहे. या सर्व प्रकारामुळे संपूर्ण निवड प्रक्रियेच्या पारदर्शकतेवरच आता मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

    संगमेश्वर तालुक्यातील एकूण २५ ग्रामपंचायतींपैकी आंबेड बुद्रुक, कडवई, माखजन, चोरवणे, आंबव पोक्षे आणि ओझरे खुर्द या सहा ग्रामपंचायतींनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. मात्र जिल्हास्तरीय समितीने या सहापैकी केवळ चोरवणे आणि ओझरे खुर्द या दोनच ग्रामपंचायतींची प्रत्यक्ष पाहणी केल्याची माहिती आता समोर आली आहे. यामुळे ग्रामस्थांचा संशय आणखी गडद झाला आहे. गुणवंत ग्रामपंचायतीला न्याय मिळालाच पाहिजे, अशी भूमिका घेत ग्रामस्थांनी मूल्यांकन समितीचा अधिकृत अहवाल, गुणदानाचे सर्व निकष आणि स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व ग्रामपंचायतींचे गुण तातडीने जाहीर करावेत, अशी ठाम मागणी केली आहे. या संदर्भात मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबत सकारात्मक चर्चा झाली असून आता राज्य शासनाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

  • गटारात अडकलेल्या गायीला नागरिकांचे जीवदान

    गटारात अडकलेल्या गायीला नागरिकांचे जीवदान

    लांजात हिंदू-मुस्लिम बांधवांसह पोलिस निरीक्षकांनी दाखवली माणुसकीची भावना

    लांजा /अरबाज नेवरेकर : लांजा शहरातील कुंभारवाडी परिसरात महामार्गालगतच्या गटारात एक गाय अडकून पडल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली. गटार खोल असल्याने गायीला स्वतःहून बाहेर पडणे शक्य होत नव्हते. ही घटना लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी तत्काळ धाव घेत मदतकार्य सुरू केले.

    घटनास्थळी उपस्थित असलेल्या हिंदू-मुस्लिम बांधवांनी एकत्र येत गायीला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले. या घटने दरम्यान  लांजा पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक निलकंठ बगळे हे देखील गस्त घालत होते त्यांनी देखील  तत्परता दाखवत नागरिकांसोबत मदतकार्य केले. सर्वांनी मिळून केलेल्या प्रयत्नांमुळे गायीला अखेर सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आले.

    या मदतकार्यात राजू तुळसणकर, गौरव तेरवणकर, प्रसाद गुरव, लेझम मुल्ला,अजीम वनू, विनय कुंभार, गाईचे मालक वसंत कुंभार यांच्यासह अनेक नागरिक सहभागी झाले होते. गायीला सुखरूप बाहेर काढल्यानंतर उपस्थित नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

    आजच्या धावपळीच्या काळात धर्मभेद बाजूला ठेवून नागरिकांनी दाखवलेल्या एकोप्यामुळे लांजा शहरात सामाजिक ऐक्य आणि माणुसकीचे सुंदर उदाहरण पाहायला मिळाले.

  • बँक कर्मचारी मुकुंद पालांडे आत्महत्या प्रकरणातील संशयितांच्या शोधासाठी पोलीस पथके सज्ज

    बँक कर्मचारी मुकुंद पालांडे आत्महत्या प्रकरणातील संशयितांच्या शोधासाठी पोलीस पथके सज्ज

    अटक केलेल्या चौघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी

    चिपळूण: अलोरे येथील बँक कर्मचारी मुकुंद मुरलीधर पालांडे यांना संगनमताने दमदाटी करणे, मारहाण करण्याचा प्रयत्न करणे आणि पैशांची मागणी करून मानसिक दबावाखाली आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याच्या गुन्ह्यात सध्या गायब असलेल्या धनंजय शेट्ये आणि आशिष सावंत या दोघांचा अलोरे-शिरगाव पोलिसांकडून अत्यंत कसून शोध घेतला जात आहे. या दोघांचा माग काढण्यासाठी पोलिसांनी आपली विशेष पथके सज्ज केली असून सहायक पोलीस निरीक्षक भरत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

    या प्रकरणात एकूण सहा जणांवर गुन्हा दाखल असून, त्यापैकी अटक करण्यात आलेल्या अनोखी अखिलेश खेडेकर, अखिलेश खेडेकर, योगेश मोरे आणि वेदांत विजय टाकळे या चौघांना मंगळवारी पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

    या खळबळजनक प्रकरणाची पाळेमुळे मुकुंद पालांडे यांनी बेपत्ता होण्यापूर्वी लिहिलेल्या चार पानांच्या पत्रात दडलेली आहेत. या पत्रात त्यांनी आपल्या मृत्यूला हे सहा जणच जबाबदार असल्याचे लिहून ठेवले होते, ज्याच्या आधारे मुकुंद यांचे वडील मुरलीधर पालांडे यांनी पोलीस स्थानकात फिर्याद दिली. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने चार जणांना ताब्यात घेऊन सोमवारी न्यायालयात हजर केले असता त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी मिळाली होती. मंगळवारी ही मुदत संपताच त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली असून, आता पोलीस यंत्रणेचे पूर्ण लक्ष या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार समजल्या जाणाऱ्या उर्वरित फरार दोघांना बेड्या ठोकण्यावर केंद्रित झाले आहे.