Category: बातम्या

  • खेड : मुंबके येथे गांजा विक्री करणाऱ्या टोळीला रंगेहाथ पकडले ; ६७ हजारांचा मुद्देमाल जप्त

    खेड : मुंबके येथे गांजा विक्री करणाऱ्या टोळीला रंगेहाथ पकडले ; ६७ हजारांचा मुद्देमाल जप्त

    खेड: तालुक्यातील मुंबके येथे अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या एका टोळीचा खेड पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. एका खोलीवर अचानक छापा टाकून पोलिसांनी गांजाची विक्री करणाऱ्या तीन तरुणांना रंगेहाथ अटक केली. त्यांच्या ताब्यातून सुमारे ३६४ ग्रॅम सुकलेला गांजा, तीन महागडे स्मार्टफोन, गांजा ओढण्यासाठी लागणाऱ्या मातीच्या चिलीम आणि वजनाचे साहित्य असा एकूण ६७ हजार २४९ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे खेड परिसरातील अंमली पदार्थ विक्रेत्यांमध्ये घबराट पसरली आहे.

    या धडक कारवाईबाबत खेड पोलिसांकडून मिळालेली सविस्तर माहिती अशी की, ३ जून २०२६ रोजी रात्री १०.४७ वाजण्याच्या सुमारास मुंबके गावातील एका खोलीमध्ये काही इसम गांजा हा अंमली पदार्थ विक्रीसाठी बाळगून असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे खेड पोलीस ठाण्याच्या पथकाने रात्रीच्या वेळी सदर खोलीवर छापा टाकला. या छाप्यात पोलिसांना खोलीमध्ये तीन तरुण गांजा विक्री करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या साहित्यासह रंगेहाथ आढळून आले. पोलिसांनी तात्काळ तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले.

    ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे अफजल जहीर कादिरी (वय २४, रा. नांदगाव मोहल्ला, ता. खेड), सद्दाम अबु बकर दुदुके (वय २५, मूळ रा. मुंबके दुदुके मोहल्ला, ता. खेड, सध्या रा. कोनगाव, ता. कल्याण, जि. ठाणे) आणि अवधूत राजेश घोडे (वय २६, रा. कोष्टी आळी, ता. खेड) अशी आहेत. पोलिसांनी पंचांसमक्ष घेतलेल्या झडतीत त्यांच्याकडे एका काळ्या रंगाच्या प्लास्टिक पिशवीमध्ये ५ हजार ४४९ रुपये किमतीचा, हिरवट पाने, फुले, काड्या आणि बिया असलेला ३६४ ग्रॅम वजनाचा उग्र वासाचा सुकलेला गांजा मिळून आला.

    याशिवाय संशयितांकडून २० हजार रुपयांचा सॅमसंग ए-५३, ३० हजार रुपयांचा रेडमी १४ प्रो मॅक्स, १० हजार रुपयांचा मोटोरोला जी-६७ असे तीन वेगवेगळ्या कंपन्यांचे स्मार्टफोन जप्त करण्यात आले. तसेच गांजा ओढण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या १ हजार ५०० रुपये किमतीच्या तीन काळ्या रंगाच्या मातीच्या चिलीम आणि ३०० रुपये किमतीच्या प्लास्टिकच्या लहान पिशव्या असा एकूण ६७ हजार २४९ रुपयांचा माल पोलिसांनी जप्त केला.

    याप्रकरणी खेड पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई सुरज निवृत्ती मोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ४ जून २०२६ रोजी पहाटे ४.०६ वाजता तिन्ही संशयित आरोपींविरुद्ध अंमली औषधी द्रव्य व मन प्रभावी पदार्थ अधिनियम १९८५ (NDPS Act) च्या कलम ८(अ), २०(ब), २(ब) आणि २९ नुसार गुन्हा रजिस्टर क्रमांक १६३/२०२६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आंतरजिल्हा कनेक्शन असलेल्या गांजा तस्करी व विक्री प्रकरणाचा पुढील अधिक तपास खेड पोलीस करत आहेत.

  • खेड : लवेल माणी फाटा येथे गांजा ओढणाऱ्या दोन मजुरांना पोलिसांनी रंगेहाथ पकडले

    खेड : लवेल माणी फाटा येथे गांजा ओढणाऱ्या दोन मजुरांना पोलिसांनी रंगेहाथ पकडले

    खेड: तालुक्यातील लवेल माणी फाटा येथे रस्त्याच्या कडेला उघडपणे गांजा या अंमली पदार्थाचे सेवन करणाऱ्या दोन तरुणांना खेड पोलिसांनी रंगेहाथ अटक केली आहे. हे दोन्ही संशयित व्यवसायाने मजूर असून, त्यांच्याकडून गांजा ओढण्यासाठी वापरले जाणारे साहित्य जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    या कारवाईबाबत खेड पोलिसांकडून मिळालेली सविस्तर माहिती अशी की, ३ जून २०२६ रोजी सायंकाळी ७.०० वाजण्याच्या सुमारास लवेल माणी फाटा परिसरात काही जण गांजाचे सेवन करत असल्याची विश्वसनीय माहिती खेड पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे खेड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक येवले, पोलीस अंमलदार सोहेल ढगे आणि चालक पोलीस शिपाई पवार (बकल नंबर ८९७) यांनी तातडीने लवेल माणी फाटा येथे जाऊन सापळा रचला.
    यावेळी पोलिसांना रस्त्याच्या कडेला दोन तरुण हातामध्ये सिगारेट घेऊन ती ओढताना दिसले. त्यांच्या समोरच जमिनीवर एक अर्धी भरलेली काडेपेटी आणि चार ते पाच विझलेल्या माचीसच्या काड्या पडलेल्या होत्या. संशयितांची हालचाल संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आणि पंचांसमक्ष ‘तुम्ही काय ओढत आहात?’ अशी चौकशी केली. त्यावर या दोन्ही तरुणांनी आपण गांजा पीत असल्याची कबुली दिली.

    पोलिसांनी नाव आणि पत्ता विचारला असता त्यांनी आपली नावे प्रीतम राजेंद्र कदम (वय २५, रा. माणी देऊळवाडी, ता. खेड) आणि चेतन राजन हरधारे (वय ३६, मूळ रा. चिपळूण मार्कंडी, सध्या रा. लवेल पेट्रोल पंपाजवळ, ता. खेड) अशी असल्याचे सांगितले. हे दोघेही मजूर म्हणून काम करतात.

    उघडपणे अंमली पदार्थाचे सेवन करून कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी खेड पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल सोहेल इकबाल ढगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ४ जून २०२६ रोजी दुपारी २.४७ वाजता संशयित प्रीतम कदम आणि चेतन हरधारे यांच्याविरुद्ध अंमली औषधी द्रव्य व मन प्रभावी पदार्थ अधिनियम १९८५  चे कलम ८(क) आणि २७ नुसार गुन्हा रजिस्टर क्रमांक १६२/२०२६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईचा पुढील अधिक तपास खेड पोलीस करत आहेत.

  • रत्नागिरी : भाटये कारची स्कूटरला जोरदार धडक; एकाच कुटुंबातील तिघे गंभीर जखमी

    रत्नागिरी : भाटये कारची स्कूटरला जोरदार धडक; एकाच कुटुंबातील तिघे गंभीर जखमी

    रत्नागिरी: पावस-रत्नागिरी रस्त्यावरील भाटये येथील हॉटेल आनंदसमोरील मार्गावर एक भीषण रस्ता अपघात घडला आहे. पावसकडून रत्नागिरीच्या दिशेने अत्यंत वेगात आणि हयगयीने येत असलेल्या एका मारुती स्विफ्ट डिझायर कारने समोरून जाणाऱ्या प्लेझर स्कूटरला चुकीच्या बाजूने  येत जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात स्कूटरवरील चालक महिलेसह तिच्यासोबत मागे बसलेल्या अन्य एक महिला आणि ६ वर्षांची चिमुरडी गंभीर जखमी झाली आहे. याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    पोलिसांकडून मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, सौ. तेजश्री अमित मोहिले (वय ४०) या १० मे २०२६ रोजी दुपारी ३.०० वाजण्याच्या सुमारास आपल्या ताब्यातील हिरो प्लेझर स्कूटर (क्रमांक MH 08 AE 8568) वर सौ. तीर्था चंद्रभूषण मरकर (वय ६२) आणि ६ वर्षांची चिमुरडी कु. माहिषा अमित मोहिले यांना मागे बसवून रत्नागिरी येथून कुर्ली येथील आपल्या मावशीकडे जाण्यासाठी निघाल्या होत्या. सायंकाळी ६.०० वाजण्याच्या सुमारास त्यांची स्कूटर भाटये येथील हॉटेल आनंदसमोरील रस्त्यावर पोहोचली.

    त्याच वेळी संशयित आरोपी कार चालक अक्षय दत्ताराम वारीसे (वय ३१, रा. गोळप, गोठणेवाडी, ता. जि. रत्नागिरी) हा आपल्या ताब्यातील मारुती स्विफ्ट डिझायर कार (क्रमांक MH 05 FJ 3198) घेऊन पावसकडून रत्नागिरीकडे चालला होता. संशयिताने रस्त्याची विशिष्ट परिस्थिती आणि वाहनांची ये-जा लक्षात न घेता आपली कार अत्यंत भरधाव वेगात व अविचाराने चालवून थेट उजव्या बाजूला म्हणजेच रॉंग साईडला घेतली. यामुळे कारने समोरून येणाऱ्या तेजश्री मोहिले यांच्या स्कूटरला थेट दर्शनी भागात जोरदार धडक दिली. या भीषण धडकेमुळे स्कूटरवरील तिघेही रस्त्यावर फेकले गेले. या अपघातात तेजश्री मोहिले, तीर्था मरकर आणि ६ वर्षांची माहिषा मोहिले यांना किरकोळ व गंभीर स्वरूपाची दुखापत झाली आहे.


    अपघातानंतर या प्रकरणी पोलीस ठाण्यात मोटार अपघात रजिस्टर क्रमांक २५/२०२६ नुसार प्राथमिक नोंद करून चौकशी सुरू करण्यात आली होती. सदर चौकशी पूर्ण झाल्यानंतर रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस हवादार प्रमोद तुकाराम कांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ४ जून २०२६ रोजी दुपारी १२.५४ वाजता संशयित कार चालक अक्षय वारीसे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम २८१, १२५(अ), १२५(ब) आणि मोटार वाहन कायदा कलम १८४ अन्वये गुन्हा रजिस्टर क्रमांक १८१/२०२६ नुसार गुन्हा दाखल केला आहे. या अपघाताचा पुढील अधिक तपास रत्नागिरी शहर पोलीस करत आहेत.

  • गुहागरमध्ये स्कूटर अपघातात गंभीर जखमी झालेल्या मुंबईतील तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

    गुहागरमध्ये स्कूटर अपघातात गंभीर जखमी झालेल्या मुंबईतील तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

    गुहागर: तालुक्यातील बोऱ्या फाटा ते पिंपर फाटा दरम्यान झालेल्या भीषण स्कूटर अपघातात गंभीर जखमी झालेल्या एका २४ वर्षीय तरुणाचा मुंबईतील केईएम रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. वीरेंद्र सुभाष घाडे असे या मृत तरुणाचे नाव आहे. या अपघातात स्वतःच्या मृत्यूस आणि वाहनाच्या नुकसानीस स्वतःच कारणीभूत ठरल्याप्रप्रकरणी गुहागर पोलीस ठाण्यातील महिला पोलीस अंमलदाराच्या फिर्यादीवरून मृत चालकाविरुद्धच गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    याबाबत गुहागर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मूळचे गुहागर तालुक्यातील उमराठ घाडेवाडी येथील रहिवासी असलेले आणि सध्या सांताक्रुझ (पूर्व, मुंबई) येथील वाकोला ब्रिज परिसरात राहणारे वीरेंद्र सुभाष घाडे (वय २४) हे ७ मार्च २०२६ रोजी रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास आपल्या ताब्यातील सुझुकी कंपनीची बर्गमन (BURGMAN) स्कूटर (क्रमांक MH 02 GF 0370) घेऊन बोऱ्या फाटा ते पिंपर फाटा जाणाऱ्या रस्त्यावरून जात होते. मौजे वाडदई गावच्या हद्दीत आले असता, रात्रीची वेळ आणि रस्त्याची परिस्थिती लक्षात न घेता वीरेंद्र यांनी आपली स्कूटर भरधाव वेगात, हयगयीने आणि निष्काळजीपणे चालवली. यामुळे त्यांचा स्कूटरवरून ताबा सुटून भीषण अपघात झाला. या अपघातात वीरेंद्र यांच्या डोक्याला, कपाळाला, नाकाला आणि तोंडाला अत्यंत गंभीर दुखापती झाल्या होत्या.

    अपघातानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी मुंबईतील केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, तिथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी सुरुवातीला मुंबईतील भोईवाडा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. त्यानंतर हे कागदपत्र ९ एप्रिल २०२६ रोजी गुहागर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आले. या प्रकरणाच्या चौकशीदरम्यान ४ जून २०२६ रोजी मयताचा विच्छेदन अहवाल  प्राप्त झाला. त्यामध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांनी, अपघातातील गंभीर दुखापतींमुळे मेंदूत रक्तस्राव होऊन वीरेंद्र यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले.

    एकंदरीत पोलीस चौकशीत मयत वीरेंद्र घाडे हा स्वतःच्या मृत्यूस आणि स्कूटरच्या नुकसानीस कारणीभूत ठरल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार गुहागर पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस हवादार स्वामिनी समित नाटेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ४ जून २०२६ रोजी दुपारी २.०५ वाजता मयत वीरेंद्र घाडे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम १०६(१), २८१, १२५(अ), १२५(ब) आणि मोटार वाहन कायदा कलम १८४ नुसार गुन्हा रजिस्टर क्रमांक ४८/२०२६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भाजपा खेडतर्फे ‘एक पेड माँ के नाम’ अभियानांतर्गत वृक्षारोपण; नागरिकांना रोपांचे वाटप

    जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भाजपा खेडतर्फे ‘एक पेड माँ के नाम’ अभियानांतर्गत वृक्षारोपण; नागरिकांना रोपांचे वाटप

    खेड: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या ‘एक पेड माँ के नाम’ या देशव्यापी मोहिमेला प्रतिसाद देत, जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टी, खेडच्या वतीने खेड-भरणे रोड येथे भव्य वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. “एक वृक्ष, एक जीवन” हा संदेश देत पर्यावरण संवर्धनासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

    या कार्यक्रमाला भाजपा नेते तथा खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष ॲड. वैभव खेडेकर प्रामुख्याने उपस्थित होते. त्यांच्या हस्ते वृक्षारोपण करून या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांनी आणि नागरिकांनी आपल्या आईच्या सन्मानार्थ किमान एक झाड लावून त्याचे वर्षभर जतन आणि संगोपन करण्याचा सामूहिक संकल्प केला. केवळ झाडे लावणे पुरेसे नसून, त्यांचे अस्तित्व टिकवणे हीच काळाची गरज असल्याचे मत यावेळी व्यक्त झाले.

    कार्यक्रमाचे औचित्य साधून स्थानिक पर्यावरणप्रेमी, विविध सामाजिक संस्था, उच्च माध्यमिक शाळांचे प्रतिनिधी, रिक्षा संघटना आणि सर्वसामान्य नागरिकांना विविध प्रकारच्या वृक्षरोपांचे मोफत वाटप करण्यात आले. उपस्थित जनसमुदायाला मार्गदर्शन करताना ॲड. वैभव खेडेकर म्हणाले की, पर्यावरण संवर्धन ही केवळ एका दिवसाची किंवा जागतिक पर्यावरण दिनापुरती मर्यादित असणारी जबाबदारी नाही. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी आणि येणाऱ्या पिढ्यांच्या सुरक्षिततेसाठी वृक्षलागवड व त्यांचे संवर्धन ही प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनशैलीचा अविभाज्य भाग बनली पाहिजे. या मोहिमेत खेड परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उत्स्फूर्त सहभाग नोंदवून पर्यावरण रक्षणाची शपथ घेतली.

  • गुहागर : पोटच्या मुलानेच लोखंडी पाटा मारून ६६ वर्षीय वृद्ध आईला केले गंभीर जखमी

    गुहागर : पोटच्या मुलानेच लोखंडी पाटा मारून ६६ वर्षीय वृद्ध आईला केले गंभीर जखमी

    गुहागर: पूर्वी केलेल्या पोलीस तक्रारीचा राग मनात धरून एका कलियुगी पुत्राने आपल्या ६६ वर्षीय वृद्ध आईवर लोखंडी पाटा फेकून मारत तिला गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना गुहागर तालुक्यातील पाटपन्हाळे गावडेवाडी येथे घडली आहे. याप्रकरणी गुहागर पोलीस ठाण्यात संशयित मुलाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


    याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, पार्वती शंकर गावडे (वय ६६, रा. पाटपन्हाळे गावडेवाडी, ता. गुहागर) या ४ जून २०२६ रोजी सकाळी ०८.३० वाजण्याच्या सुमारास आपल्या राहत्या घरी हजर होत्या. याच दरम्यान त्यांचा मुलगा आणि या प्रकरणातील संशयित राजेंद्र शंकर गावडे (वय ४२, सध्या रा. दिवा, जि. ठाणे) हा तिथे आला. संशयित राजेंद्र याला दारूचे व्यसन असून, तो नेहमी दारू पिऊन आईला शिवीगाळ, धमकी आणि मारहाण करायचा. या त्रासाला कंटाळून पार्वती गावडे यांनी पूर्वी गुहागर पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध तक्रार दिली होती.


    आपल्याविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार का दिली, याचा तीव्र राग संशयित राजेंद्रच्या मनात होता. याच रागातून ४ जून रोजी सकाळी त्याने घरात असलेला लोखंडी गाडीचा पाटा उचलला आणि थेट आईच्या ढोपराच्या खाली पायावर मारून त्यांना गंभीर दुखापत केली. एवढ्यावर थांबला नाही, तर त्याने आईला अश्लील शिवीगाळ करत ‘पोलीसात तक्रार देतेस काय?’ असे म्हणून पुन्हा मारण्याची धमकी दिली.


    या जीवघेण्या हल्ल्यानंतर जखमी वृद्ध आई पार्वती गावडे यांनी गुहागर पोलीस ठाणे गाठून मुलाच्या विरोधात फिर्याद दिली. त्यानुसार ४ जून २०२६ रोजी सायंकाळी १७.१३ वाजता गुहागर पोलिसांनी संशयित मुलगा राजेंद्र गावडे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम ११८(२), ३५१(२), ३५२ आणि गुन्हा रजिस्टर क्रमांक ४९/२०२६ नुसार गंभीर दुखापत व धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील अधिक तपास गुहागर पोलीस करत आहेत.

  • राजापुरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार; संशयित युवकाला पोलीस कोठडी

    राजापुरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार; संशयित युवकाला पोलीस कोठडी

    राजापूर: राजापूर शहरात एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला फुस लावून तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी राजापूर पोलिसांनी संशयित आरोपी दिलीपकुमार संदीप बावकर (वय १९, रा. डोंगर, राजापूर) याच्याविरोधात पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. न्यायालयाने संशयिताला ५ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

    या गंभीर प्रकरणाची राजापूर पोलीस स्थानकात पीडितेच्या आईने फिर्याद दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी राजापूर येथे संगणकीय प्रशिक्षणासाठी येत असताना तिची संशयित दिलीपकुमार याच्याशी ओळख झाली होती. याच ओळखीचा गैरफायदा घेत संशयिताने ३ एप्रिल २०२६ रोजी मुलीला फुस लावून आपल्या एका मित्राच्या खोलीवर नेले आणि तिथे तिच्यावर अत्याचार केला. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपज्योती पाटील करत आहेत.

  • लांजा एसटी स्थानकावर गर्दीचा फायदा घेऊन वृद्धेची १ लाख रुपयांची सोन्याची माळ लंपास; अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल

    लांजा एसटी स्थानकावर गर्दीचा फायदा घेऊन वृद्धेची १ लाख रुपयांची सोन्याची माळ लंपास; अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल

    लांजा: लांजा एसटी बस स्थानकावर बसमध्ये चढत असताना प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन एका वृद्ध महिलेच्या गळ्यातील १ लाख रुपये किमतीची सोन्याची माळ अज्ञात चोराने हातोहात लांबवल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लांजा तालुक्यातील रिंगणे हांदेवाडी (दत्त मंदिराजवळ) येथे राहणाऱ्या श्रीमती जयश्री एकनाथ बने (वय ७५ वर्षे) या १९ मे २०२६ रोजी दुपारी ३.१५ वाजण्याच्या सुमारास आपल्या रिंगणे गावी जाण्यासाठी लांजा एसटी स्थानकावर आल्या होत्या. त्या लांजा-झर्ये या बसमध्ये चढत असताना बसमधील प्रवाशांच्या अतोनात गर्दीचा फायदा घेत एका अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील गोल बारीक मण्यांची एक पदरी सोन्याची माळ अत्यंत चालाखीने काढून घेतली. चोरीला गेलेल्या या २६ ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या माळेची किंमत सुमारे १ लाख रुपये आहे.
    घटनेच्या दिवशी जयश्री बने यांची प्रकृती ठीक नसल्याने आणि त्यांना प्रचंड अशक्तपणा जाणवू लागल्यामुळे त्यांनी तातडीने पोलीस ठाण्यात न जाता घरी जाणे पसंत केले होते.

    त्यानंतर प्रकृतीत सुधारणा झाल्यावर त्यांनी  लांजा पोलीस ठाण्यात उपस्थित राहून या चोरीची फिर्याद दिली. फिर्यादीवरून लांजा पोलिसांनी अज्ञात इसमाविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम ३०३(२) आणि गुन्हा रजिस्टर नंबर ११६/२०२६ नुसार गुन्हा दाखल केला आहे. या चोरीच्या प्रकरणाचा पुढील अधिक तपास लांजा पोलीस करत आहेत.