खेड: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या ‘एक पेड माँ के नाम’ या देशव्यापी मोहिमेला प्रतिसाद देत, जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टी, खेडच्या वतीने खेड-भरणे रोड येथे भव्य वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. “एक वृक्ष, एक जीवन” हा संदेश देत पर्यावरण संवर्धनासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
या कार्यक्रमाला भाजपा नेते तथा खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष ॲड. वैभव खेडेकर प्रामुख्याने उपस्थित होते. त्यांच्या हस्ते वृक्षारोपण करून या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांनी आणि नागरिकांनी आपल्या आईच्या सन्मानार्थ किमान एक झाड लावून त्याचे वर्षभर जतन आणि संगोपन करण्याचा सामूहिक संकल्प केला. केवळ झाडे लावणे पुरेसे नसून, त्यांचे अस्तित्व टिकवणे हीच काळाची गरज असल्याचे मत यावेळी व्यक्त झाले.
कार्यक्रमाचे औचित्य साधून स्थानिक पर्यावरणप्रेमी, विविध सामाजिक संस्था, उच्च माध्यमिक शाळांचे प्रतिनिधी, रिक्षा संघटना आणि सर्वसामान्य नागरिकांना विविध प्रकारच्या वृक्षरोपांचे मोफत वाटप करण्यात आले. उपस्थित जनसमुदायाला मार्गदर्शन करताना ॲड. वैभव खेडेकर म्हणाले की, पर्यावरण संवर्धन ही केवळ एका दिवसाची किंवा जागतिक पर्यावरण दिनापुरती मर्यादित असणारी जबाबदारी नाही. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी आणि येणाऱ्या पिढ्यांच्या सुरक्षिततेसाठी वृक्षलागवड व त्यांचे संवर्धन ही प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनशैलीचा अविभाज्य भाग बनली पाहिजे. या मोहिमेत खेड परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उत्स्फूर्त सहभाग नोंदवून पर्यावरण रक्षणाची शपथ घेतली.

