GRAMIN SEARCH BANNER

गुहागरमध्ये स्कूटर अपघातात गंभीर जखमी झालेल्या मुंबईतील तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

Gramin Varta
166 Views
A shot in the morgue

गुहागर: तालुक्यातील बोऱ्या फाटा ते पिंपर फाटा दरम्यान झालेल्या भीषण स्कूटर अपघातात गंभीर जखमी झालेल्या एका २४ वर्षीय तरुणाचा मुंबईतील केईएम रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. वीरेंद्र सुभाष घाडे असे या मृत तरुणाचे नाव आहे. या अपघातात स्वतःच्या मृत्यूस आणि वाहनाच्या नुकसानीस स्वतःच कारणीभूत ठरल्याप्रप्रकरणी गुहागर पोलीस ठाण्यातील महिला पोलीस अंमलदाराच्या फिर्यादीवरून मृत चालकाविरुद्धच गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत गुहागर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मूळचे गुहागर तालुक्यातील उमराठ घाडेवाडी येथील रहिवासी असलेले आणि सध्या सांताक्रुझ (पूर्व, मुंबई) येथील वाकोला ब्रिज परिसरात राहणारे वीरेंद्र सुभाष घाडे (वय २४) हे ७ मार्च २०२६ रोजी रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास आपल्या ताब्यातील सुझुकी कंपनीची बर्गमन (BURGMAN) स्कूटर (क्रमांक MH 02 GF 0370) घेऊन बोऱ्या फाटा ते पिंपर फाटा जाणाऱ्या रस्त्यावरून जात होते. मौजे वाडदई गावच्या हद्दीत आले असता, रात्रीची वेळ आणि रस्त्याची परिस्थिती लक्षात न घेता वीरेंद्र यांनी आपली स्कूटर भरधाव वेगात, हयगयीने आणि निष्काळजीपणे चालवली. यामुळे त्यांचा स्कूटरवरून ताबा सुटून भीषण अपघात झाला. या अपघातात वीरेंद्र यांच्या डोक्याला, कपाळाला, नाकाला आणि तोंडाला अत्यंत गंभीर दुखापती झाल्या होत्या.

अपघातानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी मुंबईतील केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, तिथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी सुरुवातीला मुंबईतील भोईवाडा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. त्यानंतर हे कागदपत्र ९ एप्रिल २०२६ रोजी गुहागर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आले. या प्रकरणाच्या चौकशीदरम्यान ४ जून २०२६ रोजी मयताचा विच्छेदन अहवाल  प्राप्त झाला. त्यामध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांनी, अपघातातील गंभीर दुखापतींमुळे मेंदूत रक्तस्राव होऊन वीरेंद्र यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले.

एकंदरीत पोलीस चौकशीत मयत वीरेंद्र घाडे हा स्वतःच्या मृत्यूस आणि स्कूटरच्या नुकसानीस कारणीभूत ठरल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार गुहागर पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस हवादार स्वामिनी समित नाटेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ४ जून २०२६ रोजी दुपारी २.०५ वाजता मयत वीरेंद्र घाडे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम १०६(१), २८१, १२५(अ), १२५(ब) आणि मोटार वाहन कायदा कलम १८४ नुसार गुन्हा रजिस्टर क्रमांक ४८/२०२६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Total Visitor Counter

3483537
Share This Article