GRAMIN SEARCH BANNER

दापोलीत दिवसाढवळ्या घरफोडी; सात लाखांचे सोन्याचे दागिने आणि रोकड लंपास

दापोली: तालुक्यातील मौजे पंचनदी कुणबीवाडी येथे एका बंद घराचा कडीकोंडा तोडून अज्ञात चोरट्याने दिवसाढवळ्या सात लाख पाच हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या दागिन्यांसह रोकड लांबवल्याची खळबळजनक घटना घडली आहे. याप्रकरणी मानशी महेंद्र नाचरे यांनी दापोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता २०२३ च्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. ही घटना २२ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ ते सायंकाळी ७ च्या सुमारास घडली असून, फिर्यादी काही कामानिमित्त बाहेर गेल्याची संधी साधून चोरट्याने घराच्या मागील दरवाजा जोरात ढकलून आत प्रवेश केला.

चोरट्याने घरातील लोखंडी कपाट कोणत्यातरी हत्याराने फोडून त्यातील तिजोरीतील साहित्याची उचकापाचक केली. यामध्ये स्टीलच्या किटलीत आणि प्लास्टिकच्या डबीत ठेवलेले सुमारे ७० ग्रॅम वजनाचे सोन्याचे विविध दागिने लंपास करण्यात आले आहेत. चोरीला गेलेल्या मालामध्ये १ लाख १० हजार रुपये किमतीचे दोन वेगवेगळे मंगळसूत्र, ५० हजार रुपयांच्या सोन्याच्या कुड्या, कानपट्टी चैन, लेडीज आणि जेन्ट्स अंगठ्या, दोन सोन्याच्या चैन आणि ५ हजार रुपयांची रोकड असा एकूण ७ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल समाविष्ट आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून, भरवस्तीत दिवसाढवळ्या झालेल्या या धाडसी चोरीमुळे पंचनदी परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. दापोली पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून अज्ञात चोरट्याचा शोध सुरू आहे.

Total Visitor Counter

3483779
Share This Article