रत्नागिरी : कधीकाळी कोकणातील शेतीचा आधारस्तंभ मानली जाणारी ‘सर्जा-राजा’ची बैलजोडी आता हळूहळू इतिहासजमा होताना दिसत आहे. कृषी क्षेत्रात वाढलेल्या यांत्रिकीकरणामुळे पारंपरिक शेतीपद्धती मागे पडत असून, गावागावांत दिसणाऱ्या बैलजोड्या आता मोजक्याच उरल्या आहेत. अलीकडील पशुगणनेतही बैलांच्या संख्येत मोठी घट झाल्याचे चित्र समोर आले आहे.
पूर्वी कोकणातील शेतीत नांगरणी, वखरणी, पेरणी यांसारखी सर्व कामे बैलांच्या सहाय्याने केली जात होती. शेतकरी म्हटला की त्याच्या गोठ्यात किमान एक बैलजोडी असायचीच. काही भागांत रेड्यांचाही शेतीसाठी वापर होत असे. मात्र, आधुनिक तंत्रज्ञानाच्या आगमनानंतर शेतीत ट्रॅक्टर, पॉवर टिलर आणि विविध यंत्रांचा वापर वाढला. कमी वेळ, कमी श्रम आणि अधिक उत्पादन या कारणांमुळे शेतकऱ्यांचा कल यंत्रांकडे वळला.
लहान शेतकऱ्यांसाठी वर्षभर बैलजोडी सांभाळणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे राहिलेले नाही. चारा, पाणी, औषधोपचार आणि देखभालीचा वाढता खर्च यामुळे अनेकांनी बैल पाळणे बंद केले आहे. परिणामी, गावात एखाद-दुसरीच बैलजोडी दिसून येते. काही शेतकरी गरजेनुसार इतरांकडील बैलजोडी भाड्याने घेऊन शेतीची कामे करत आहेत.
पावसाच्या लहरीपणामुळे शेती तोट्यात जात असल्याने आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना पशुधनाचा खर्च झेपेनासा झाला आहे. दुसरीकडे, शेतीतील बहुतांश कामे यंत्रांद्वारे होत असल्याने बैलांचे महत्त्व कमी होत चालले आहे.
बैलगाडीही नामशेष होण्याच्या मार्गावर
ग्रामीण संस्कृतीची ओळख मानली जाणारी बैलगाडीही आता दुर्मिळ झाली आहे. पूर्वी शेतीमाल वाहतूक तसेच प्रवासासाठी मोठ्या प्रमाणात बैलगाडीचा वापर केला जात होता. मात्र, आधुनिक वाहनांच्या वाढत्या वापरामुळे लाकडी बैलगाड्या आता क्वचितच पाहायला मिळतात.
ट्रॅक्टरांकडे वाढता कल
सह्याद्रीच्या उंच-सखल भागात पूर्वी बैलांच्या सहाय्यानेच नांगरणी केली जात होती. मात्र, आता लहान आकाराचे ट्रॅक्टर उपलब्ध झाल्याने दुर्गम भागातही यंत्रांचा वापर वाढू लागला आहे. वेळ आणि श्रमाची बचत होत असल्याने मोठ्या शेतकऱ्यांकडून ट्रॅक्टरला अधिक पसंती दिली जात आहे.
पशुधन घटण्याची प्रमुख कारणे
▪️बैलांची देखभाल खर्चिक
▪️खाद्य व चाऱ्याची कमतरता
▪️आजारांचा वाढता धोका
▪️शेतीतील वाढते यांत्रिकीकरण
“ग्रामीण भागात शेतीत यांत्रिकीकरण वाढल्याने नांगरणीसाठी बैलांचा वापर कमी झाला आहे. पूर्वी गावोगावी दिसणाऱ्या बैलगाड्याही आता नामशेष होत आहेत,” असे शेतकरी सागर गुरव यांनी सांगितले.
“आमच्याकडे कमी शेती असल्याने महागडा ट्रॅक्टर घेणे शक्य नाही. यंत्र जिथे पोहोचत नाही, तिथे आजही बैलजोडीच उपयोगी पडते. त्यामुळे मी अजूनही बैलांनीच शेतीची मशागत करतो,” असे रघुनाथ आमकर यांनी सांगितले.
“शेतीतील बदल, तरुणांची शेतीकडे असलेली उदासीनता आणि वाढते यांत्रिकीकरण यामुळे पशुधनात घट झाली आहे. तरीही शेतीसाठी पूरक व्यवसाय म्हणून पशुधनाची गरज कायम आहे,” असे राकेश लाड यांनी मत व्यक्त केले.
कोकणातील शेतीचा आधारस्तंभ मानली जाणारी ‘सर्जा-राजा’ची बैलजोडी हळूहळू इतिहासजमा






