GRAMIN SEARCH BANNER

खेड : मुंबके येथे गांजा विक्री करणाऱ्या टोळीला रंगेहाथ पकडले ; ६७ हजारांचा मुद्देमाल जप्त

Gramin Varta
270 Views

खेड: तालुक्यातील मुंबके येथे अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या एका टोळीचा खेड पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. एका खोलीवर अचानक छापा टाकून पोलिसांनी गांजाची विक्री करणाऱ्या तीन तरुणांना रंगेहाथ अटक केली. त्यांच्या ताब्यातून सुमारे ३६४ ग्रॅम सुकलेला गांजा, तीन महागडे स्मार्टफोन, गांजा ओढण्यासाठी लागणाऱ्या मातीच्या चिलीम आणि वजनाचे साहित्य असा एकूण ६७ हजार २४९ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे खेड परिसरातील अंमली पदार्थ विक्रेत्यांमध्ये घबराट पसरली आहे.

या धडक कारवाईबाबत खेड पोलिसांकडून मिळालेली सविस्तर माहिती अशी की, ३ जून २०२६ रोजी रात्री १०.४७ वाजण्याच्या सुमारास मुंबके गावातील एका खोलीमध्ये काही इसम गांजा हा अंमली पदार्थ विक्रीसाठी बाळगून असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे खेड पोलीस ठाण्याच्या पथकाने रात्रीच्या वेळी सदर खोलीवर छापा टाकला. या छाप्यात पोलिसांना खोलीमध्ये तीन तरुण गांजा विक्री करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या साहित्यासह रंगेहाथ आढळून आले. पोलिसांनी तात्काळ तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले.

ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे अफजल जहीर कादिरी (वय २४, रा. नांदगाव मोहल्ला, ता. खेड), सद्दाम अबु बकर दुदुके (वय २५, मूळ रा. मुंबके दुदुके मोहल्ला, ता. खेड, सध्या रा. कोनगाव, ता. कल्याण, जि. ठाणे) आणि अवधूत राजेश घोडे (वय २६, रा. कोष्टी आळी, ता. खेड) अशी आहेत. पोलिसांनी पंचांसमक्ष घेतलेल्या झडतीत त्यांच्याकडे एका काळ्या रंगाच्या प्लास्टिक पिशवीमध्ये ५ हजार ४४९ रुपये किमतीचा, हिरवट पाने, फुले, काड्या आणि बिया असलेला ३६४ ग्रॅम वजनाचा उग्र वासाचा सुकलेला गांजा मिळून आला.

याशिवाय संशयितांकडून २० हजार रुपयांचा सॅमसंग ए-५३, ३० हजार रुपयांचा रेडमी १४ प्रो मॅक्स, १० हजार रुपयांचा मोटोरोला जी-६७ असे तीन वेगवेगळ्या कंपन्यांचे स्मार्टफोन जप्त करण्यात आले. तसेच गांजा ओढण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या १ हजार ५०० रुपये किमतीच्या तीन काळ्या रंगाच्या मातीच्या चिलीम आणि ३०० रुपये किमतीच्या प्लास्टिकच्या लहान पिशव्या असा एकूण ६७ हजार २४९ रुपयांचा माल पोलिसांनी जप्त केला.

याप्रकरणी खेड पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई सुरज निवृत्ती मोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ४ जून २०२६ रोजी पहाटे ४.०६ वाजता तिन्ही संशयित आरोपींविरुद्ध अंमली औषधी द्रव्य व मन प्रभावी पदार्थ अधिनियम १९८५ (NDPS Act) च्या कलम ८(अ), २०(ब), २(ब) आणि २९ नुसार गुन्हा रजिस्टर क्रमांक १६३/२०२६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आंतरजिल्हा कनेक्शन असलेल्या गांजा तस्करी व विक्री प्रकरणाचा पुढील अधिक तपास खेड पोलीस करत आहेत.

Total Visitor Counter

3483539
Share This Article