Category: बातम्या

  • चिपळूण येथील भोगळे एस.टी. स्टँडवरून ७५ हजारांची दुचाकी लंपास

    चिपळूण येथील भोगळे एस.टी. स्टँडवरून ७५ हजारांची दुचाकी लंपास

    चिपळूण: येथील भोगळे एस.टी. बस स्थानक परिसरातून एक काळ्या रंगाची हिरो कंपनीची स्प्लेंडर प्रो दुचाकी अज्ञात चोरट्याने लांबवल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी तब्बल २० दिवसांनंतर चिपळूण पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यासीन बालेचांद कोठावळे (वय २७, व्यवसाय- चष्मा दुकान, रा. परांजपे स्कीम, चिपळूण) हे गत १० मे २०२६ रोजी सायंकाळी सव्वाआठ वाजण्याच्या सुमारास काही कामानिमित्त भोगळे एस.टी. स्टँड परिसरात आले होते. त्यांनी आपल्या वडिलांच्या नावावर असलेली काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर प्रो दुचाकी (क्र. एम.एच. १० बी.एस. ९७८६) बस स्थानक परिसरात उभी केली होती. दरम्यान, अवघ्या काही वेळातच अज्ञात चोरट्याने फिर्यादी यांच्या संमतीशिवाय स्वतःच्या फायद्यासाठी ही ७५ हजार रुपये किमतीची दुचाकी लबाडीने चोरून नेली.

    या चोरीच्या घटनेबाबत चिपळूण पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार देण्यात आली. या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता अधिनियम २०२३ च्या कलम ३०५ (पूर्वीचे भारतीय दंड संहिता कलम ३७९) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत असून, बस स्थानकसारख्या सार्वजनिक ठिकाणी वाहनचालकांनी आपल्या गाड्या सुरक्षितपणे लॉक करून ठेवाव्यात, असे आवाहन करण्यात येत आहे.

  • रत्नागिरी एस.टी. स्टँडच्या गेटसमोरून दुचाकी लंपास; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा

    रत्नागिरी एस.टी. स्टँडच्या गेटसमोरून दुचाकी लंपास; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा

    रत्नागिरी: शहरातील मुख्य एस.टी. बस स्थानकाच्या मधल्या गेटसमोरून एक पांढऱ्या रंगाची एक्टिवा दुचाकी चोरीला गेल्याची घटना घडली आहे. गाडीला चावी तशीच विसरल्याचा फायदा उठवत अज्ञात चोरट्याने ही दुचाकी लंपास केली. याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी याकुब सलोमन ख्रिश्चन (वय ३३, रा. खेडशी, रत्नागिरी) हे १ जून २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजण्याच्या सुमारास काही कामानिमित्त एस.टी. स्टँड परिसरात आले होते. त्यांनी आपली पांढऱ्या रंगाची एक्टिवा दुचाकी (क्र. एम.एच. ५० बी. ३२३१) बस स्थानकाच्या मधल्या गेटसमोर उभी केली. मात्र, घाईगडबडीत त्यांच्याकडून गाडीला चावी लावलेल्या स्थितीतच राहिली. हीच संधी साधून एका अज्ञात चोरट्याने फिर्यादी यांच्या संमतीशिवाय १० हजार रुपये किमतीची ही दुचाकी चोरून नेली.
    काही वेळानंतर फिर्यादी परत आले असता त्यांना आपली दुचाकी त्या ठिकाणी दिसून आली नाही. परिसरात शोध घेऊनही गाडी न सापडल्याने अखेर त्यांनी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

    या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता अधिनियम २०२३ च्या कलम ३०३(२) (पूर्वीचे भारतीय दंड संहिता कलम ३७९) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत असून, वर्दळीच्या बस स्थानक परिसरातून झालेल्या या चोरीमुळे वाहनचालकांनी आपल्या गाड्या सुरक्षितपणे लॉक करण्याचे आवाहन केले जात आहे.

  • मुंबई-गोवा महामार्गावर मद्यधुंद डंपर चालकाने संगमेश्वरमधील दोन निष्पाप तरुणांना चिरडले

    मुंबई-गोवा महामार्गावर मद्यधुंद डंपर चालकाने संगमेश्वरमधील दोन निष्पाप तरुणांना चिरडले

    पेण: मुंबई-गोवा महामार्गावरील खारपाडा परिसरात ३० मे रोजी रात्री एक अत्यंत थरारक आणि भीषण अपघात घडला. मद्यप्राशन करून बेदरकारपणे वाहन चालवणाऱ्या एका डंपर चालकाने समोरून येणाऱ्या दोन दुचाकीस्वारांना जागीच चिरडले.

    स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार,या दुर्दैवी अपघातात संगमेश्वर तालुक्यातील पाचांबे येथील मूळ रहिवासी असलेल्या आणि सध्या मुंबईतील विक्रोळी येथे वास्तव्यास असणाऱ्या आदित्य किशोर बल्लाळ वाडकर (वय २२) आणि यश मुकेश बल्लाळ (वय १२) या दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. रात्री ११.१५ वाजण्याच्या सुमारास खारपाडा गावातील पोलीस चौकीसमोर हा अपघात घडला. आरोपी डंपर चालक गौतम लक्ष्मण महतो (रा. बोकारो, झारखंड) याने दारूच्या नशेत, ओव्हरलोडेड गौण खनिज भरून डंपर अतिवेगाने आणि निष्काळजीपणे चालवल्यामुळे त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि हा भीषण अपघात घडला. या प्रकरणी मृत मुलाचे वडील मुकेश चंद्रकांत बल्लाळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दादर सागरी पोलीस ठाण्यात आरोपी चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांसह मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.


    या भीषण अपघातानंतर खारपाडा परिसरातील स्थानिक ग्रामस्थ आणि मृत तरुणांच्या नातेवाईकांचा संताप अनावर झाला. महामार्गावर पेण उपप्रादेशिक परिवहन विभाग आणि महसूल विभागाच्या छुप्या पाठिंब्यामुळेच अशा प्रकारे अवैध आणि ओव्हरलोड गौण खनिजांची वाहतूक सुरू असते, असा थेट आरोप करत ग्रामस्थांनी संबंधित महसूल व आरटीओ अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. या मागणीसाठी संतप्त नातेवाईकांनी आणि नागरिकांनी सुमारे दीड तास मृतदेह रस्त्यावरून उचलण्यास तीव्र नकार दिला, ज्यामुळे महामार्गावर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

    घटनेची माहिती मिळताच दादर सागरी पोलीस ठाण्याचे अधिकारी तातडीने फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी संतप्त ग्रामस्थांची समजूत काढत कायदेशीर कारवाईचे आश्वासन दिले, त्यानंतर दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून अपघाताचा पंचनामा करण्यात आला. या दुर्दैवी घटनेमुळे मूळ गाव संगमेश्वर आणि संपूर्ण परिसरात तीव्र हळहळ व्यक्त होत असून, मुंबई-गोवा महामार्गावरील वाढत्या अपघातांचा आणि प्रशासकीय दुर्लक्षाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

  • महावितरणचा डिजिटल धडाका: राज्यात १.१४ कोटी स्मार्ट मीटर कार्यान्वित; सर्वाधिक ४३ लाख मीटरसह कोकण विभाग अव्वल

    महावितरणचा डिजिटल धडाका: राज्यात १.१४ कोटी स्मार्ट मीटर कार्यान्वित; सर्वाधिक ४३ लाख मीटरसह कोकण विभाग अव्वल

    मुंबई: राज्यातील वीज ग्राहकांना अद्ययावत सेवा देण्यासाठी महावितरणने सुरू केलेल्या मोहिमेत आतापर्यंत तब्बल १ कोटी १४ लाख ४४ हजार ७६३ स्मार्ट मीटर बसविण्यात आले असून जवळपास ४७.३१ टक्के ग्राहकांसाठी ही आधुनिक यंत्रणा कार्यान्वित झाली आहे. या मोहिमेत संपूर्ण महाराष्ट्रात कोकण विभागाने बाजी मारली असून, तिथे सर्वाधिक ४३ लाख ३ हजार ३०३ स्मार्ट मीटर बसविण्यात आले आहेत. स्मार्ट मीटरमुळे ग्राहकांना अचूक बिलिंग मिळण्यासोबतच थेट वीजदरात सवलत मिळत असल्याने या ग्राहकांच्या संख्येत वेगाने वाढ होत असल्याचा दावा महावितरणने केला आहे.

    ग्राहकांना घरबसल्या अचूक बिल मिळणे, दर तासाला मोबाईलवर विजेचा प्रत्यक्ष वापर समजणे आणि सवलतीच्या वीजदराच्या काळात अधिक वीजवापराची उपकरणे वापरण्याचे नियोजन करून विजेचा वापर नियंत्रणात ठेवणे, असे अनेकविध फायदे या मोफत बसविल्या जाणाऱ्या स्मार्ट मीटरमुळे ग्राहकांना मिळत आहेत. त्याचसोबत वीज वितरण प्रणालीचे प्रभावी व्यवस्थापन करणे आणि वीजगळती रोखणे यामध्येही ही यंत्रणा महत्त्वपूर्ण ठरत आहे.

    या स्मार्ट मीटरचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये ‘टाईम ऑफ डे’ म्हणजेच ‘टीओडी’ सवलतीचा लाभ घरगुती ग्राहकांनाही मिळण्यास सुरुवात झाली आहे. विजेचा वापर दिवसाच्या कोणत्या वेळेला झाला, त्यानुसार वीजदरात सवलत देण्याला ‘टीओडी’ सवलत म्हणतात. या अंतर्गत स्मार्ट मीटर बसविलेल्या घरगुती वीज ग्राहकांना दिवसाच्या वीज वापरासाठी प्रति युनिट ८० पैसे इतकी घसघशीत सवलत देण्यात येत आहे. याच धर्तीवर औद्योगिक आणि वाणिज्यिक वीज ग्राहकांनाही सकाळी ९ ते सायंकाळी ५ या कालावधीतील वीज वापरासाठी दरात विशेष सवलत दिली जात आहे. ग्राहक आपल्या मोबाईल फोनमधील ॲपद्वारे घरात अथवा कार्यालयात दर तासाला किती वीज वापरली जात आहे, यावर सहज लक्ष ठेवू शकतात.

    महावितरणने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यात कोकण विभागापाठोपाठ पुणे विभागाने ३५ लाख ५४ हजार ५७८ स्मार्ट मीटरसह दुसरे स्थान पटकावले आहे. तर नागपूर विभागात २२ लाख ४५ हजार ३६६ आणि छत्रपती संभाजीनगर विभागात १३ लाख ४१ हजार ५१६ स्मार्ट मीटर बसविण्यात आले आहेत. वेगवेगळ्या परिमंडळांचा विचार केल्यास कल्याण झोनमध्ये सर्वाधिक १४ लाख ८६ हजार ३२२, पुणे झोनमध्ये १३ लाख ७४ हजार ७७२, कोल्हापूर झोनमध्ये ११ लाख ५७ हजार ९५, भांडूप झोनमध्ये १० लाख ४० हजार ३६५ आणि बारामती झोनमध्ये १० लाख २२ हजार ७११ मीटर कार्यान्वित झाले आहेत. याशिवाय नाशिक झोनमध्ये ७ लाख ८८ हजार ४८०, नागपूर झोनमध्ये ७ लाख २२ हजार ७१६, जळगाव झोनमध्ये ६ लाख ५९ हजार ५६७, लातूर झोनमध्ये ५ लाख ६ हजार ६७५, छत्रपती संभाजीनगर झोनमध्ये ४ लाख ८१ हजार २६१, अमरावती झोनमध्ये ४ लाख ७ हजार ३९४, अकोला झोनमध्ये ४ लाख ६ हजार ९०९, चंद्रपूर झोनमध्ये ३ लाख ७५ हजार ७७२, नांदेड झोनमध्ये ३ लाख ५३ हजार ५८०, गोंदिया झोनमध्ये ३ लाख ३२,५७५ तर रत्नागिरी झोनमध्ये ३ लाख २८ हजार ५६९ स्मार्ट मीटर बसवण्याचे काम पूर्ण झाले आहे. या मोहिमेमुळे राज्यातील वीज ग्राहकांना आपल्या वीज वापराचे अचूक नियोजन करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.

  • ऐन उन्हाळी सुट्ट्यांच्या सांगतेत कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले; तेजस एक्सप्रेस तब्बल १२ तास लेट, स्थानकांवर प्रवाशांचा संताप

    ऐन उन्हाळी सुट्ट्यांच्या सांगतेत कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले; तेजस एक्सप्रेस तब्बल १२ तास लेट, स्थानकांवर प्रवाशांचा संताप

    रत्नागिरी: मुंबई-गोवा महामार्गाची अंतिम मुदत संपूनही रस्त्याची कामे अपूर्ण असल्याने कोकणात ये-जा करणाऱ्या चाकरमान्यांची संपूर्ण भिस्त अजूनही कोकण रेल्वेवरच आहे. मात्र, सध्या कोकण रेल्वेचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. उन्हाळी सुट्ट्या संपवून मुंबईला परतणारे चाकरमानी आणि कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना रेल्वेच्या प्रचंड लेटमार्कचा मोठा फटका बसत आहे. सध्या मान्सूनपूर्व देखभाल दुरुस्तीची कामे कोकण रेल्वेकडून युद्धपातळीवर सुरू असल्याने गाड्यांच्या वेळापत्रकावर हा विपरीत परिणाम झाल्याचे बोलले जात आहे.

    मात्र, ऐनवेळी गाड्यांच्या वेळेत झालेला हा बदल आणि प्रचंड उशीर यामुळे प्रवाशांवर तासनतास स्थानकात ताटकळत बसण्याची वेळ आली असून लहान मुले, महिला आणि वृद्ध प्रवाशांची यामुळे मोठी गैरसोय होत आहे. त्यातच गाड्या उशिराने धावण्याचे नेमके कारणही रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांना स्पष्ट केले जात नसल्याने प्रवाशांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे.

    या कोलमडलेल्या वेळापत्रकामुळे अनेक गाड्या १ तासापासून थेट १२ तासांपर्यंत उशिराने धावत आहेत. यामध्ये एलटीटी मडगाव, मांडवी एक्सप्रेस आणि तेजस एक्सप्रेस या गाड्यांना ४ ते ५ तासांचा खोळंबा झाला आहे. मुंबईहून सुटणारी मांडवी एक्सप्रेस ४ तास उशिराने धावत असून, सकाळी ७ वाजता सीएसएमटीहून सुटणारी ही गाडी तब्बल ११ वाजता रवाना झाली. नियोजित वेळेनुसार स्थानकात पोहोचलेल्या प्रवाशांना गाडी थेट ४ तास उशिरा असल्याचे समजताच त्यांचा संताप अनावर झाला, तर दुसरीकडे मडगावहून मुंबईकडे येणारी मांडवी एक्सप्रेसही अर्धा तास उशिराने धावत आहे. विशेषतः हायस्पीड समजल्या जाणाऱ्या तेजस एक्सप्रेसला तब्बल १२ तास उशीर झाल्याने प्रवाशांना प्रचंड मानसिक मनस्ताप सहन करावा लागत आहे. मडगावहून सुटणारी तेजस एक्सप्रेस चक्क ९ तास उशिराने सुटली आणि सध्या ती १२ तास उशिराने धावत आहे.

    रात्री १२ वाजता सुटलेली ही तेजस एक्सप्रेस आता दुपारी १ वाजता सीएसएमटीला पोहोचेल. याशिवाय कोकण कन्या एक्सप्रेसही एक तास उशिराने पोहोचली असून, ज्या वेळेत प्रवाशांनी घरी पोहोचणे अपेक्षित होते, तो सगळा अमूल्य वेळ स्थानकांवरच वाया जात असल्यामुळे हतबल झालेल्या चाकरमान्यांमधून रेल्वे प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

  • रत्नागिरीत माळनाका स्कायवॉकवर उभारली जाणार राज्यातील पहिली ‘हँगिंग आर्ट गॅलरी’

    रत्नागिरीत माळनाका स्कायवॉकवर उभारली जाणार राज्यातील पहिली ‘हँगिंग आर्ट गॅलरी’

    रत्नागिरी : रत्नागिरी शहराच्या सौंदर्यात भर घालणारा आणि कलेला नवे व्यासपीठ उपलब्ध करून देणारा एक अभिनव उपक्रम आता प्रत्यक्षात येणार आहे. पालकमंत्री उदय सामंत यांच्या संकल्पनेतून माळनाका येथील स्कायवॉकचे रूपांतर आता आकर्षक ‘हँगिंग आर्ट गॅलरी’मध्ये करण्यात येणार आहे.

    शालेय विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना सुरक्षितपणे रस्ता ओलांडता यावा यासाठी काही वर्षांपूर्वी माळनाका येथे स्कायवॉक उभारण्यात आला होता. मात्र अपेक्षित प्रमाणात त्याचा वापर होत नसल्याने या जागेचा अधिक परिणामकारक उपयोग करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यातूनच स्कायवॉकवर हँगिंग आर्ट गॅलरी उभारण्याची अभिनव कल्पना साकार होत आहे.

    विशेष म्हणजे, रस्त्यावरील स्कायवॉकवर उभारली जाणारी ही हँगिंग आर्ट गॅलरी राज्यातील पहिल्यापैकी किंवा एकमेव अशा प्रकारची संकल्पना असल्याचे बोलले जात आहे. या गॅलरीमध्ये विविध थोर व्यक्तिमत्त्वांची चित्रे, सामाजिक संदेश देणारी पोस्टर्स, सांस्कृतिक वारशाचे दर्शन घडवणारी कलाकृती तसेच नामवंत कलाकारांच्या उत्कृष्ट कलाकृती प्रदर्शित केल्या जाणार आहेत.

    यासोबतच स्थानिक आणि उदयोन्मुख कलाकारांनाही आपल्या कलागुणांचे प्रदर्शन करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे ही गॅलरी केवळ आकर्षणाचे केंद्र न राहता नव्या कलाकारांसाठी प्रेरणास्थान ठरणार आहे.

    स्कायवॉकवरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना आता प्रवासासोबतच कलेचा आनंदही घेता येणार आहे. लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांसाठी ही जागा एक वेगळा अनुभव देणारी ठरेल. फावल्या वेळात कला रसिकांना येथे फेरफटका मारत विविध कलाकृतींचा आस्वाद घेण्याची संधी मिळणार आहे.

    रत्नागिरीच्या नागरी जीवनात कला, संस्कृती आणि सौंदर्य यांचा संगम घडवणारा हा उपक्रम शहरासाठी एक नवे आकर्षण ठरणार असून, माळनाका परिसराला एक वेगळी ओळख मिळवून देणार असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

    “सुरक्षिततेसाठी उभारलेला स्कायवॉक आता कलेचा सेतू ठरणार असून, रत्नागिरीच्या सौंदर्यात आणखी एका आकर्षक दालनाची भर पडणार आहे.”

  • केरळमध्ये नैऋत्य मान्सूनचे आगमन; महाराष्ट्रात मात्र १० जूनपर्यंत प्रतीक्षा

    केरळमध्ये नैऋत्य मान्सूनचे आगमन; महाराष्ट्रात मात्र १० जूनपर्यंत प्रतीक्षा

    महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पेरणी न करण्याचा सल्ला

    नवी दिल्ली: संपूर्ण देशाच्या उत्सुकतेचा विषय ठरणाऱ्या नैऋत्य मान्सूनचे अखेर केरळमध्ये आगमन झाले असून भारतीय हवामान विभागाने सोमवारी याबाबत अधिकृत घोषणा केली.

    उष्णता आणि उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांसाठी ही मोठी दिलासादायक बातमी मानली जात आहे. केरळच्या किनारपट्टीवर मान्सून दाखल झाल्यानंतर केरळ राज्यात पुढील काही दिवसांत जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारतातील मान्सूनच्या प्रगतीसाठी केरळमधील आगमन हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा मानला जात असल्याने देशभरातील शेतकरी, हवामान तज्ज्ञ आणि प्रशासनाचे लक्ष आता मान्सूनच्या पुढील वाटचालीकडे लागले आहे. मात्र महाराष्ट्रातील नागरिक आणि शेतकऱ्यांना अद्याप काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.

    हवामान विभागाने केरळ राज्यातील सात जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केली आहे. अलप्पुझा, कोट्टायम, एर्नाकुलम, त्रिशूर आणि मलप्पुरम या जिल्ह्यांसाठी बुधवार आणि गुरुवार या दोन्ही दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट लागू करण्यात आला आहे. तसेच पतनमतिट्टा आणि कोझिकोड या जिल्ह्यांसाठी गुरुवारी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार या जिल्ह्यांतील काही भागांमध्ये अल्प कालावधीत ११ ते २० सेंटीमीटरपर्यंत पाऊस पडू शकतो.

    मुसळधार पावसामुळे शहरी भागांमध्ये अचानक पूरस्थिती निर्माण होण्याचा धोका वाढला असून डोंगराळ आणि घाटमाथ्याच्या प्रदेशांमध्ये दरडी कोसळण्याची शक्यता देखील व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांनी निरीक्षण आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांना वेग दिला आहे. पूरप्रवण आणि संवेदनशील भागांतील नागरिकांनी विशेष सतर्कता बाळगावी, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे. तर केरळ राज्यातील इतर अनेक जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जाहीर करण्यात आली असून व्यापक पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मान्सूनच्या प्रभावामुळे किनारपट्टी भागात समुद्र खवळलेला राहण्याची आणि जोरदार वारे वाहण्याची शक्यता असल्याने मच्छीमारांना समुद्रात मासेमारीसाठी न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

    दरम्यान,मान्सून आता दक्षिण भारतातून टप्प्याटप्प्याने पुढे सरकत महाराष्ट्रासह देशाच्या इतर भागांकडे वाटचाल करणार आहे. मात्र महाराष्ट्रातील नागरिक आणि शेतकऱ्यांना अद्याप काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. प्रादेशिक हवामान विभागाच्या माहितीनुसार राज्यातील बहुतांश भागांमध्ये किमान १० जूनपर्यंत मान्सूनच्या आगमनाची शक्यता नाही.

    सध्या राज्यात अनेक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळत असल्या तरी हा मान्सूनचा पाऊस नसून मान्सूनपूर्व पाऊस आहे. विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि खानदेश या भागांमध्ये दुपारनंतर ढगाळ वातावरण निर्माण होऊन वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. या पावसाचा मान्सूनच्या प्रगतीशी थेट संबंध नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे दमदार आणि सातत्यपूर्ण पाऊस पडून मान्सून स्थिरावल्याची अधिकृत माहिती मिळेपर्यंत शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे.

    मान्सून केरळमध्ये दाखल झाल्याची घोषणा करण्यासाठी भारतीय हवामान विभाग काही ठरावीक निकषांचा आधार घेतो. हवामान विभागाचे अधिकारी के. एस. होसाळीकर यांनी यापूर्वी याबाबत माहिती दिली होती. त्यानुसार १० मेनंतर केरळमधील १४ हवामान केंद्रांपैकी किमान ६० टक्के केंद्रांवर सलग दोन दिवस २.५ मिलिमीटर किंवा त्यापेक्षा अधिक पावसाची नोंद होणे आवश्यक असते. याशिवाय पश्चिमेकडून वाहणारे वारे ठरावीक उंचीपर्यंत आणि आवश्यक वेगाने वाहणे तसेच वातावरणातील दीर्घतरंगीय प्रारणाचे प्रमाण निश्चित मर्यादेपेक्षा कमी असणे हे निकषही पूर्ण होणे गरजेचे असते.

  • राज्यात फळबाग लागवडीला चालना; २०२६-२७ साठी ५० हजार हेक्टरचे लक्ष्य

    राज्यात फळबाग लागवडीला चालना; २०२६-२७ साठी ५० हजार हेक्टरचे लक्ष्य

    पुणे: महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) अंतर्गत राज्यात फळबाग लागवड कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यात येत असून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्नाचा स्रोत उपलब्ध करून देण्यात या योजनेची महत्त्वाची भूमिका ठरत आहे.

    आर्थिक वर्ष २०२६-२७ साठी राज्यात मनरेगामार्फत ५० हजार हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवडीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असल्याची माहिती कृषी विभागाचे फलोत्पादन संचालक अंकुश माने यांनी दिली. फळबाग लागवडीद्वारे शेतीपूरक व्यवसायांना चालना देणे, कृषी उत्पादनक्षमता वाढविणे आणि ग्रामीण भागात रोजगारनिर्मितीला प्रोत्साहन देणे हा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे. योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना विविध फळपिके, फुलपिके, मसाला पिके तसेच औषधी वनस्पतींच्या लागवडीसाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून दिले जाते.मनरेगा अंतर्गत गेल्या आर्थिक वर्षात (२०२५-२६) राज्यातील सुमारे ४७ हजार २७४ हेक्टर क्षेत्रावर विविध फळपिके, फुलपिके आणि मसाला पिकांची लागवड करण्यात आली. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना दीर्घकालीन उत्पन्नाचा स्रोत उपलब्ध होण्यास मदत झाली असून ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही बळकटी मिळत असल्याचे माने यांनी सांगितले.यंदा निश्चित करण्यात आलेल्या ५० हजार हेक्टरच्या उद्दिष्टामुळे राज्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांना फळबाग लागवडीकडे वळण्याची संधी मिळणार असून ग्रामीण भागातील रोजगार आणि कृषी विकासाला चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

  • म्हाडा मुंबई मंडळाच्या २,६४० सदनिकांसाठी ७५,३६६ अर्ज प्राप्त

    म्हाडा मुंबई मंडळाच्या २,६४० सदनिकांसाठी ७५,३६६ अर्ज प्राप्त

    विधान परिषद निवडणुकांची आचारसंहिता संपल्यावर संगणकीय सोडतीचे वेळापत्रक जाहीर होणार

    मुंबई: महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे २,६४० सदनिकांच्या विक्रीसाठी आयोजित संगणकीय सोडतीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.

    सोडतीसाठी ७५,३६६ अर्ज प्राप्त झाले असून प्रती सदनिका सरासरी २८.५४ अर्ज प्राप्त झाले आहेत. ही बाब मुंबईकरांचा म्हाडावरील वाढता विश्वास आणि परवडणाऱ्या घरांसाठीची मोठी मागणी अधोरेखित करते.

    मुंबई मंडळातर्फे संगणकीय सोडतीच्या प्रक्रियेची तयारी पूर्ण करण्यात येत असून विधान परिषद निवडणुकांसाठी लागू आचारसंहिता संपल्यानंतर सोडतीची तारीख, वेळ व स्थळ जाहीर करण्यात येणार आहे. सद्यस्थितीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद निवडणुकीसाठी महाराष्ट्रात आदर्श आचारसंहिता (MCC) लागू असून सदर आचारसंहितेची अंतिम तारीख २५ जून, २०२६ आहे. भारतीय निवडणूक आयोगातर्फे निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर झाल्याच्या दिवसापासून ते संपूर्ण निवडणूक प्रक्रिया अधिकृतपणे पूर्ण होईपर्यंत आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी केली जाते. त्यामुळे आदर्श आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर सोडतीचा दिनांक जाहीर करण्यात येईल.

    मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ व मुंबई इमारत दुरूस्ती व पुनर्रचना मंडळाव्दारे प्राप्त विविध वसाहतीमधील विक्री योग्य एकुण २६४० सदनिका उपलब्ध झाल्या. या सदनिकांमध्ये नव्याने बांधकाम चालु असलेल्या सदनिका, विकास नियंत्रण नियमावली ३३ (५) व ३३ (७) अंतर्गत विकासकांकडून प्राप्त सदनिका व पणन विभागातील विविध कारणांमुळे रिक्त व प्रतिक्षायादी संपुष्टात असलेल्या सदनिकांच्या विक्रीसाठी दिनांक ३० मार्च २०२६ रोजी विविध वर्तमानपत्रामध्ये जाहिरात प्रसिध्द करण्यात आली. यानुसार इच्छुक अर्जदारांना दिनांक २८ मे २०२६ रोजीपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत देण्यात आली. मुंबई मंडळांने सदनिकांची कमी केलेली विक्री किमंत, काही योजनांना दिलेल्या सुविधा, पार्कीग सुविधा, उत्कृष्ठ दर्जाचे बांधकाम, योजनांची महत्वाची ठिकाणे, बाजारमुल्यापेक्षा कमी किंमत इत्यादीचा अर्जदारांकडून विचार करता सोडतीसाठी भरघोस प्रतिसाद प्राप्त झाला आहे.

    सोडतीसाठी प्राप्त अर्जांची प्रारूप यादी दि. १० जून, २०२६ रोजी दुपारी ३.०० वाजता म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. प्रारूप यादी प्रसिद्ध झाल्यानंतर दि. १२ जून, २०२६ रोजी दुपारी ३.०० वाजेपर्यंत अर्जदारांना ऑनलाईन दावे व हरकती दाखल करता येतील. त्यानंतर प्राप्त दावे-हरकतींची छाननी करून दि. १६ जून, २०२६ रोजी दुपारी ३.०० वाजता सोडतीसाठी स्वीकृत अर्जदारांची अंतिम यादी म्हाडाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

    मुंबई मंडळाने दि. ३० मार्च, २०२६ रोजी कन्नमवार नगर-विक्रोळी, पत्राचाळ सिद्धार्थ नगर-गोरेगाव, जुने मागाठाणे-बोरीवली, गोराई-बोरीवली, सुभाष नगर-चेंबुर, गांधीनगर-वांद्रे, पंतनगर-घाटकोपर, गिरगाव, वडाळा, कोपरी-पवई, माझगाव, तुंगा-पवई, लोकमान्य नगर-दादर, पहाडी गोरेगाव आणि अँटॉप हिल-वडाळा आदी गृहनिर्माण प्रकल्पांमधील विविध उत्पन्न गटांसाठी २,६४० सदनिकांची संगणकीय सोडत जाहीर केली होती. या सोडतीत अत्यल्प उत्पन्न गटासाठी १४५, अल्प उत्पन्न गटासाठी ८५८, मध्यम उत्पन्न गटासाठी ७९८ आणि उच्च उत्पन्न गटासाठी ८३९ सदनिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

    दरम्यान, नागरिकांच्या सोयीसाठी बांधकाम सुरू असलेल्या सदनिकांच्या गटातील कन्नमवार नगर, विक्रोळी (पूर्व) येथील संकेत क्रमांक ५३८ व ५३९ मधील १,२२१ सदनिकांच्या विक्री किमतीत ७.५ टक्के कपात करण्यात आली. मंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार या १,२२१ सदनिकांपैकी ६१० सदनिका नवीन संकेत क्रमांक ५३८-अ व ५३९-अ अंतर्गत केवळ उच्च उत्पन्न गटासाठी उपलब्ध करून देण्यात आल्या. या निर्णयामुळे उच्च उत्पन्न गटातील अधिकाधिक नागरिकांना आधुनिक सुविधा असलेले आणि परवडणाऱ्या किमतीतील घर मिळविण्याची मोठी संधी उपलब्ध झाली व त्यासही अर्जदारांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. संगणकीय सोडतीची तारीख, वेळ आणि स्थळ याबाबतची सविस्तर माहिती पुढील काळात म्हाडाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार आहे.

  • ‘दख्खनची राणी’ ९७ वर्षांची; पुणे स्थानकावर उत्साहात वाढदिवस साजरा

    ‘दख्खनची राणी’ ९७ वर्षांची; पुणे स्थानकावर उत्साहात वाढदिवस साजरा

    पुणे: भारतीय रेल्वेच्या इतिहासातील मानाचे स्थान असलेली आणि पुणे-मुंबई शहरांना जोडणारी प्रसिद्ध ‘दख्खनची राणी’ अर्थात डेक्कन क्वीनने १ जून २०२६ रोजी आपल्या प्रवासाची ९७ वर्षे पूर्ण केली.

    या निमित्ताने पुणे रेल्वे स्थानकावर विशेष कार्यक्रमाचे आयोजन करून तिचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.१ जून १९३० रोजी तत्कालीन ‘ग्रेट इंडियन पेनिनसुलर रेल्वे’ने सुरू केलेली डेक्कन क्वीन ही देशातील पहिली डिलक्स ट्रेन मानली जाते. सुरुवातीच्या काळात ‘ब्लू बर्ड बेबी’ या नावाने ओळखली जाणारी ही गाडी इंग्लंडमध्ये तयार करण्यात आलेल्या डब्यांसह धावू लागली. प्रारंभी कल्याण-पुणे मार्गावर सुरू झालेला तिचा प्रवास पुढे मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी)पर्यंत विस्तारला गेला. कालांतराने दादर आणि शिवाजीनगरसह अन्य महत्त्वाच्या स्थानकांचा समावेश करण्यात आला.देशात प्रथमच डायनिंग कारची सुविधा देणाऱ्या या गाडीने रेल्वे प्रवासाला नवे परिमाण दिले. १५ ऑगस्ट २०२१ पासून आकर्षक निसर्गदृश्यांचा आनंद घेण्यासाठी विस्टाडोम कोचची सुविधाही या गाडीला जोडण्यात आली.वर्धापन दिनानिमित्त सोमवारी सकाळी पुणे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर रेल्वे प्रवासी ग्रुपच्या अध्यक्षा हर्षा शहा यांच्या पुढाकाराने कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कोहिनूर ग्रुपचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांच्या हस्ते केक कापून डेक्कन क्वीनचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी फुलांनी सजवलेल्या इंजिनाला मानवंदना देण्यात आली. सकाळी ७.१५ वाजता डेक्कन क्वीन मुंबईच्या दिशेने रवाना होताच उपस्थित रेल्वेप्रेमींनी तिचे उत्साहात स्वागत केले.