रत्नागिरी: मुंबई-गोवा महामार्गाची अंतिम मुदत संपूनही रस्त्याची कामे अपूर्ण असल्याने कोकणात ये-जा करणाऱ्या चाकरमान्यांची संपूर्ण भिस्त अजूनही कोकण रेल्वेवरच आहे. मात्र, सध्या कोकण रेल्वेचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. उन्हाळी सुट्ट्या संपवून मुंबईला परतणारे चाकरमानी आणि कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना रेल्वेच्या प्रचंड लेटमार्कचा मोठा फटका बसत आहे. सध्या मान्सूनपूर्व देखभाल दुरुस्तीची कामे कोकण रेल्वेकडून युद्धपातळीवर सुरू असल्याने गाड्यांच्या वेळापत्रकावर हा विपरीत परिणाम झाल्याचे बोलले जात आहे.
मात्र, ऐनवेळी गाड्यांच्या वेळेत झालेला हा बदल आणि प्रचंड उशीर यामुळे प्रवाशांवर तासनतास स्थानकात ताटकळत बसण्याची वेळ आली असून लहान मुले, महिला आणि वृद्ध प्रवाशांची यामुळे मोठी गैरसोय होत आहे. त्यातच गाड्या उशिराने धावण्याचे नेमके कारणही रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांना स्पष्ट केले जात नसल्याने प्रवाशांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे.
या कोलमडलेल्या वेळापत्रकामुळे अनेक गाड्या १ तासापासून थेट १२ तासांपर्यंत उशिराने धावत आहेत. यामध्ये एलटीटी मडगाव, मांडवी एक्सप्रेस आणि तेजस एक्सप्रेस या गाड्यांना ४ ते ५ तासांचा खोळंबा झाला आहे. मुंबईहून सुटणारी मांडवी एक्सप्रेस ४ तास उशिराने धावत असून, सकाळी ७ वाजता सीएसएमटीहून सुटणारी ही गाडी तब्बल ११ वाजता रवाना झाली. नियोजित वेळेनुसार स्थानकात पोहोचलेल्या प्रवाशांना गाडी थेट ४ तास उशिरा असल्याचे समजताच त्यांचा संताप अनावर झाला, तर दुसरीकडे मडगावहून मुंबईकडे येणारी मांडवी एक्सप्रेसही अर्धा तास उशिराने धावत आहे. विशेषतः हायस्पीड समजल्या जाणाऱ्या तेजस एक्सप्रेसला तब्बल १२ तास उशीर झाल्याने प्रवाशांना प्रचंड मानसिक मनस्ताप सहन करावा लागत आहे. मडगावहून सुटणारी तेजस एक्सप्रेस चक्क ९ तास उशिराने सुटली आणि सध्या ती १२ तास उशिराने धावत आहे.
रात्री १२ वाजता सुटलेली ही तेजस एक्सप्रेस आता दुपारी १ वाजता सीएसएमटीला पोहोचेल. याशिवाय कोकण कन्या एक्सप्रेसही एक तास उशिराने पोहोचली असून, ज्या वेळेत प्रवाशांनी घरी पोहोचणे अपेक्षित होते, तो सगळा अमूल्य वेळ स्थानकांवरच वाया जात असल्यामुळे हतबल झालेल्या चाकरमान्यांमधून रेल्वे प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे.







