मुंबई: राज्यातील वीज ग्राहकांना अद्ययावत सेवा देण्यासाठी महावितरणने सुरू केलेल्या मोहिमेत आतापर्यंत तब्बल १ कोटी १४ लाख ४४ हजार ७६३ स्मार्ट मीटर बसविण्यात आले असून जवळपास ४७.३१ टक्के ग्राहकांसाठी ही आधुनिक यंत्रणा कार्यान्वित झाली आहे. या मोहिमेत संपूर्ण महाराष्ट्रात कोकण विभागाने बाजी मारली असून, तिथे सर्वाधिक ४३ लाख ३ हजार ३०३ स्मार्ट मीटर बसविण्यात आले आहेत. स्मार्ट मीटरमुळे ग्राहकांना अचूक बिलिंग मिळण्यासोबतच थेट वीजदरात सवलत मिळत असल्याने या ग्राहकांच्या संख्येत वेगाने वाढ होत असल्याचा दावा महावितरणने केला आहे.
ग्राहकांना घरबसल्या अचूक बिल मिळणे, दर तासाला मोबाईलवर विजेचा प्रत्यक्ष वापर समजणे आणि सवलतीच्या वीजदराच्या काळात अधिक वीजवापराची उपकरणे वापरण्याचे नियोजन करून विजेचा वापर नियंत्रणात ठेवणे, असे अनेकविध फायदे या मोफत बसविल्या जाणाऱ्या स्मार्ट मीटरमुळे ग्राहकांना मिळत आहेत. त्याचसोबत वीज वितरण प्रणालीचे प्रभावी व्यवस्थापन करणे आणि वीजगळती रोखणे यामध्येही ही यंत्रणा महत्त्वपूर्ण ठरत आहे.
या स्मार्ट मीटरचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये ‘टाईम ऑफ डे’ म्हणजेच ‘टीओडी’ सवलतीचा लाभ घरगुती ग्राहकांनाही मिळण्यास सुरुवात झाली आहे. विजेचा वापर दिवसाच्या कोणत्या वेळेला झाला, त्यानुसार वीजदरात सवलत देण्याला ‘टीओडी’ सवलत म्हणतात. या अंतर्गत स्मार्ट मीटर बसविलेल्या घरगुती वीज ग्राहकांना दिवसाच्या वीज वापरासाठी प्रति युनिट ८० पैसे इतकी घसघशीत सवलत देण्यात येत आहे. याच धर्तीवर औद्योगिक आणि वाणिज्यिक वीज ग्राहकांनाही सकाळी ९ ते सायंकाळी ५ या कालावधीतील वीज वापरासाठी दरात विशेष सवलत दिली जात आहे. ग्राहक आपल्या मोबाईल फोनमधील ॲपद्वारे घरात अथवा कार्यालयात दर तासाला किती वीज वापरली जात आहे, यावर सहज लक्ष ठेवू शकतात.
महावितरणने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यात कोकण विभागापाठोपाठ पुणे विभागाने ३५ लाख ५४ हजार ५७८ स्मार्ट मीटरसह दुसरे स्थान पटकावले आहे. तर नागपूर विभागात २२ लाख ४५ हजार ३६६ आणि छत्रपती संभाजीनगर विभागात १३ लाख ४१ हजार ५१६ स्मार्ट मीटर बसविण्यात आले आहेत. वेगवेगळ्या परिमंडळांचा विचार केल्यास कल्याण झोनमध्ये सर्वाधिक १४ लाख ८६ हजार ३२२, पुणे झोनमध्ये १३ लाख ७४ हजार ७७२, कोल्हापूर झोनमध्ये ११ लाख ५७ हजार ९५, भांडूप झोनमध्ये १० लाख ४० हजार ३६५ आणि बारामती झोनमध्ये १० लाख २२ हजार ७११ मीटर कार्यान्वित झाले आहेत. याशिवाय नाशिक झोनमध्ये ७ लाख ८८ हजार ४८०, नागपूर झोनमध्ये ७ लाख २२ हजार ७१६, जळगाव झोनमध्ये ६ लाख ५९ हजार ५६७, लातूर झोनमध्ये ५ लाख ६ हजार ६७५, छत्रपती संभाजीनगर झोनमध्ये ४ लाख ८१ हजार २६१, अमरावती झोनमध्ये ४ लाख ७ हजार ३९४, अकोला झोनमध्ये ४ लाख ६ हजार ९०९, चंद्रपूर झोनमध्ये ३ लाख ७५ हजार ७७२, नांदेड झोनमध्ये ३ लाख ५३ हजार ५८०, गोंदिया झोनमध्ये ३ लाख ३२,५७५ तर रत्नागिरी झोनमध्ये ३ लाख २८ हजार ५६९ स्मार्ट मीटर बसवण्याचे काम पूर्ण झाले आहे. या मोहिमेमुळे राज्यातील वीज ग्राहकांना आपल्या वीज वापराचे अचूक नियोजन करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.






