GRAMIN SEARCH BANNER

राज्यात फळबाग लागवडीला चालना; २०२६-२७ साठी ५० हजार हेक्टरचे लक्ष्य

Gramin Varta
38 Views

पुणे: महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) अंतर्गत राज्यात फळबाग लागवड कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यात येत असून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्नाचा स्रोत उपलब्ध करून देण्यात या योजनेची महत्त्वाची भूमिका ठरत आहे.

आर्थिक वर्ष २०२६-२७ साठी राज्यात मनरेगामार्फत ५० हजार हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवडीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असल्याची माहिती कृषी विभागाचे फलोत्पादन संचालक अंकुश माने यांनी दिली. फळबाग लागवडीद्वारे शेतीपूरक व्यवसायांना चालना देणे, कृषी उत्पादनक्षमता वाढविणे आणि ग्रामीण भागात रोजगारनिर्मितीला प्रोत्साहन देणे हा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे. योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना विविध फळपिके, फुलपिके, मसाला पिके तसेच औषधी वनस्पतींच्या लागवडीसाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून दिले जाते.मनरेगा अंतर्गत गेल्या आर्थिक वर्षात (२०२५-२६) राज्यातील सुमारे ४७ हजार २७४ हेक्टर क्षेत्रावर विविध फळपिके, फुलपिके आणि मसाला पिकांची लागवड करण्यात आली. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना दीर्घकालीन उत्पन्नाचा स्रोत उपलब्ध होण्यास मदत झाली असून ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही बळकटी मिळत असल्याचे माने यांनी सांगितले.यंदा निश्चित करण्यात आलेल्या ५० हजार हेक्टरच्या उद्दिष्टामुळे राज्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांना फळबाग लागवडीकडे वळण्याची संधी मिळणार असून ग्रामीण भागातील रोजगार आणि कृषी विकासाला चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Total Visitor Counter

3485069
Share This Article