रत्नागिरी: रत्नागिरी ते कोल्हापूर महामार्गावरील नाणीज धनगरवाडी येथे डंपर चालकाने अचानक वाहन वळवून मोटारसायकलला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात मोटारसायकल चालक गंभीर जखमी झाला असून, अपघात घडल्यानंतर जखमीला मदत न करता डंपर चालक घटनास्थळावरून पसार झाला आहे. याप्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात बिहारमधील डंपर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात २ मे २०२६ रोजी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास नाणीज धनगरवाडीसमोरील रस्त्यावर झाला. सांगली येथील रहिवासी सुमेध विजयसिंग चौहान (रा. विश्रामबाग, सांगली, ता. मिरज) हे आपल्या ताब्यातील मोटारसायकल (क्रमांक एमएच ४२ बीडी ५५५७) वरून रत्नागिरी-कोल्हापूर रस्त्याने जात होते. याच वेळी डंपर (क्रमांक एमएच ०८ एपी ५६५१) चा चालक एमडी अस्लम अब्दुल रहमान (रा. मिर्झापूर, मुजफ्फरपूर, राज्य बिहार) याने आपल्या ताब्यातील डंपर कोणताही इशारा न देता अचानक उजव्या बाजूला वळवला. डंपर चालकाच्या या निष्काळजीपणामुळे डंपरची मोटारसायकलला उजव्या बाजूने जोरदार धडक बसली. या अपघातात सुमेध चौहान यांना गंभीर व किरकोळ दुखापत झाली असून मोटारसायकलचेही मोठे नुकसान झाले आहे. अपघात घडल्यानंतर डंपर चालक रहमान याने जखमीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल न करता किंवा पोलिसांना अपघाताची कोणतीही माहिती न देता घटनास्थळावरून पळ काढला.
या अपघाताची रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात मोटार अपघात रजिस्टर नंबर १९/२०२६ नुसार प्राथमिक चौकशी करण्यात आली. या चौकशीअंती २० मे २०२६ रोजी रात्री २२.५१ वाजता रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मोहन रामचंद्र कांबळे यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली. या फिर्यादीवरून डंपर चालक एमडी अस्लम अब्दुल रहमान याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २८१, १२५(अ), १२५(ब) आणि मोटार वाहन कायद्याच्या कलम १३४(अ)(ब), १८४ नुसार गुन्हा रजिस्टर नंबर ९३/२०२६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या फरार डंपर चालकाचा शोध घेत असून अधिक तपास करत आहेत.






