GRAMIN SEARCH BANNER

दिवाळीत होणार प्रवास वेगवान! कोकण रेल्वेवरील पावसाळी वेळापत्रक समाप्त

Gramin Varta
78 Views

मुंबई : दरवर्षीप्रमाणे यंदाही पावसाळ्यात कोकण रेल्वेवर पावसाळी वेळापत्रक लागू करण्यात आले होते. परंतु, यंदा पावसाळी वेळापत्रकाचे १५ दिवस कमी करण्यात आले होते. त्यामुळे कोकण रेल्वेवरील पावसाळी वेळापत्रक लवकरच समाप्त होणार असून २१ ऑक्टोबरपासून नियमित वेळापत्रक लागू करण्यात येणार आहे.

त्यामुळे दिवाळीत कोकणात जाणाऱ्या प्रवाशांचा प्रवास वेगवान होईल आणि इच्छित रेल्वेगाडीच्या वाढीव फेऱ्यांमधून प्रवास करणे शक्य होईल.

भौगोलिकदृष्ट्या कोकण रेल्वेवरून रेल्वेगाडी, मालगाडी चालवणे आव्हानात्मक आहे. पावसाळ्यात रेल्वेगाडी चालवणे एक मोठी कसोटी असते. पावसाळ्यात कोकण रेल्वे मार्गावर दरड कोसळण्याचा धोका असतो. मुसळधार पावसामुळे रेल्वे मार्गावरील दृश्यमानता कमी होते. त्यामुळे रेल्वेगाड्यांच्या वेगावर नियंत्रण ठेवावे लागते. कोकण रेल्वेतर्फे रोहा – ठोकूरदरम्यानच्या ७३९ किमी पट्ट्यात पावसाळी कामे केली जातात. यावर्षी कोकण रेल्वे प्रशासनाने धोकादायक वाटणारी दरड काढून टाकली. त्याचबरोबर बोगद्याजवळ, दरडीच्या ठिकाणी लोखंडी जाळ्या बसविल्या.

आपत्कालीन स्थितीत तात्काळ मदत मिळावी यासाठी ठराविक अंतरावर अत्याधुनिक यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली होती. कोकण रेल्वेवरील सर्व सिग्नल यंत्रणेसाठी एलईडी दिवे बसविल्याने दृश्यमानता सुधारली. तरीही पावसाळ्यातील नैसर्गिक धोका टाळण्यासाठी, कोकण रेल्वेच्या एकूण ७३९ किमी मार्गापैकी वीर – उडुपी दरम्यानच्या ६४६ किमी लांबीच्या मार्गावर वेगमर्यादा लागू करण्यात आली. या वेगमर्यादेमुळे रेल्वेगाड्या कूर्मगतीने धावतात. तर, इतर भागात सामान्य वेगमर्यादा लागू असते. रोहा – वीर दरम्यानच्या ४७ किमी अंतरावर सामान्य वेग ते ताशी १२० किमी, वीर – कणकवली दरम्यनच्या २६९ किमी अंतरावर ताशी ७५ किमी ते १२० किमी, कणकवली ते उडुपी दरम्यानच्या ३७७ किमी अंतरावर दरम्यान ताशी १२० किमी ते ताशी ९० किमी आणि उडुपी – ठोकूर दरम्यानच्या ४७ किमी अंतरावर सामान्य वेग ते ताशी १२० किमी वेगमर्यादा असते.

हेही वाचाAhmedabad Plane Crash 2025 : कॅप्टन सभरवाल यांचे वृध्द वडील सर्वोच्च न्यायालयात! विमान दुर्घनटेची न्यायालयीन चौकशीची मागणी

सुरक्षेच्या कारणास्तव दरवर्षी १० जून ते ३१ ऑक्टोबर दरम्यान कोकण रेल्वेवर पावसाळी वेळापत्रक असते. मात्र, यावर्षी कोकण रेल्वेने पूर्व पावसाळी कामे केल्याने व इतर पायाभूत कामे पूर्ण झाल्याने, कोकण रेल्वेच्या पावसाळी वेळापत्रकात सुधारणा केली. १० जूनऐवजी १५ जूनपासून पावसाळी वेळापत्रक जाहीर केले. तर, ३१ ऑक्टोबरऐवजी २० ऑक्टोबरपर्यंतच पावसाळी वेळापत्रकाचे नियोजन केले. त्यामुळे पावसाळी वेळापत्रकातील १५ दिवस कमी झाले. प्रवाशांना २१ ऑक्टोबरपासून नियमित वेळापत्रकानुसार प्रवास करता येणार आहे. त्यामुळे मुंबईवरून कोकणात जाणाऱ्या आणि कोकणातून मुंबईकडे येणाऱ्या प्रवाशांचा प्रवास गतीमान होणार आहे.

सीएसएमटी – मंगळुरू जंक्शन, सीएसएमटी – मडगाव जंक्शन कोकणकन्या एक्स्प्रेस, एलटीटी – करमळी एक्स्प्रेस, दादर टर्मिनस – सावंतवाडी रोड तुतारी एक्स्प्रेस, सीएसएमटी – मडगाव जंक्शन वंदे भारत एक्स्प्रेस, सीएसएमटी – मडगाव जंक्शन जनशताब्दी एक्स्प्रेस, सीएसएमटी – मडगाव जंक्शन तेजस एक्स्प्रेस यासह अनेक रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक नियमित होणार आहे.

Total Visitor Counter

2661240
Share This Article