GRAMIN SEARCH BANNER

दापोली: एसटी आगारातील दत्त मंदिरात चोरी; घटनेनंतर १२ तासांच्या आत पुणे येथील आरोपीला अटक

Gramin Varta
91 Views

दापोली: सार्वजनिक ठिकाणी असलेल्या धार्मिक स्थळांनाही चोरट्यांनी लक्ष्य करण्यास सुरुवात केल्याचे एक धक्कादायक प्रकरण दापोलीतून समोर आले आहे. दापोली एसटी आगाराच्या आवारात असलेल्या श्री दत्तगुरू मंदिराची दानपेटी फोडून चोरट्याने केवळ ५०० ते ७०० रुपयांची रक्कम लंपास केली. हा गुन्हा १८ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री आठ वाजल्यापासून १९ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी आठ वाजण्याच्या दरम्यान घडला. मात्र, या घटनेची माहिती मिळताच दापोली पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवत, अवघ्या काही तासांतच पुणे जिल्ह्यातील एका आरोपीला गजाआड केले आहे.

या घटनेची माहिती मिळताच दापोली आगाराचे बस अधिकारी राजेंद्र एकनाथ कुबाळे (वय ५७, रा. बस अधिकारी क्वार्टर्स, दापोली) यांनी दापोली पोलीस ठाण्यात धाव घेतली.

त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, आगारातील दत्त मंदिरात प्रवेश करून अज्ञात इसमाने स्वार्थापोटी दानपेटी फोडली आणि त्यातील सुमारे ५०० ते ७०० रुपये चोरी केले. याप्रकरणी कुबाळे यांनी अज्ञात इसमाविरुद्ध कायदेशीर तक्रार दाखल केली. ही चोरी उघडकीस येऊन फिर्याद दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली.

दापोली पोलीस ठाण्यात या चोरीप्रकरणी भारतीय फौजदारी प्रक्रिया संहिता कायदा २०२३ च्या कलम ३०५(अ) नुसार गु.आर. क्र. १९१/२०२५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तांत्रिक माहिती आणि स्थानिकांच्या मदतीने तपास करत अवघ्या काही तासांतच आरोपीचा माग काढला. याच दिवशी रात्री १० वाजून २० मिनिटांनी पोलिसांनी ओम बाळकृष्ण सातपुते (वय ३९ वर्षे, रा. तळेगाव ढमढरे, ता. शिरुर, जि. पुणे) याला अटक केली. त्यानेच मंदिरातील दानपेटी फोडून चोरी केल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. चोरीला गेलेली रक्कम किरकोळ असली तरी सार्वजनिक ठिकाणी असलेल्या धार्मिक स्थळावर दरोडा टाकण्याच्या या कृत्यामुळे दापोली परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. पुढील तपास दापोली पोलीस करत आहेत.

Total Visitor Counter

2675724
Share This Article